संतोष सावंत

‘‘युरोपातील पुराणकथांमध्ये ऑस्ट्रालिस नावाच्या खंडाचा उल्लेख आढळतो. अठराव्या शतकात मॅथ्यू फ्लिंडर्स या दर्यावदी खलाशाने जेव्हा एका अज्ञात खंडाची प्रदक्षिणा पूर्ण केली, तेव्हा त्याला वाटले पुराणकथांमध्ये उल्लेख केलेला हाच तो खंड! त्याने नकाशावर त्या खंडाची नोंद ऑस्ट्रेलिया अशी केली आणि या खंडाला ऑस्ट्रेलिया असे नाव मिळाले.’’ शास्त्रीजी धीरगंभीर आवाजात सांगत होते आणि महाराज विराट, महाराज रोहित, सरसेनापती महेंद्र, तोफखाना प्रमुख जसप्रीत आणि भुवनेश्वर असे भारतपूरचे आघाडीचे सारेच योद्धे लक्ष देऊन ऐकत होते. रात्रीची वेळ होती, परंतु त्या अंधारातही शास्त्रींच्या चेहऱ्यावरचे तेज लपत नव्हते. त्यांचे नाव रवी होते, ते काही उगीच नाही!

ज्या दिवसापासून शास्त्रीजींनी भारतपूरची जबाबदारी स्वीकारली होती, तेव्हापासून या सैन्याच्या पराक्रमाला नवी झळाळी प्राप्त झाली होती. अनेक दिग्विजयी देशांना त्यांनी आपल्या तलवारीचे पाणी पाजले होते. परंतु उद्याचे युद्ध अटीतटीचे असणार होते. उद्याचे युद्ध हे जिंकणे किंवा हरणे, यापेक्षाही सन्मानाचे युद्ध असणार होते आणि म्हणूनच शास्त्रीजी त्यांना धोक्याची जाणीव करून देत होते.

‘‘या खंडाचे मूळ रहिवाशी आदिवासी होते. हजारो वर्षे ते अत्यंत साधी जीवनशैली जगत होते. ही जवळपास ३० ते ५० हजार वर्षे जुनी संस्कृती युरोपियन लोकांनी नष्ट केली. येथील मूळ आदिवासींना त्यांनी हुसकावून लावले. ज्यांनी विरोध केला, त्यांच्या कत्तली करण्यात आल्या. सगळे उद्ध्वस्त करण्यात आले,’’ शास्त्रीजींनी आपल्या शब्दातून तो काळ सर्वाच्या डोळ्यांसमोर उभा केला. अन्यायाचे ते विदारक वर्णन ऐकून सैन्यात नव्यानेच भरती झालेला योद्धा हार्दिक पेटून उठला. आपण हे युद्ध जिंकायचेच असा निर्धार त्याने व्यक्त केला.

‘‘तुझी धडाडी उत्तम आहे, बाळा! तुझ्या शौर्याविषयी माझ्या मनात यत्किंचित शंकाही नाही, पण हे युद्ध जिंकायचे असेल तर महापराक्रम गाजवावा लागेल. कारण याआधी झालेल्या अनेक युद्धात आपल्याला पराभव पत्करावा लागलेला आहे,’’ शास्त्रीजींनी त्याला परिस्थितीची योग्य जाणीव करून दिली. सर्वाच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव पाहून त्यांनी आपला डावा हात हवेत उंचावला. तोंडाने काहीतरी पुटपुटत त्यांनी तो वेगाने खाली आणला आणि हवेतच फिरवला. त्याबरोबर एक धूसर पडदा तयार झाला. हळूहळू चित्र स्पष्ट  झाले. शत्रूची छावणी दिसू लागली. महाराज फिंच आपल्या सैन्यासोबत रणनीती आखत होते. सुपरमॅन स्टार्क, थॉर मॅक्सवेल, आयर्नमॅन वॉर्नर, स्पायडरमॅन कॅरी, हल्क स्मिथ अशी सुपर हिरोंची फौजच त्यांनी लढण्यासाठी जमा केलेली दिसत होती.

सर्वाच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे सावट दिसू लागले. तेवढय़ात आपल्या पिळदार मिशांवर ताव देत बाहुबली शिखर पुढे आला. त्याने शास्त्रीजींना साष्टांग नमस्कार केला. ‘‘विजयी भव!’’ त्यांच्या तोंडून आशीर्वादपर उद्गार निघाले. बाहुबली शिखरने आपल्या मांडीवर थाप मारत गर्जना केली आणि संपूर्ण सैन्यात बळ संचारले.

दुसऱ्या दिवशी निकराचे युद्ध सुरू झाले. देशोदेशीच्या हेरांचे या युद्धाकडे बारीक लक्ष होते. सुरुवातीला बाहुबलीने सावध पवित्रा घेतला. सुपरमॅन स्टार्कने त्याला खिंडीत पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण बाहुबली बधला नाही. त्याने सावधपणे आक्रमणाची धार वाढवत नेली. त्याला थोपवण्यासाठी थॉर मॅक्सवेल आणि स्पायडरमॅन कॅरी यांच्यासारख्या कसलेल्या योद्धय़ांनी निकराचे प्रयत्न केले. महाराज फिंच यांनी अनेकदा व्यूहरचना आखली. पण आज बाहुबली कोणालाच ऐकणार नव्हता. त्याला फक्त त्याचे विजय मिळवण्याचे ध्येय दिसत होते. त्याने पराक्रमाची पराकाष्ठा केली. १०९ घावात ११७ वीर धुळीला मिळवले. तब्बल १६ वेळा शत्रुपक्षाच्या आक्रमणाला पार भिरकावून दिले. त्याच्या या पराक्रमाने प्रेरित होऊन भारतपूरच्या संपूर्ण सैन्यानेच युद्ध गाजवले. शेवटी विजयाचा शंखध्वनी झाला आणि ‘बाहुबली.. बाहुबली’ अशा जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमला!