30 May 2020

News Flash

करोनामय संकट!

फक्त करोनामुळेच नव्हे तर याआधीही क्रीडाक्षेत्रावर अनेकदा हे संकट ओढवले आहे.

संग्रहित छायाचित्र

तुषार वैती

जगातील प्रत्येकाच्या मुखात सध्या एकच शब्द आहे तो म्हणजे करोना. प्रत्येकाला फक्त करोनाची चिंता सतावत आहे. जगातील प्रत्येक जण या अदृश्यरूपी संकटाचा सामना करत आहे. या संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण जग युद्धपातळीवर प्रयत्न करत असले तरी या करोनामयी संकटामुळे मात्र संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. येत्या काही महिन्यांत या संकटावर मात केली जाईलही. पण त्यानंतर सर्वासमोर आ वासून प्रश्न असेल तो ‘यापुढे करायचे काय?’ क्रीडाक्षेत्रालाही हा प्रश्न सर्वात जास्त भेडसावणार आहे. कारण पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धाचा अपवाद सोडला तर जगातील क्रीडाक्षेत्राला इतका मोठा फटका कधीच बसला नव्हता. अनेक देशांचे अर्थकारण खेळांवर अवलंबून असते. पण संपूर्ण जगातील विविध खेळांच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्यानंतर आता विविध क्लब्स, संघ, खेळाडू, प्रशिक्षक, फ्रेंचायझी, कर्मचारी यांसारख्या विविध घटकांना त्याची किंमत मोजावी लागत आहे.

करोनामुळे सर्व प्रकारच्या लीग, ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून आता टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षांने लांबणीवर टाकण्यात आली आहे. फक्त करोनामुळेच नव्हे तर याआधीही क्रीडाक्षेत्रावर अनेकदा हे संकट ओढवले आहे. त्याचाच आढावा या लेखात घेण्यात आला आहे.

जगातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यंदा रद्द करण्याची वेळ जपान सरकारवर आली होती. पण जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) एका वर्षांने ही स्पर्धा लांबणीवर टाकत सर्वच खेळाडूंना तसेच संलग्न देशांना दिलासा दिला आहे. मात्र १८९६ मध्ये पहिल्यांदा आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्यानंतर तीन वेळा (१९१६, पहिले महायुद्ध त्यानंतर १९४० आणि १९४४ दुसरे महायुद्ध) ही स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.

१९१६ मध्ये जर्मन राजवटीच्या अधिपत्याखाली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी बर्लिनमध्ये ३० हजार प्रेक्षकक्षमतेचे भव्य स्टेडियम उभारण्यात आले होते. पण १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू पाठवणारेच अनेक देश या महायुद्धात सामील झाल्यामुळे अखेर स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या महायुद्धाला सुरुवात करण्याच्या आरोपामुळे नंतर जर्मनीला १९२० आणि १९२४च्या ऑलिम्पिकमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

जपान या पहिल्या बिगरपाश्चिमात्य देशाला १९४०च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क मिळाले. पण जपान आणि चीन यांच्यातील युद्धाला जुलै १९३७ मध्ये सुरुवात झाली. त्यामुळे जपानने ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनातून माघार घेतली. अखेर आयोजनासाठी फिनलंडमधील हेलसिंकीची निवड करण्यात आली. पण सप्टेंबर १९३९मध्ये पोलंडवरील नाझी आक्रमणामुळे आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यामुळे १९४०ची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा अखेर रद्द करावी लागली. १९४४ साली लंडनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती, पण दुसरे महायुद्ध सुरूच असल्यामुळे तीसुद्धा रद्द करावी लागली. १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अनेक देश या तडाख्यातून सावरत असताना लंडनमध्येच १९४८ साली ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आली, पण लंडनने जर्मनी आणि जपानच्या खेळाडूंना बंदी घातली. दुसऱ्या महायुद्धाची धग जाणवत असतानाही तब्बल ५९ देशांनी (तेव्हाचा विक्रम) या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला. पण खेळाडूंसाठी सैन्यदलाच्या छावणीत, शाळांमध्ये तसेच वसतिगृहांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर अनेकदा ऑलिम्पिक स्पर्धाच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला दहशतवादाचा धोका अनेकदा जाणवला. १९७२च्या म्युनिच ऑलिम्पिकदरम्यान पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलच्या जवळपास ११ खेळाडूंची हत्या केली. पण दोन दिवसांच्या स्थगितीनंतर ऑलिम्पिक स्पर्धा खेळवण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला. १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिकदरम्यान सेन्टेनियल ऑलिम्पिक पार्कजवळ बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यात दोघांना आपले प्राण गमवावा लागले तर अनेक जण जखमी झाले. मात्र अशा परिस्थितीतही काही तासांनीच ऑलिम्पिक चळवळ कायम सुरू राहील, असे आवाहन संयोजन समितीच्या अध्यक्षांनी करत ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन केले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विम्बल्डनसारखी प्रतिष्ठेची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धाही रद्द करावी लागली होती. त्यानंतर यंदा ऑल इंग्लंड क्लबवर विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढवली.

गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच कित्येक अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेले क्रीडाक्षेत्र करोनामुळे अंधारमय स्थितीत गेले आहे. याचा फटका क्रीडाक्षेत्रावर आधारित सर्वानाच बसणार आहे. करोनाच्या विळख्यातून पूर्णपणे सावरण्यासाठी किती महिन्यांचा कालावधी लागेल, हे आताच सांगणे कठीण आहे. पण त्यानंरही चाहते स्टेडियमकडे वळतील की नाही, हा गहन प्रश्न आहे.

tushar.vaity@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:01 am

Web Title: article on corona crisis in the sports field abn 97
Next Stories
1 डाव मांडियेला : ‘करोनाकोंडी’वर उतारा
2 युवराजचा रवी शास्त्रींना खोचक टोला, म्हणाला…
3 जनजागृतीसाठी पंतप्रधानांची खेळाडूंना पंचसूत्री
Just Now!
X