ऋषिकेश बामणे

चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धापैकी एक ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या यावर्षीच्या हंगामाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव, अनेक नामांकित खेळाडूंची माघार यांसारख्या अनेक अडथळ्यांना सामोरे जातानाच चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा टेनिसविषयीचे प्रेम निर्माण करण्याचे आव्हान या स्पर्धेपुढे असणार आहे.

ग्रँडस्लॅम हा शब्द उच्चारताच जगभरातील क्रीडाप्रेमींसमोर एखाद्या टेनिस सामन्याचे चित्र उभे राहते. पॅट सॅम्प्रस, बोरिस बेकर, स्टेफी ग्राफ यांपासून ते रॉजर फेडरर, राफेल नदाल, सेरेना विल्यम्स यांसारख्या महान खेळाडूंचा वारसा लाभलेल्या या खेळाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धाना आता पुन्हा सुरुवात होणार आहे. मात्र क्रिकेट आणि फुटबॉलच्या स्पर्धाना ज्याप्रकारे सुरळीतपणे सुरुवात झाली आहे, त्याप्रमाणे अमेरिकन खुल्या स्पर्धेद्वारे टेनिस या खेळाला पुन्हा नवसंजीवनी देण्याचे कार्य खेळाडूंसह व्यवस्थापकांना करावे लागणार आहे.

३१ ऑगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या या हार्ड कोर्टवरील स्पर्धेतून अनेक मान्यवर खेळाडूंनी विविध कारणास्तव आधीच माघार घेतली आहे. मुख्य म्हणजे फेडरर, गतविजेता नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच या पुरुष एकेरीतील त्रिमूर्तीपैकी फेडरर, नदाल या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याने जोकोव्हिचसमोरील आव्हान तुलनेने सोपे झाले आहे. सर्बियाच्या ३३ वर्षीय जोकोव्हिचला यंदा १८वे ग्रँडस्लॅम विजेतेपद खुणावत असून डॉमनिक थीम, स्टीफानोस त्सित्सिपास, अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्याकडून त्याला कडवी झुंज मिळू शकते. करोनावर मात करून परतणारा जोकोव्हिच जूनमध्ये बेलग्रेड येथे प्रदर्शनीय टेनिस सामन्यांचे आयोजन केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या स्पर्धेतूनच जोकोव्हिचव्यतिरिक्त ग्रिगोर दिमित्रोव्ह, बोरना कोरिक यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यामुळे या स्पर्धेत जोकोव्हिचच्या कामगिरीकडे आपसुकच चाहत्यांचे लक्ष लागून असेल.

ज्याप्रमाणे पुरुष एकेरीत जोकोव्हिचला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्याचप्रमाणे महिला एकेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे पारडे जड आहे. गतविजेती बियांका आंद्रेस्क्यू, सिमोना हॅलेप, अ‍ॅशले बार्टी, येलेना ओस्तापेन्को यांनी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माजी टेनिसपटू मार्गारेट कोर्ट यांच्या एकेरीतील विक्रमी २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांशी बरोबरी साधण्याची नामी संधी ३८ वर्षीय सेरेनाला आहे.

यंदाच्या अमेरिकन स्पर्धेतून बहुतांश खेळाडूंच्या माघारीमागील आढावा घेतल्यास पहिले कारण स्पष्ट होते, ते म्हणजे करोनाचा धोका. अमेरिके त अद्यापही करोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून एक लाख, ८५ हजारांहून जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. यंदा ही स्पर्धा प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवण्यात येणार असून खेळाडूंनाही जैव-सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. तरीही करोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खेळाडूंनी या स्पर्धेकडे पाठ फिरवली आहे, तर काहींना दुखापतीमुळे नाइलाजास्तव स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. एकीकडे विम्बल्डन स्पर्धा इतिहासात दुसऱ्यांदाच रद्द करण्यात आलेली असताना अमेरिकन स्पर्धेच्या आयोजनाचा अट्टहास का, असा प्रश्नही अनेक आजी—माजी खेळाडूंनी उपस्थित केला होता. खेळाडूंना प्रत्यक्षात सामन्यासाठी तीनच व्यवस्थापकांना घेऊन जाण्याची परवानगी असून यांपैकी कोणालाही करोनाची लागण झाल्यास खेळाडूंना १४ दिवसांचे विलगीकरण अनिवार्य आहे. आठवडय़ात दोनदा खेळाडूंची करोना चाचणीही करण्यात येणार असून प्रवासादरम्यान त्यांना मुखपट्टी वापरणे बंधनकारक आहे.

या स्पर्धेनंतर सप्टेंबरमध्येच फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे अमेरिकन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाद्वारे चाहत्यांना पुन्हा टेनिसकडे आकर्षित करण्याचे आव्हान आयोजकांपुढे असून यामध्ये ते कितपत यशस्वी ठरतील, हे लवकरच स्पष्ट होईल.

भारताचे तीन शिलेदार : सुमित नागल, रोहन बोपण्णा आणि दिविज शरण हे तीन भारतीय टेनिसपटू अमेरिकन स्पर्धेत खेळताना दिसतील. गतवर्षी या स्पर्धेतच नागलने पहिल्या फेरीत फेडररला विजयासाठी झुंजवले होते. यंदा क्रमवारीतील वरच्या खेळाडूंनी माघार घेतल्याने नागलला कारकीर्दीत दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याची संधी मिळाली. पुरुष दुहेरीत बोपण्णा आणि शरण आपापल्या विदेशी सहकाऱ्यासह खेळताना आढळतील. हे दोघे मिश्र दुहेरीतही सहभागी होणार आहेत.

तुम्हाला हे माहीत आहे का?

* अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पुरुष आणि महिला एके रीतील गतवेळचे विजेते (राफेल नदाल आणि बियांका आंद्रेस्क्यू) यंदा स्पर्धेत सहभागी नसतील.

* १९७३पासूनच दोन्ही गटांतील विजेत्यांना समान बक्षीस रक्कम देणारी ही पहिली स्पर्धा आहे.

rushikesh.bamne@expresindia.com