26 February 2021

News Flash

हे  ‘भगवान’!

पाच वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला कांस्यपदकाने गौरवण्यात आले.

जय भगवान

पाच वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला कांस्यपदकाने गौरवण्यात आले. आशियाई क्रीडा स्पर्धेत, आशिया खंडातील अव्वल बॉक्सिंगपटूंना टक्कर देत दोन वेळा त्याने पदकांची कमाई केली. लंडन ऑलिम्पिकमध्येही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. तो जय भगवान. समस्त भारतीयांसाठी कौतुकाचा विषय ठरलेला हरयाणाचा खेळाडू.

आता रिओ ऑलिम्पिकचे पडघम वाजू लागलेले असताना क्रीडा विश्वातल्या त्या सर्वोच्च व्यासपीठावर देशाला पदक मिळवून देण्यासाठी त्याची जय्यत तयारी सुरू असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र त्याच्या जीवनावर एक विचित्र काळोखी पसरली आहे. या अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूला हरयाणा पोलिसांनी निलंबित केले आहे. एक लाख रुपयांची लाच घेण्याच्या कथित आरोपावरून पोलीस निरीक्षक भगवानला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्यावरील कारवाईमुळे क्रीडापटू, त्यांची नैतिकता आणि त्यांचे वर्तन या गोष्टींची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

स्थानिक, तालुका-जिल्हा, राज्य, राष्ट्रीय असे एकेक टप्पे पार करत खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचतात. विशिष्ट खेळाला वाहिलेल्या अकादमी, प्रशिक्षकांची फौज, मैदान आणि उपकरणांची सहज उपलब्धता, योग्य आहार, दुखापत व्यवस्थापनासाठी वैद्यकीय तज्ज्ञ, सराव आणि स्पर्धासाठी सहज निधी असे चित्र क्रीडा संस्कृती असणाऱ्या व्यवस्थेत असते. मात्र बहुतांशी भारतीय खेळाडू संघर्ष करत, लढा देत मोठे होतात. अनेकदा घरची परिस्थिती सामान्य असल्याने पैसा उभा करण्यासाठी आई-वडिलांना खस्ता खाव्या लागतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक तसेच यशानंतरच पैसा, प्रसिद्धी, नोकरी यांचा ओघ सुरू होतो. जाहिरातींचे करार, विविध ब्रँड्सचे सदिच्छादूत, समारंभ-उपस्थिती, समाजमाध्यमांवरील वावर यासाठी खेळाडूला ‘सेलिब्रेटी मॅनेजमेंट’चा आधार घ्यावा लागतो. बघता बघता तो खेळाडू स्टार होतो. आणि मग सदोदित त्याच्या प्रत्येक हालचालीवर, प्रतिक्रियेवर, निर्णयावर चाहत्यांचे, टीकाकारांचे, प्रसारमाध्यमांचे लक्ष असते. अडथळ्यांची शर्यत पार करून यशोशिखर गाठणाऱ्या ‘त्या’ किंवा ‘ती’ची कहाणी सामान्यांसाठी आतापर्यंत प्रेरणादायी झालेली असते. मैदानावर कर्तृत्व गाजवणाऱ्या ‘त्या’ किंवा ‘ती’ने प्रत्यक्ष आयुष्यातही आदर्शवत असावे असा चाहत्यांचा आग्रह असतो. सैनिकांप्रमाणे खेळाडूंना तिरंगा फडकवण्याची दुर्मीळ संधी मिळते. साहजिकच देशवासीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी करणारे खेळाडू अनुकरणीय होऊ लागतात. खेळातच कारकीर्द घडवू पाहणाऱ्या मोठय़ा युवा वर्गासाठी प्रसिद्धीस पावलेले खेळाडू आदरस्थानी असतात. मात्र खेळण्याबरोबरच्या या वाढीव जबाबदाऱ्या सगळेच क्रीडापटू पेलू शकत नाहीत. अशा चमूत जय भगवान ही नव्याने पडलेली भर. हा प्रकार केवळ जय भगवानसाठीच नामुष्कीचा नाही, तर त्याचे चाहते, हरयाणा पोलीस, भारतीय बॉक्सिंग परिवार, क्रीडापटूंना सरकारी नोकरी मिळावी याकरीता आग्रही असणारे या सर्वासाठीच क्लेशदायी आहे. असे जय भगवान अन्य खेळांमध्येही तयार होऊ लागल्याने क्रीडापटूंची मोठेपणाची झूल बेगडी असल्याचे दिसू लागले आहे.

