गौरव जोशी

भारतीय क्रिकेटरसिकांना उत्सुकता असलेला भारत-पाकिस्तान हा महत्त्वाचा सामना पार पडला असला तरी लॉर्ड्सवर आज होणारा इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा सामना दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दोन्ही देशांमध्ये सलोख्याचे वातावरण असले तरी क्रिकेटच्या मैदानावर हे देश एकमेकांचे कट्टर आणि परंपरागत शत्रू म्हणून ओळखले जातात. ऑस्ट्रेलियन नागरिकांना इंग्लंडमधील नागरिकांबद्दल आपुलकी आहे. परंतु ऑस्ट्रेलिया हा एक छोटासा देश आहे, अशी इंग्लंडमधील नागरिकांची  धारणा आहे. अडीचशे वर्षांपूर्वी गुन्हेगारी करणाऱ्यांना शिक्षा म्हणून या देशात पाठवले जायचे. आता याच ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू गेली १०० वष्रे इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला हरवतात.

हा सामना महत्त्वाचा आहे, कारण ऑस्ट्रेलियाचा संघ ऑगस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला नाही तरी पुढे येणारी अ‍ॅशेस मालिका त्यांना जिंकायची आहे; परंतु इंग्लंडमधील नागरिकांना विश्वचषक आणि अ‍ॅशेस हे दोन्ही विजय त्यांच्या नावावर पाहिजे आहेत. ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस जिंकून १८ वर्षे झाली आहेत; परंतु या कालावधीत त्यांनी तीन विश्वचषक जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यास पुढील दोन सामन्यांनंतर इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हानसुद्धा धोक्यात येऊ शकते. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आणले, तर  येथील नागरिकांचा त्यांच्याविषयी असलेली शत्रुत्वाची भावना अधिक तीव्र होऊ शकते.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील शत्रुत्वाला क्रिकेट मैदानावर प्रारंभ झाला आहे. १९७३पर्यंत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत एकच होते. ५०-६० वर्षांपूर्वी हे संघ सामना सुरू होण्यापूर्वी आपल्या राष्ट्रध्वजाकडे पाहायचे, तेव्हा ते इंग्लंडचेच राष्ट्रगीत लावले जायचे. ऑस्ट्रेलियामध्ये अजून राष्ट्राध्यक्ष हे पद नाही. राष्ट्राध्यक्षाऐवजी तेथील सर्व कामकाज गव्हर्नल जनरल पाहतो आणि त्याची नेमणूक ही इंग्लंडची राणी करते.

इंग्लंडमधील कोणत्याही शाही घराण्यात मूल झाले तरी त्याची मोठी दखल ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांमध्ये घेतली जाते. इंग्लंडमध्ये जी शाही व्यवस्था आहे, त्याच्यावर अजूनही काही ऑस्ट्रेलियन नागरिकांचे प्रेम आहे. परंतु क्रिकेटच्या मैदानावर इंग्लंडसोबत खेळणे म्हणजे या दोन्ही संघांसाठी एक महायुद्धच आहे. मंगळवारी होणाऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला संबोधून अनेक गाणी तयार केली आहेत. ती गाणी पुढील तीन महिने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ऐकावी लागणार आहेत. इंग्लंडची ‘बार्मी-आर्मी’ ही गाणी रचण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही गाणी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर जो चेंडू फेरफार घोटाळा केला, त्या स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर आधारित असतील. ही सगळी गाणी लॉर्ड्सच्या मैदानावर ऐकायला मिळणार आहेत.

ऑस्ट्रेलियामधील काही मंडळी व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये राहतात. हा सामना जिंकल्यानंतर त्यांच्या कार्यालयांमध्ये ऑस्ट्रेलियाचे कपडे आणि झेंडे घेऊन अभिमानाने मिरवण्यासाठी ते उत्सुक आहेत. हेच इंग्लंडमधील लोकांना नको आहे. गेल्या चार वर्षांत इंग्लंडच्या नव्या नियमानुसार बऱ्याच ऑस्ट्रेलियन नागरिकांना दोन वर्षांपेक्षा जास्त काळ इंग्लंडमध्ये कार्यरत राहता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. अ‍ॅशेसचे सामने किंवा १९९९चा विश्वचषक असो, ऑस्ट्रेलियन नागरिकांची सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी असायची; परंतु सध्या ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या वस्त्या कमी झाल्याने क्रिकेटप्रेमींची चाहत्यांची संख्या रोडावली आहे.

कारण आता नियम बदलले आहेत. या दोन्ही देशांतील पूर्वीचे राजकीय संबंध मजबूत असले तरी आता ते चित्र थोडे बदलायला लागले आहे आणि क्रिकेटमधील नातेदेखील बदलले आहे. १९९९च्या विश्वचषकात जो ऑस्ट्रेलियाचा संघ होता तसा तो आता राहिला नाही. यातच इंग्लंडमधील नागरिकांना आनंद आहे. पुढील तीन महिने ऑस्ट्रेलियाला हरवून तो विजय साजरा करण्यातच इंग्लंडमधील नागरिकांचे सुख सामावलेले असेल.