प्रशांत केणी

२०१९-२०च्या क्रिकेट हंगामात देशातील एकूण २६२ (२१८ पुरुष, ४४ महिला) क्रिकेटपटूंना दुखापती झाल्या असून, यापैकी बहुतांश क्रिकेटपटूंना खांद्याच्या किंवा गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) संचालक राहुल द्रविड यांनी ही माहिती पहिल्यावहिल्या दुखापती निरीक्षण अहवालासह मांडली. अकादमी म्हटली की घडवलेल्या क्रिकेटपटूंची आकडेवारी जाहीर करायला हवी, परंतु त्याऐवजी द्रविडसारखा शिस्तप्रिय क्रिकेटपटू ही कसली दुखापतींची नावे जाहीर करतोय? हा प्रश्न कुणालाही पडणे स्वाभाविकच आहे. मग बेंगळूरुत राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आहे की दुखापती पुनर्वसन केंद्र? हा दुसरा प्रश्न समोर येतो. गेल्या दोन वर्षांत ‘एनसीए’च्या दुखापती पुनर्वसन प्रक्रियेवरही क्रिकेटपटूंचा विश्वास का राहिलेला नाही? हा तिसरा प्रश्न आणि इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) ‘एनसीए’चे फिजिओथेरपिस्ट नकोत. हा पवित्रा सहभागी संघांनी का घेतला? हा चौथा प्रश्न. त्यामुळे एकंदरीतच ‘एनसीए’चे स्वरूप आणि कार्य हे आता प्रश्नांकितच झाले आहे.

कर्नाटकची राजधानी बेंगळूरुचे क्रिकेट वैभव मानल्या जाणाऱ्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमपाशी ‘एनसीए’ अस्तित्वात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांची ही संकल्पना २०००मध्ये प्रत्यक्षात साकारली. त्या वेळी वासू परांजपे आणि रॉजर बिन्नीकडे संचालकपद होते. भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेल्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण देणे म्हणजेच हिऱ्याला पैलू पाडणे, हे त्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्याच उद्देशाने ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ आणि इंग्लंड क्रिकेट मंडळाशी करार करून तज्ज्ञांच्या मदतीने त्याचे उच्च कामगिरी केंद्रात रूपांतर करण्याचेही ‘बीसीसीआय’ने प्रयत्न केले. देशातून वेगवान गोलंदाज घडावेत, यासाठी एमआरएफ पेस फाऊंडेशनचे कार्यसुद्धा ‘एनसीए’द्वारेच चालायचे. महेंद्रसिंह धोनी, गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंग, झहीर खान, मुरली कार्तिक, मोहम्मद कैफ यांच्यासारखे अनेक क्रिकेटपटू हे ‘एनसीए’च्या शोधमोहिमेतून भारताला मिळाले आहेत.

कालांतराने ‘बीसीसीआय’ने ‘एनसीए’चे तंदुरुस्ती प्रमाणपत्र बंधनकारक केल्यानंतर खेळाडू घडवण्यासह दुखापतीनंतरचे पुनर्वसन याकडेही अकादमीला गांभीर्याने पाहावे लागले. आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय क्रिकेटपटूला दुखापत झाली की त्यातून सावरण्यासाठी त्याला ‘एनसीए’शिवाय पर्यायच उरला नाही. दुखापतीसंदर्भात ‘एनसीए’ची विश्वासार्हता गेली अनेक वर्षे टिकू न होती. परंतु गेल्या काही वर्षांतील दुखापती पुनर्वसनामुळे क्रिकेटपटूंना तिथे जायचे दडपण येऊ लागले आहे. २०१८मध्ये यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा खांद्याच्या दुखापतीमुळे ‘एनसीए’त दाखल झाला. त्यानंतर त्याला शस्त्रक्रियेमुळे बराच काळ विश्रांती घ्यावी लागली. या गोंधळामुळे त्याच्या कारकीर्दीचे मोठे नुकसान झाले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला गतवर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान डाव्या मांडीला दुखापत झाली होती. त्यानंतर १०० टक्के तंदुरुस्तीच्या उद्देशाने तो ‘एनसीए’त आला. परंतु वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेद्वारे भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर दोनच सामन्यांत त्याला हर्निया झाल्याचे निष्पन्न झाले. मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवच्या पुनरागमनासाठीही घाई करण्यात आली. या प्रकरणांमुळे गतवर्षी डिसेंबरमध्ये जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंडय़ा यांनी दुखापतीनंतर पुनर्वसनासाठी ‘एनसीए’त जाण्यास नकार दिला. कारण ‘एनसीए’त योग्य पुनर्वसन होण्याची खात्री नसल्यामुळे खासगी मार्गदर्शकाकडे जाण्याची त्यांची इच्छा होती. म्हणजेच फक्त तंदुरुस्ती प्रमाणपत्र मात्र त्यांना ‘एनसीए’चे हवे होते. या विषयावरून बराच धुरळा उडाला. त्यामुळेच ‘आयपीएल’साठी ‘एनसीए’च्या फिजिओंना संयुक्त अरब अमिरातीला पाठवण्याचा ‘बीसीसीआय’चा प्रस्ताव संघांनी धुडकावला.

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताची युवा (१९ वर्षांखालील) आणि ‘अ’ संघाची कामगिरी सुधारली आहे. गेल्या तीन युवा विश्वचषकांपैकी एक विजेतेपद आणि दोन उपविजेतेपदे ही कामगिरी निश्चितच स्पृहणीय आहे. स्थानिक क्रिकेटसह ‘आयपीएल’सह राज्य संघटनांच्या लीगमुळे युवा खेळाडूंचा व्यापही वाढला आहे. त्यामुळे दुखापतींचे प्रमाण वाढणे स्वाभाविक आहे. परंतु संचालकपदी विराजमान द्रविडने दुखापती पुनर्वसन प्रक्रियेत सुधारणा करून क्रिकेटपटूंमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी, हीच क्रिकेटजगताची अपेक्षा आहे.

एप्रिल २०१९ ते मार्च २०२०पर्यंतच्या ४८ पानी दुखापती निरीक्षण अहवालातील महत्त्वाचे मुद्दे असे-

*  एकूण दुखापती : २६२ (२१८ पुरुष, ४४ महिला)

*  खांदा : १४.७५ टक्के (३८)

*  गुडघा : १३.११ टक्के (३४)

*  पायाचा घोटा : ११.४८ टक्के

*  मांडीचा स्नायू : १०.४९ टक्के

*  पाठीचा कणा : ७.५४ टक्के

prashant.keni@expressindia.com