यशाचे नवे सूत्र!

एबी डी’व्हिलियर्स, हशिम अमला, डेल स्टेन हे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे वैभव हरपल्यानंतर हा संघ झिम्बाब्वेसारखा तळागाळातला वाटू लागला आहे.

रविवार विशेष

प्रशांत केणी

वर्णद्वेषाच्या बंदीनंतर २७ वर्षांपूर्वी जागतिक क्रिकेटच्या नकाशावर झोकात पुनरागमन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने काही वर्षांतच बलाढय़ संघांच्या पंक्तीत आपले स्थान अधोरेखित केले होते. परंतु सद्य:स्थितीत या पंक्तीत आफ्रिकेची गणना करण्यास कुणीही धजावणार नाही. अशा ‘लिंबूटिंबू’ संघाविरुद्ध भारताने कसोटी मालिकेत मिळवलेले ३-० असे निर्भेळ यश हे कौतुकास्पद ठरण्यापेक्षा अपेक्षितच होते. परंतु फिरकी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टय़ा तयार करून मर्दुमकी गाजवण्याची परंपरा या मालिकेत मोडीत काढत वेगवान गोलंदाजांचाही या यशात सिंहाचा वाटा असणे, हे प्रशंसनीय म्हणता येईल.

एबी डी’व्हिलियर्स, हशिम अमला, डेल स्टेन हे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे वैभव हरपल्यानंतर हा संघ झिम्बाब्वेसारखा तळागाळातला वाटू लागला आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही त्यांच्या खराब कामगिरीचा प्रत्यय जागतिक क्रिकेटने घेतला. त्यामुळेच एकंदर झगडणाऱ्या आफ्रिकेकडून भारताविरुद्ध लढण्याबाबत माफक अपेक्षाच केल्या जात होत्या. विशाखापट्टणमच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात आफ्रिकेच्या फलंदाजांनी उत्तम प्रतिकार केला. त्यामुळे हा सामना पाचव्या दिवसापर्यंत लांबला. त्यामुळे भारताला दोनदा फलंदाजीसाठी उतरावे लागले. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतही भारताचे विजयाचे सूत्र एकसमान होते. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारावी आणि भारताने पहिल्या डावातच पाचशेचा डोंगर उभारावा. मग गोलंदाजांनी आफ्रिकेचा डाव फॉलोऑन देत दोनदा गुंडाळावा. ही योजना यशस्वी झाली, कारण मालिकेतील पाचही डावांत आफ्रिकेच्या फलंदाजांकडून तोलामोलाचा प्रतिकारच झाला नाही.

सलामीचे स्थैर्य

भारतीय कसोटी संघाचा सलामीच्या जोडीचा प्रश्न या मालिकेने संपुष्टात आणला. गेल्या काही सामन्यांत मयांक अगरवाल सलामीवीर म्हणून स्थिरावत असताना त्याला तोलामोलाचा साथीदार मात्र सापडत नव्हता. पर्याय अजमावण्याच्या याच प्रयत्नांचा भाग म्हणून कसोटीत अधूनमधून मधल्या फळीत खेळणाऱ्या रोहित शर्माला सलामीला आणण्याचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग रोहितने मालिकावीर पुरस्कार जिंकत यशस्वी ठरवला. या मालिकेत रोहितने तीन शतकांसह (एक द्विशतक) १३२.२५च्या सरासरीने एकूण ५२९ धावा काढल्या. मयांकनेही त्याला उत्तम साथ देत दोन शतकांसह (एक द्विशतक) ३४० धावा केल्या. सलामीने स्थर्य दिल्यामुळे भारताला धावांचे इमले बांधता आले. विराटनेही एका द्विशतकासह एकूण ३१७ धावांचे योगदान दिले. याशिवाय अजिंक्य रहाणे (२१६ धावा) आणि रवींद्र जडेजा (२१२ धावा) यांनीही कठीण परिस्थितीत धीराने फलंदाजी केली. त्या तुलनेत चेतेश्वर पुजाराला या मालिकेत आपली छाप पाडता आली नाही.

साहाच सरस

यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतीतून सावरत दिमाखदार पुनरागन करीत आपल्या कौशल्याने लक्ष वेधले. या मालिकेआधीच साहा हा जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक असल्याचे कोहलीने नमूद केले होते. कर्णधाराचा हा विश्वास सार्थ करीत साहाने या मालिकेत यष्टीपाठी १२ बळी (११ झेल आणि एक यष्टीचीत) मिळवले. साहाच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान बळकट करण्यासाठी झगडत होता. परंतु साहाने आपले महत्त्व सिद्ध केले.

कसोटीचे गांभीर्य

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सर्वसमावेशक धोरण आणि अन्य शहरांमध्येही क्रिकेटरसिकांपर्यंत पोहोचता यावे, या उद्देशाने आफ्रिकेविरुद्धचे कसोटी सामने हे विशाखापट्टणम, पुणे आणि रांची या ठिकाणी आयोजित केले होते. परंतु चाहत्यांकडून या सामन्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे कोहलीने  नाराजी प्रकट केली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बेंगळूरु या पाच प्रमुख कसोटी केंद्रांवरच सामने व्हावेत, अशी अपेक्षा कोहलीने प्रकट केली. त्याच्या भूमिकेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

प्रभावी वेगवान मारा

आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा या मालिकेत खेळू शकणार नसल्याने भारताच्या वेगवान माऱ्याबाबत चिंता प्रकट केली जात होती. परंतु तीन सामन्यांमध्ये आफ्रिकेच्या ६० बळींपैकी एकूण २६ बळी हे मोहम्मद शमी (१३ बळी), उमेश यादव (११ बळी) आणि इशांत शर्मा या त्रिकुटाने घेत भारताच्या विजयातील वेगवान माऱ्याचे महत्त्व स्पष्ट केले. फिरकी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टय़ा तयार करून प्रतिस्पध्र्याना शरण आणायचे, हे भारताचे कसोटी यशाचे सूत्र या वेळी वापरण्यात आले नाही. पण कोणत्याही खेळपट्टीवर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या रविचंद्रन अश्विन (१५ बळी) आणि रवींद्र जडेजा (१३ बळी) यांचेही विजयात मोलाचे योगदान होते.

prashant.keni@expressindia.com

READ SOURCE