ऋषिकेश बामणे

विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने यंदाच्या विश्वचषकात पुन्हा डावखुऱ्या गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळेल, असे भाष्य केले होते. त्याचे हे व्यक्तव्य जणू सर्व डावखुऱ्या गोलंदाजांनी मनावर घेत आतापर्यंतच्या सामन्यांत छाप पाडली आहे. अन्य शैलीच्या गोलंदाजांच्या तुलनेत त्यांनी ३१ सामन्यांत ७० बळी घेतल्यामुळे डाव्या आघाडीचे यश अधोरेखित होत आहे.

यंदाच्या विश्वचषकातील सर्वोत्तम डावखुऱ्या गोलंदाजामध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरचे नाव घेता येईल. स्विंग, वेग, उसळी घेणारे चेंडू आणि यॉर्कर अशी चौफेर अस्त्रे भात्यात असलेल्या आमिरने पाच सामन्यांत १५ बळी घेतले असहेत. २७ वर्षीय आमिरने २००९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ५४ सामन्यांत ७५ बळी नावावर असलेल्या आमिरला पाच वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले नसते तर आज त्याने एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत नक्कीच अग्रस्थान गाठले असते. भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्वत: आमिर हा सध्याच्या घडीचा विश्वातील सवरेत्कृष्ट गोलंदाज आहे, असे वारंवार म्हटले आहे. त्यामुळेच २०१७ च्या चॅम्पियन्स करंडकातील अंतिम फेरीत कोहलीला बाद केल्यावर आमिरने केलेल्या जल्लोषाच्या आठवणी चाहत्यांच्या मनात आजही कायम आहेत.

विश्वातील कोणत्याही संघातील फलंदाजांच्या फळीचे कंबरडे मोडण्याची क्षमता असूनही असंख्य दुखापतींमुळे बहुतांश स्पर्धाना मुकणारा गोलंदाज म्हणजे ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क. मात्र ‘आयसीसी’च्या स्पर्धामध्ये स्टार्कच्या अंगी वेगळेच बळ संचारते. स्टार्कनेही सात सामन्यांतून १७ बळी (इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी) मिळवले आहेत. २०१५च्या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या २९ वर्षीय स्टार्कने ८२ सामन्यांत १६० बळी घेतले असून त्याने कारकीर्दीत सहा वेळा एकाच डावात पाच बळी घेण्याची किमया साधली आहे. अखेरच्या षटकांत योग्य जागेवर यॉर्कर टाकण्यात स्टार्क भारताच्या जसप्रीत बुमराप्रमाणेच पटाईत आहे, त्यामुळेच त्याच्या कामगिरीवर या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सर्वाधिक भिस्त आहे.

स्टार्कचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि तितक्याच वेगाने व त्वेषाने गोलंदाजी करणारा न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने सराव सामन्यात भारतीय फलंदाजांना नाचवले होते. मुख्य म्हणजे आतापर्यंतच्या पाच सामन्यांतून आठ बळी घेणाऱ्या बोल्टने अजून त्याची सर्वोत्तम कामगिरी केलेली नसूनही न्यूझीलंड संघ गुणतालिकेच्या अग्रस्थानी टिकून आहे. गोलंदाजीशिवाय क्षेत्ररक्षणातही बोल्ट अमूल्य योगदान देत असल्यामुळे न्यूझीलंडला यंदा विश्वचषकासाठी दावेदार मानले जात आहे.

यंदाच्या स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलने सर्वानाच चकित करत सहा सामन्यांत नऊ बळी पटाकावले आहेत. गडी मिळवल्यानंतर आनंद साजरा करण्याची कॉट्रेलची शैली इतरांपेक्षा भिन्न असली तरी त्याच्या कामगिरीनंतरही वेस्ट इंडिजला मात्र स्पर्धेत अपेक्षेनुसार यश लाभलेले नाही. त्याशिवाय बांगलादेशचा मुस्तफिजूर रेहमान (६ सामने, १० बळी), पाकिस्तानचा वहाब रियाझ (५ सामने, ८ बळी), श्रीलंकेचा इसुरू उडाना (५ सामने, ५ बळी) हेसुद्धा आपापल्या संघांसाठी सर्वतोपरी योगदान देत आहेत.

इतिहास उलटून पाहिल्यास डावखुऱ्या गोलंदाजांनी संघाच्या विजयात कशा प्रकारे मोलाची भूमिका बजावली आहे, हे निदर्शनास येते. १९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तानला जगज्जेतेपद मिळवून देण्यात वासिम अक्रमने स्विंग गोलंदाजीचा अप्रतिम नमुना पेश करत १० सामन्यांत १८ बळी मिळवत सवरेत्कृष्ट योगदान दिले. त्याचप्रमाणे न्यूझीलंडचा जेफ अलॉट, श्रीलंकेचा चामिंडा वास यांनीसुद्धा अनुक्रमे १९९९ आणि २००३च्या विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवले. सध्याच्या भारतीय संघात डावखुरा गोलंदाज नसला तरी २०११च्या विश्वचषकात झहीर खानने २१ बळी मिळवले होते, तर २०१५च्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांच्या स्टार्क आणि बोल्ट यांनी प्रत्येकी २२ गडी बाद केले होते. त्यामुळेच डावखुऱ्या गोलंदाजांचे महत्त्व किती आहे, हे यापूर्वीच्या आणि सध्याच्या विश्वचषकातून पुन्हा सिद्ध होत आहे.