डॉ. प्रकाश परांजपे

ब्रिजमध्ये पानं डावीकडून उजवीकडे म्हणजे घडय़ाळाच्या काटय़ांप्रमाणे एकेक करून वाटली जातात. खेळतानाही तोच क्रम असतो. पहिलं पान खेळणाऱ्याच्या डावीकडील खेळाडू दुसरं पान खेळतो, समोरचा तिसरं, तर उजवा चौथं. चारही खेळाडूंना एकेक पान दिलं की एक दस्त (याकरिता ‘हात’ हा शब्द जास्त रूढ आहे, तर इंग्लिशमध्ये ‘ट्रीक’. सोयीसाठी यापुढे आपण ‘दस्त’ हा शब्द वापरू.) पुरा होतो. हा दस्त जिंकणारा खेळाडू पुढच्या दस्ताचं पहिलं पान खेळतो. सगळी ५२ पानं खेळून होईपर्यंत हा क्रम चालू राहतो.

‘उतारी करणं’ म्हणजे दस्ताचं पहिलं पान खेळणं. उतारी करताना खेळाडू हातातलं कुठलंही पान निवडू शकतो. दस्ताची पुढची पानं खेळणाऱ्या खेळाडूंना मात्र बंधनं असतात. उतारी केलेल्या पंथाचं पान जर हातात असेल तर ते खेळावंच लागतं, त्या पंथाची दोन किंवा त्याहून जास्ती पानं असतील तर त्यांतील कुठलंही पान खेळलेलं चालतं. त्या पंथाचं एकही पान हातात नसेल तर उरलेल्यातील कुठलंही पान खेळलेलं चालतं.  मात्र प्रत्येक दस्तासाठी प्रत्येक खेळाडूला एक पान हे खेळावंच लागतं.

(बिनहुकमी डावांत) उतारी ज्या पंथाची असेल, त्या पंथाचं मोठय़ात मोठं पान जो खेळाडू खेळतो, तो त्या दस्ताचा विजेता होतो. एक्का हे सगळ्यात मोठं पान; राजा, राणी, गुलाम आणि मग दश्शा ते दुरी अशा उतरत्या भाजणीने पानांचं ‘वजन’ असतं. पुढच्या दस्ताचं पहिलं पान  खेळण्याचा मान आधीच्या दस्ताच्या विजेत्याकडे जातो.

वरच्या आकृतीमध्ये प्रत्येक खेळाडूकडे पाच पानं उरली आहेत. पश्चिमेकडे इस्पिक राजा (ङ), राणी (द) आणि बदाम राणी (द),  गुलाम (ख), दश्शा; उत्तरेकडे इस्पिक एक्का, छक्की, पंजी आणि बदाम चव्वी, तिरी; पूर्वेकडे इस्पिक गुलाम (ख), दश्शा आणि बदाम नव्वी, अठ्ठी, सत्ती; तर दक्षिणेकडे इस्पिक तिरी, दुरी आणि बदाम एक्का (अ), राजा (ङ), दुरी अशी पानं आहेत.

या पानांमध्ये उत्तर-दक्षिणेच्या जोडीचे किती दस्त होतील? समजा, पहिली उतारी पश्चिमेची आहे आणि तो बदाम राणी खेळला. सगळ्या खेळाडूंकडे बदामाची पानं आहेत. पहिला दस्त  बदाम Q -t-x-A असा होईल आणि दक्षिण जिंकेल. यानंतर जर दक्षिणेच्या खेळाडूने इस्पिक एक्का आणि बदाम राजा यांचे दस्त् ‘वाजवून’ घेतले तर उ-द जोडीचे फक्त ३ दस्त होतील. पण दक्षिणेने थोडं डोकं लढवलं तर त्याला चार दस्त करता येतील. बदाम एक्का जिंकल्यानंतर इस्पिक दुरी खेळून त्यावर उत्तरेतून छोटं पान, म्हणजे पंजी टाकून दुसरा दस्त जर विरोधी जोडीला जिंकू दिला तर काय होईल? पश्चिम बदाम किंवा इस्पिकची उतारी करू शकेल. इस्पिकचा दुसरा दस्त जेव्हा उत्तरेचा एक्का जिंकेल, तेव्हा गावातली सगळी इस्पिकची पानं  संपलेली असतील आणि उत्तरेच्या इस्पिक छक्कीला पुढचा दस्त स्वस्तात जिंकता येईल. इस्पिक छक्की ‘सर’ होईल. उ-द जोडीचे चार दस्त होतील!

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com