सुप्रिया दाबके

६८ पैकी ५७ ग्रॅँडस्लॅम त्रिमूर्तीकडे

नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या त्रिमूर्तीचे वय वाढत असेल, मात्र वाढत्या वयाप्रमाणे त्यांच्या ग्रॅँडस्लॅम जेतेपदांचा आकडाही वाढत आहे. म्हणजेच जोकोव्हिच, नदाल आणि फेडरर यांच्यासाठी हा फक्त ‘खेळ ग्रॅँडस्लॅम आकडय़ांचा’ आहे असेच म्हणायला हरकत नाही. याउलट महिलांमध्ये सेरेना विल्यम्स आपल्या दर्जाला साजेशी खेळत नसल्याने महिला एकेरीच्या नवनवीन विजेत्या टेनिसजगताला पाहायला मिळत आहेत.

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोव्हिचला पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने पाच सेटपर्यंत झुंजवले. अर्थातच पहिला सेट जोकोव्हिचने जिंकल्यावर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये थीमने बाजी पलटवली. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचचा खेळ पाहता तो क्षणभर हार मानतो की काय असेच चित्र दिसू लागले होते. मात्र ‘जणू हा माझाच गड आहे’ असे म्हणत जोकोव्हिचने विलक्षणरीत्या सामन्यात पुनरागमन केले. चौथ्या आणि पाचव्या सेटमध्ये जोकोव्हिचसमोर थीम पूर्णपणे डगमगला. विक्रमी आठवे ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅम तर जोकोव्हिचने पटकावलेच, पण पुन्हा अग्रस्थानही प्राप्त केले.

अग्रस्थानाची स्पर्धा याबरोबरच जोकोव्हिच, नदाल आणि फेडरर यांच्यातच कायम राहिली आहे. या तिघांनी गेल्या ६८ पैकी ५७ ग्रॅँडस्लॅम जेतेपदे पटकावत सध्या तरी अन्य खेळाडूंना संधी नसल्याचे वारंवार दाखवले आहे. अर्थातच थीमने उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालला नमवताना सर्वोच्च खेळ केला. तसेच जोकोव्हिचला अंतिम लढतीत विजयासाठी झुंजवले. मात्र अजूनही ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी लागणारा अनुभव थीमकडे मोक्याच्या क्षणी कमी पडत असल्याचे दिसते. कारण २०१८ आणि २०१९च्या फ्रेंच ग्रॅँडस्लॅमच्या अंतिम फेरीतही थीमला पराभव पत्करावा लागला होता. हे सर्व नमूद करण्याचे कारण म्हणजे जोकोव्हिचने जसा ऑस्ट्रेलियाचा गड अबाधित राखला आहे, तसेच नदालचे फ्रेंच ग्रॅँडस्लॅमवर वर्चस्व आहे. फ्रेंच स्पर्धा विक्रमी १२ वेळा नदालने जिंकली आहे. फेडरर (२००९) आणि जोकोव्हिच (२०१६) यांना एकदाच फ्रेंच ग्रॅँडस्लॅम जिंकता आली आहे. मात्र जोपर्यंत नदाल त्याच्या आवडत्या फ्रेंच कोर्टवर आहे, तोपर्यंत त्याला तिथे नमवणे अवघड आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत नदाल उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला आणि स्वित्र्झलडचा फेडरर दुखापतीमुळे उपांत्य लढतीत जोकोव्हिचला झुंज देऊ शकला नाही. अर्थातच नदालला ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅममध्ये (२००९मध्ये एकमेव जेतेपद) फारसे यश मिळालेले नाही, हीदेखील तितकीच महत्त्वपूर्ण बाब आहे. याउलट फेडररने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. फेडररने २०१८च्या ऑस्ट्रेलियन जेतेपदानंतर एकही ग्रॅँडस्लॅम जिंकला नाही, मात्र प्रत्येक ग्रॅँडस्लॅम स्पर्धेची तो किमान उपांत्य फेरी गाठत आहे. फेडरर (२० ग्रॅँडस्लॅम), नदाल (१९ ग्रॅँडस्लॅम) आणि जोकोव्हिच (१७ ग्रॅँडस्लॅम) यांचे आकडे पाहता ‘खेळ ग्रॅँडस्लॅम आकडय़ांचा’ हे सातत्याने सिद्ध होते. या तिघांची गेल्या काही वर्षांमध्ये टेनिस जगताला इतकी सवय झाली आहे की त्यांच्याशिवाय टेनिस बघणे हेच अशक्यप्राय वाटत आहे.

सेरेनानंतर कोण?

गेल्या तीन वर्षांमध्ये महिला एकेरीत चारही ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धामध्ये विजेता ठरवणे कठीण जात आहे, कारण सेरेना विल्यम्ससारखे वर्चस्व एकाही महिला टेनिसपटूला गाजवता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महिला टेनिसपटूंमध्ये गुणवत्तेची निश्चितच कमी नाही. मात्र ग्रॅँडस्लॅम पातळीवर वर्चस्व राखण्यासाठी लागणारे सातत्य आताच्या महिला टेनिसपटूंमध्ये दिसत नाही. सेरेनाला २०१७ची ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकल्यानंतर एकही ग्रॅँडस्लॅम पटकावता आलेले नाही. अर्थातच तेव्हापासून वर्षभरातील चार ग्रॅँडस्लॅममध्ये विविध महिला टेनिसपटू विजेत्या झालेल्या दिसल्या आहेत. जपानची नाओमी ओसाका आणि रोमानियाची सिमोना हॅलेप या दोघींनाच गेल्या तीन वर्षांत दोन ग्रॅँडस्लॅम जिंकता आल्या आहेत. मार्गारेट कोर्ट, मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, सेरेना विल्यम्स यांनी ज्याप्रकारे महिला टेनिसवर सातत्यपूर्ण वर्चस्व गाजवले, तशा प्रकारचे वर्चस्व गाजवणारी टेनिसपटू येत्या काही वर्षांत तरी गवसेल, याकडे टेनिसक्षेत्र आशेने पाहात आहे.

supriya.dabke@expressindia.com