जय भगवानचा समखेळकरी विजेंदर सिंगचे नाव तर अमली पदार्थाच्या व्यवहारप्रकरणी घेतले गेले. पंजाबमध्ये तर राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या कबड्डीपटू, भालाफेकपटू आणि गोळाफेकपटू यांनी फॉच्र्युनर नावाची टोळी बनवली. महागडय़ा गाडय़ांची चोरीप्रकरणी हे तिघे तुरुंगाची हवा खात आहेत. गेल्याचवर्षी हत्या, खंडणी आणि लूटप्रकरणी राष्ट्रीय वेटलिफ्टिंगपटूला अटक करण्यात आली. बॉक्सिंग, कुस्ती आणि वेटलिफ्टिंगसाठी प्रचंड ताकद लागते. मात्र त्यांच्या कमावलेल्या ऊर्जेला योग्य दिशा न मिळाल्याने गैरप्रकार वाढत चालल्याचं वास्तव स्पष्ट झाले आहे. तीन वर्षांपूर्वी मानवी तस्करीप्रकरणी अनुभवी क्रिकेटपटूला अटक करण्यात आली होती. अमली पदार्थाच्या व्यवहारप्रकरणी अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्तीपटूला अटक झाली होती. गैरवर्तनाचे लोण महाराष्ट्रातल्या क्रीडापटूंपर्यंतही पोहचले असून, काही महिन्यांपूर्वी तब्बल नऊ वेळा ‘मिस्टर इंडिया’ किताबावर नाव कोरणाऱ्या अव्वल शरीरसौष्ठवपटूला भ्रष्टाचारविरोधी पथकाने ५०,००० रुपयांची लाच घेताना पकडले होते. बढतीसाठी परीक्षा देताना कॉपी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय कुस्ती आणि कबड्डीपटूला पकडण्यात आले होते.

कृत्रिम पायांनिशी सक्षम माणसांची शर्यत जिंकणारा ब्लेडरनर ऑस्कर पिस्टोरियस जगप्रसिद्ध झाला होता. त्याचे चरित्र हातोहात खपले. असंख्य अपंग व्यक्तींनी ऑस्करकडून प्रेरणाही घेतली. मात्र मैत्रिणीला क्रूर पद्धतीने ठार मारल्याप्रकरणी ऑस्कर दोषी आढळला असून, सध्या तो नजरकैदेत आहे. असंख्य विक्रम, जेतेपदे यांच्यासह सगळ्यात श्रीमंत क्रीडापटू होण्याचा मान मिळवलेला गोल्फपटू टायगर वूड्स असंख्य महिलांना फसवल्याप्रकरणात अडकला आहे. मद्यपान करून गाडी चालवल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू जेम्स फॉल्कनरला दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचाच सहकारी डेव्हिड वॉर्नरने दोन वर्षांपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूला एका पबमध्ये मारहाण केली होती. बेताल खेळाडूंची यादी अपरिमित गतीने वाढत असल्यामुळे विविध विद्यापीठांमध्ये क्रीडापटू, गैरवर्तन आणि आदर्शवादाची अपेक्षा यासंदर्भात संशोधन प्रकल्पांचे पेव फुटले आहे. विशेष म्हणजे यामध्ये क्रीडापटूंच्या फक्त मैदानाबाहेरील गैरकृत्यांचा समावेश आहे.

खेळात यशाची चढती कमान रचताना सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रॉजर फेडरर, विश्वनाथन आनंद यांसारख्या दिग्गजांनी सद्वर्तनाचा मार्गही राखला. यशापयशाचे चढउतार अनुभवतानाही त्यांचा तोल ढळला नाही. मात्र समकालीन तसेच माजी दिग्गजांकडून मोठेपण कसे जोपासावे हे अंगीकारण्यात नवे कर्तृत्ववीर सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यासाठी त्यांना सच्च्या दिग्गजांची शिकवणीच घ्यावी लागेल.
-parag.phatak@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2015 2:27 am

Web Title: article on jai bhagwan
Next Stories
1 न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजयाचा भारतीय हॉकी संघाचा निर्धार
2 चीन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया-मार्टिना अजिंक्य
3 तिची स्पर्धा हिमालयाशी!
Just Now!
X