डॉ. प्रकाश परांजपे

भोकरवाडीतून गणा मास्तर लिहितात,  ‘‘मी गावकऱ्यांना ‘लोकसत्ता’मधील लेख वाचून ब्रिज खेळ शिकवला. ५—६ आठवडे सगळं ठीक चाललं होतं, पण काल बाबू पैलवानाने ढाक लावली.’’

झालं असं. गणा मास्तरच्या कट्टय़ावर जमल्यावर नेहमीप्रमाणे चार गावकऱ्यांनी डाव मांडला. गणा मास्तर सांगेल त्याप्रमाणे बोली लावायच्या, ठेक्याचा खेळ सुरू झाला की आपापली पानं खेळायची आणि डाव संपला की पुढचा वाटायचं असं चाललं होतं. डावाच्या शेवटी गणा मास्तर एका जुन्या वर्तमानपत्रावर आकडे लिहायचा आणि नाना चेंगट खुशीत माना डोलवायचा, पण बाकीच्यांना त्यात काही फारशी गती नव्हती. चार घटका मजेत गेल्या हे समाधान असायचं. बाबू पैलवान पण कसल्याशा कामात होता. तो आपला कधीतरी हाक मारून ५—१० मिनिटं खेळ बघून सटकायचा, त्यामुळे सगळं सुरळीत चाललं होतं. पण बाबू कामातून मोकळा झाला आणि सगळा रंगच बदलला.

बाबू कट्टय़ावर जरा उशिराच उगवला तेव्हा १४वा डाव चालू होता. गणा मास्तरने डाव वाटला आणि (वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे) नाना आणि गणा चार बदामच्या शतकी ठेक्यापर्यंत पोचले. नाना ठेका खेळायला मिळणार म्हणून थोडा पुढे सरकला. पण त्याच वेळी बाबूने रामाच्या हातातून पानं हिसकावून घेतली आणि तो म्हणाला. ‘‘आता मी खेळणार. ए चेंगटा , मागे सरक, समदे डाव तू खेळणार होय?’’

‘‘बाबू, तुझ्याकडे चित्रं  नाही, काय बी डाव नाही, तू काय खेळणार?’’ चेंगट मागे सरकत बोलला. ‘‘मी १ इस्पिक बोलणार,’’ बाबू उत्तरला. ‘‘अरे बाबू, बोली  ४ बदामची आहे, तुला ४ इस्पिक बोलायला लागेल,’’ गणा  मास्तर त्याला समजावत म्हणाला. ‘‘मग असं सांग की गणा,’’ म्हणत बाबू ४ इस्पिक असं ठासून बोलला. ‘‘चंबाला चीतपट केलाय मी चारदा, चार इस्पिकला घाबरतोय होय?’’ म्हणून त्याने डाव्या हाताला असलेल्या चेंगटाचा दंड पिरगाळला.

एकूण रागरंग बघून बाकीच्यांनी गप्प बसणं पसंत केलं आणि बाबूला ४ इस्पिकचा ठेका खेळू दिला. चरफडलेल्या चेंगटाने बदाम एक्कय़ाने भवानी केली आणि नाना-गणा जोडीचे बदाम एक्का-राजा, चौकट एक्का-राजा, आणि इस्पिक-किलवर एक्के असे सहा दस्त झाले आणि ठेका ३ दस्त कमी होऊन बुडाला. गणा मास्तरने सवयीप्रमाणे एकूण गुणांची नोंद करायला पेन्सिल उचलली आणि त्याचा चेहरा कसनुसा झाला.बाबूच्या हे बरोबर लक्षात आलं आणि त्याने नाना चेंगटाच्या पाठीत जोरात गुद्दा मारून आपला विजय साजरा केला.

चार बदामाच्या ठेक्यात १० दस्त सरळ होते. शतकी ठेक्याचे ३०० आणि बदामाच्या दस्तांचे तीस चोक १२० असे ४२० एकूण गुण गणा आणि नाना या जोडीला मिळाले असते, पण बाबूला ४ इस्पिकच्या ठेक्यात ३ दस्तांनी हरवून त्यांना फक्त पन्नास त्रिक  १५० एवढेच एकूण गुण मिळाले होते. गणा  मास्तरने याचा खुलासा करून घ्यायचं ठरवलं.

https://www.youtube.com/channel/UC4jcD2_X7oCi5NNQANr3A6Q

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com