आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांनी सातत्यासह अफलातून खेळ करताना वर्चस्व गाजवले. सानिया मिर्झा आणि लिएण्डर पेस यांनी मार्टिना हिंगिससह खेळताना ग्रँड स्लॅम जेतेपदांमध्ये सातत्य राखले. रोहन बोपण्णा, युकी भांब्री यांनीही जिंकताना सातत्यावर भर दिला. प्रदीर्घ काळानंतर इंग्लंडचे डेव्हिस चषकाचे स्वप्न साकार झाले. एकूणच यंदाचे वर्ष घोटीव सातत्याची महती अधोरेखित करणारे ठरले.

जोकोव्हिचच!

महानतेसाठी सातत्याचा मापदंड कळीचा ठरतो. यंदाच्या वर्षांत नोव्हाक जोकोव्हिचने अद्भुत सातत्यासह खेळ करताना दिग्गजतेकडे झेप घेतली. ८२-६ ही जोकोव्हिचची यंदाच्या वर्षांतली जय-पराजयाची कामगिरीच त्याच्या वर्चस्वाची कहाणी कथन करते. मर्यादित गुणवत्तेला प्रचंड मेहनत आणि अभ्यासाची जोड दिल्यास काय किमया होऊ शकते, याचा प्रत्यय जोकोव्हिचने यंदाच्या वर्षांत करून दिला. पुरुष गटातल्या शेरास-सव्वाशेर प्रतिस्पध्र्याना नमवत जोकोव्हिचने यंदा तीन ग्रँड स्लॅम जेतेपदांसह ११ जेतेपदे पटकावली. वर्षांअखेरीस जागतिक क्रमवारीत अव्वल आठ खेळाडूंमध्ये रंगणाऱ्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स या स्पर्धेचे सलग चौथ्यांदा जेतेपद पटकावणारा जोकोव्हिच पहिला खेळाडू ठरला. क्ले कोर्टवरच्या कामगिरीत आमूलाग्र सुधारणा करत जोकोव्हिचने तब्बल नऊ वर्षांनंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेत राफेल नदालला पराभवाचा धक्का दिला. मात्र जेतेपदाने हुलकावणी दिल्याने करिअर स्लॅमचे जोकोव्हिचचे स्वप्न अधुरेच राहिले. आहार, विचार आणि आचरण याबाबत अत्यंत काटेकोर राहात, शारीरिक दुबळेपणावर मात करत जोकोव्हिचने जपलेले सातत्य अचंबित करणारे आहे. हार्ड, क्ले आणि ग्रास अशा सर्व प्रकारच्या कोर्ट्सवर वर्चस्व गाजवत जोकोव्हिचने सर्वसमावेशकतेचा पैलूही अंगीकारला. म्हणूनच हे ‘जोकोव्हिच वर्ष’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सेरेना.. हरेना!

महिला टेनिसमध्ये असलेली सेरेना विल्यम्सची जेतेपदांवरची मक्तेदारी यंदाही कायम राहिली. ३४व्या वर्षीही अफाट ऊर्जा आणिजिंकण्याची ऊर्मी कायम असलेल्या सेरेनाने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन अशा तीन ग्रँड स्लॅम जेतेपदांवर कब्जा केला. दुखापतींनी डोके वर काढल्याने अमेरिकन खुल्या स्पर्धेत तिला झटपट गाशा गुंडाळावा लागला. यामुळे दुर्मीळ असा ‘कॅलेंडर स्लॅम’चा विक्रमही हुकला. मात्र अजूनही सेरेनाला पर्याय नसल्याचे सिद्ध झाले.

नवे ग्रँड स्लॅम विजेते

स्टॅनिसलॉस वॉवरिन्का आणि फ्लॅव्हिआ पेनेट्टा या दोघांच्या रूपात टेनिसविश्वाला नवे ग्रँड स्लॅम विजेते मिळाले. जोकोव्हिच-नदाल-फेडरर या त्रिकुटाच्या सद्दीमुळे दुसऱ्या फळीत वावरणाऱ्या वॉवरिन्काने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या लाल मातीवर भन्नाट प्रदर्शन करत जेतेपदाची कमाई केली. फेडरर आणि जोकोव्हिचला चीतपट करत वॉवरिन्काने जेतेपदापर्यंत केलेली वाटचाल संस्मरणीय ठरली. दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातले चढउतार आणि दुखापतींचा ससेमिरा झेलत पेनेट्टाने मिळवलेले जेतेपद चकित करणारे होते. प्रमुख खेळाडूंनी गाशा गुंडाळल्यामुळे पेनेट्टाचा जेतेपदापर्यंतचा मार्ग सोपा झाला, हे नाकारता येणार नाही.

