सुप्रिया दाबके

करोना साथीच्या काळात मेऐवजी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे आयोजन हे इगा श्वीऑनटेक आणि राफेल नदाल यांच्या अद्वितीय कामगिरीने यशस्वी ठरले. अवघ्या १९ वर्षांच्या पोलंडच्या श्वीऑनटेकने लहान वयात ग्रॅँडस्लॅम जिंकण्याचा महिलांमधून इतिहास घडवला. ‘लाल मातीवरील राजा’ हे बिरूद मिरवणाऱ्या नदालने विक्रमी १३वे ग्रॅँडस्लॅम जिंकले. भारताच्या बाबतीत सांगायचे तर एकही खेळाडू फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरला नाही.

लाल मातीवर पुन्हा नदालचे वर्चस्व

स्पेनच्या राफेल नदालने ऐतिहासिक १३व्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याबरोबरच लाल मातीवरील वर्चस्व अबाधित राखले. अव्वल प्रतिस्पर्धी सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचला तीन सेटमध्येच पराभूत करत नदालने स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररच्या विक्रमी २० ग्रॅँडस्लॅम विजेतेपदांचीही बरोबरी केली. दुसऱ्या मानांकित नदालने यंदाच्या या स्पर्धेत एकही सेट गमावलेला नाही, ही महत्त्वाची बाब आहे. या कामगिरीची पुनरावृत्ती नदालने अंतिम फेरीत अग्रमानांकित जोकोव्हिचसारख्या प्रतिस्पर्धीविरुद्धही कायम ठेवली. योगायोग म्हणजे अंतिम फेरीतील नदालचा विजय हा फ्रेंच स्पर्धेतील १००वा विक्रमी विजय ठरला. नदालला गेल्या महिन्यात इटालियन खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे लाल मातीवरील हंगामाची सुरुवात नदालला पराभवाने करावी लागली होती. मात्र फ्रेंच ग्रॅँडस्लॅमवर राज्य माझेच अशा थाटात नदालने जोकोव्हिचला हार मान्य करायला लावली.

पॅरिसच्या कडाक्याच्या थंडीत ही स्पर्धा यंदा खेळण्यात आली. थंडीमुळे यंदा लाल मातीवर चेंडू उसळी घेत नसल्याचे चित्र होते. उसळी घेणारे चेंडू खेळण्यात नदालचा विशेष हातखंडा समजला जातो. मात्र वातावरणात कितीही बदलाचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. वास्तविक नदालची स्पर्धेतील एक लढत मध्यरात्री दीड वाजता संपली होती. त्या वेळेस पॅरिसमधील तापमान आठ अंशाच्या घरात होते. नदालने त्यानंतर वेळापत्रकाच्या वेळा ठरवण्यावरून टीकाही केली होती.

नदाल आणि फेडरर यांच्यापैकी आता विक्रमी २१वे ग्रॅँडस्लॅम कोण पटकवणार याचीच चर्चा रंगली आहे. नदाल ३४ वर्षांचा आहे तर फेडरर ३९ वर्षांचा आहे. फेडरर दुखापतीमुळे यंदा अमेरिकन आणि फ्रेंच स्पर्धेत खेळू शकला नाही. त्यातच फेडरर २०१८मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यावर एकही ग्रॅँडस्लॅम जिंकू शकलेला नाही. फेडरर, नदाल आणि जोकोव्हिच या त्रिकुटावर वर्चस्व मिळवण्याची संधी सध्या एकाही टेनिसपटूमध्ये नाही, हे पुन्हा यानिमित्ताने सिद्ध झाले.

वडिलांचे स्वप्न साकारणारी श्वीऑनटेक

टेनिस ग्रॅँडस्लॅम विजेत्यांमध्ये अमेरिका आणि युरोप खंडाचे वर्चस्व नेहमीच राहिले आहे. यापैकी युरोपमधून स्वित्र्झलड, स्पेन, सर्बिया, जर्मनी यांसारख्या देशांमधील विजेते अधिक आहेत. मात्र आता त्यांच्यात पोलंडचाही समावेश झाला आहे. युवा खेळाडू श्वीऑनटेक ग्रॅँडस्लॅम एकेरी जिंकणारी पोलंडची पहिली टेनिसपटू ठरली आहे. सोफिया केनिनला अंतिम फेरीत नमवून श्वीऑनटेकने ही स्पर्धा जिंकल्यानंतर रोलॅँड गॅरोस या फ्रान्सच्या टेनिस कोर्टला ‘पोलंड गॅरोस’ असे म्हटले गेले. या स्पर्धेत तिने गतउपविजेती मार्केटा वॉँड्रोसुवा आणि दुसरी मानांकित सिमोना हॅलेप यांनाही पराभूत करून लक्ष वेधून घेतले होते. पोलंडची श्वीऑनटेक फ्रेंच ग्रॅँडस्लॅम जिंकेल असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र संपूर्ण स्पर्धेत एकही सेट न गमावता तिने ज्या प्रकारे खेळ उंचावला ते पाहता श्वीऑनटेक नवी टेनिस तारका ठरली आहे.

महिलांमध्ये गेल्या काही वर्षांत नवनवीन ग्रॅँडस्लॅम विजेत्या बघायला मिळाल्या आहेत. मागील १४ ग्रॅँडस्लॅममध्ये ९ विजेत्यांनी प्रथमच ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. या वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत केनिन, अमेरिकन स्पर्धेत नाओमी ओसाका आणि आता श्वीऑनटेक यांच्या रूपाने महिला टेनिसपटूंमधील गुणवत्ता जगासमोर आली आहे. प्रत्येक टेनिसपटूचा ग्रॅँडस्लॅम जिंकण्यापर्यंतचा संघर्ष हा आगळावेगळा आहे. श्वीऑनटेकच्या बाबतीत सांगायचे तर तिचे वडील हे १९८८मधील सेऊल ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले नौकानयनपटू आहेत. तिच्या वडिलांनीच तिला खेळात कारकीर्द घडवायची प्रेरणा दिली. वैयक्तिक क्रीडा प्रकार निवडण्याचा श्वीऑनटेकच्या वडिलांचा विशेष आग्रह होता. वैयक्तिक क्रीडा प्रकारात नाव उंचावण्याची सर्वाधिक संधी असते, असे त्यांचे म्हणणे होते. वयाच्या १७व्या वर्षीच जागतिक क्रमवारीत पहिल्या १००मध्ये तिने स्थान मिळवून दाखवले होते. २०१८मध्ये विम्बल्डनमध्ये कनिष्ठ प्रकारातील विजेतेपदही श्वीऑनटेकने तिच्या नावे केले होते. अर्थातच तिच्या वडिलांचे म्हणणे खरे ठरले. कारण लहान वयात मोठी उंची त्यांच्या मुलीने गाठून दाखवली आहे. आता ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची जिद्द तिने बाळगली आहे.