सानिया सुसाट

एखादा निर्णय क्रीडापटूंच्या कारकीर्दीचा आयामच बदलवतो. यंदा मार्च महिन्यात सानियाने मार्टिना हिंगिससह खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ही जोडी जेतेपदांसाठी समानार्थी शब्दच ठरला. सलग २१ सामने अपराजित राहण्याचा विक्रम नावावर करतानाच या जोडीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. दोन ग्रँड स्लॅम जेतेपदांसह या जोडीने नऊ जेतेपदांवर नाव कोरले. डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेचे जेतेपद पटकावत या जोडीने आपली ‘अपूर्वाई’ दाखवून दिली. एकमेकींची ताकद आणि कच्चे दुवे समजून घेऊन परस्परपूरक खेळ करत या जोडीने दुहेरीत कसे खेळावे याचा वस्तुपाठ सादर केला. ३४ वर्षीय हिंगिससह खेळण्याचा धाडसी निर्णय सानियाने घेतला. मात्र याच निर्णयामुळे यंदाचे वर्ष तिच्यासाठी कारकीर्दीतला सवरेत्कृष्ट कालखंड ठरला.

पेसचा विजयरथ अविरत

४२व्या वर्षीही चापल्य, तंदुरुस्ती, ऊर्जा आणि कौशल्य यांचे अनोखे उदाहरण असलेल्या लिएण्डर पेसने यंदाच्या वर्षांत मार्टिना हिंगिससह खेळताना ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या जेतेपदाची कमाई केली. वैयक्तिक आयुष्यातले कटू क्षण बाजूला सारत कोर्टवर १०० टक्के योगदान देत पेसने मिळवलेले यश युवा खेळाडूंना प्रेरणादायी आहे.

बोपण्णाची धमाल

लिएण्डर पेस आणि महेश भूपती या महारथींच्या चर्चेत पिछाडीवर राहिलेल्या रोहन बोपण्णाने रोमानिआच्या फ्लोरिन मर्गेआसह खेळताना दिमाखदार कामगिरी केली. सिडनी, दुबई, माद्रिद, स्टुटगार्ड या चार स्पर्धाच्या जेतेपदासह बोपण्णा-मर्गेआ जोडीने एटीपी वल्र्ड टूर फायनल्स स्पर्धेत उपविजेतेपद नावावर केले. शानदार प्रदर्शनाच्या बळावर बोपण्णाने दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावले.

युकी अव्वल शंभरात

युकी भांब्रीच्या रूपात भारतीय टेनिससाठी यंदाचे वर्ष संस्मरणीय ठरले. २०१० नंतर जागतिक क्रमवारीत अव्वल शंभर खेळाडूंमध्ये स्थान पटकावण्याचा मान युकीने पटकावला. सातत्याचा अभाव आणि दुखापती यामुळे युकीची कारकीर्द झाकोळली होती. सर्व प्रतिकूल गोष्टींवर मात करत युकीने क्रमवारीत ८९वे स्थान मिळवत कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.

सुमीत चमकला

दिल्लीजवळच्या झझ्झर गावच्या सुमीत नागलने यंदा विम्बल्डन स्पर्धेत कनिष्ठ गटात दुहेरीचे जेतेपद पटकावले. सुमीतने व्हिएतनामच्या ल्यू होआंग नामसह खेळताना रेइली ओपेलका आणि अकिरा सँटिलान जोडीवर ७-६ (७-४), ६-४ अशी मात केली.

एक व्रात्य मुलगा

युवा टेनिसपटूंमधील प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या निक कुर्यिगासची गणना होते. मात्र स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला त्याच्या गर्लफ्रेंडसंदर्भात आक्षेपार्ह उद्गार काढल्यामुळे कुर्यिगासला २८ दिवसांच्या बंदीला सामोरे जावे लागले. वॉवरिन्काच्या वैयक्तिक आयुष्यावर कुर्यिगासने केलेल्या शेरेबाजीवर टेनिस वर्तुळात जोरदार टीका झाली. विम्बल्डन स्पर्धेत जाणीवपूर्वक संथ, धीमा आणि खराब खेळ केल्याचा आरोपही त्याच्यावर झाला.

इंग्लंडचे स्वप्न साकार

इंग्लंडचा लाडका सुपुत्र असलेल्या अँडी मरेने अफलातून कामगिरीसह इंग्लंडचे डेव्हिस चषकाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. तब्बल ७९ वर्षांनंतर टेनिस विश्वातल्या प्रतिष्ठेच्या डेव्हिस चषकावर इंग्लंडने नाव कोरले. चुरशीच्या अंतिम लढतीत बेल्जियमवर ३-१ अशी मात करत इंग्लंडने ऐतिहासिक विजय संपादन केला. डेव्हिस चषकात यंदा एकेरी आणि दुहेरी मिळून ११ लढतीत विजय मिळवणारा अँडी मरे इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

parag.phatak@expressindia.com