News Flash

दमलेल्या खेळाडूंची कहाणी!

महाराष्ट्राला मानांकनानुसार सोपी कार्यक्रमपत्रिका मिळाली होती. त्यामुळे उपांत्य फेरीपर्यंत जाण्याच्या मार्गात कोणतेही कठीण आव्हान नव्हते.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत केणी

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या ६६व्या अध्यायाचे विश्लेषण केल्यास ‘थकलेल्या खेळाडूंची स्पर्धात्मकता हरवलेली कहाणी’ असे करता येईल. राष्ट्रीय संघाचे शिबीर, आशियाई क्रीडा स्पर्धा, प्रो कबड्डीचे शिबीर, मग तीन महिन्यांचा प्रदीर्घ हंगाम, राज्याच्या किंवा व्यावसायिक संघाचे शिबीर आणि राष्ट्रीय स्पर्धा अशी खेळाडूंच्या तंदुरुस्तीची परीक्षा पाहणारी कार्यक्रमपत्रिका. याचे परिणाम महाराष्ट्रासह सर्वच संघांच्या कामगिरीवर दिसून आले. उत्तर प्रदेश आणि हरयाणा यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना वगळल्यास सारेच सामने एकतर्फी आणि निरस होते. महाराष्ट्राने मागील वर्षीचा सुवर्णाध्याय मागे टाकत पुन्हा झगडणारी कामगिरी दाखवली.

महाराष्ट्राला मानांकनानुसार सोपी कार्यक्रमपत्रिका मिळाली होती. त्यामुळे उपांत्य फेरीपर्यंत जाण्याच्या मार्गात कोणतेही कठीण आव्हान नव्हते. सोपे पेपर उत्तम लिहिले, मात्र पहिल्याच कठीण पेपरला महाराष्ट्राचे कच्चे दुवे समोर आले. यंदा आम्ही बचाव आणि आक्रमणाच्या स्थानानुसार संघनिवड करणार आहोत, हा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा फोल ठरला. पुन्हा संघनिवडीचे भिजत घोंगडे महाराष्ट्राच्या अपयशासाठी कारणीभूत ठरले. गतविजेत्या संघाचा रुबाब महाराष्ट्राच्या कामगिरीतून कुठेच दिसला नाही.

खेळाडू आणि व्यावसायिक करार या संदर्भात अज्ञान असलेल्या काही प्रशासकांमुळे रेल्वेत नोकरी करणाऱ्या सिद्धार्थ देसाईचे नाटय़ घडले. महाराष्ट्राकडून खेळण्यासाठी या २७ वर्षांच्या खेळाडूला नोकरीसुद्धा सोडायला लावली. परिणामी ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ अशी अवस्था त्याची झाली. रेल्वे आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांकडून खेळू न शकलेल्या सिद्धार्थचा राष्ट्रीय स्पर्धेत न खेळल्यामुळे भारतीय संघनिवडीसाठी आता विचार होऊ शकणार नाही.

महाराष्ट्राचा संघ निवडताना सुल्तान डांगे, योगेश भिसे, सुशांत साईल, पंकज मोहिते, रोहन गमरे, मोबिन शेख, प्रदीप शिंदे, मितेश पाटील अशा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत कामगिरी दाखवणाऱ्या अनेक खेळाडूंवर अन्याय झाला. त्याऐवजी दुखापतग्रस्त आणि अतिथकलेल्या खेळाडूंवर महाराष्ट्राची प्रमुख धुरा होती. प्रो कबड्डीच्या ताऱ्यांपैकी कामगिरीत सातत्य असणाऱ्या ऋतुराज कोरवीचा मात्र त्यांना विसर पडला.

संघटनात्मक वाद असलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये संघनिवड महाराष्ट्राबाहेरील त्रयस्थ निवड समितीने बजावावी, असे सूत्र राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मांडले आहे. संघनिवडीच्या बाबतीत महाराष्ट्राच्या कबड्डीत हेच वाद दिसून येतात. त्यामुळे आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी संघनिवडीची जबाबदारी अन्य राज्यांमधील नामांकित खेळाडू/प्रशिक्षकांना किंवा हे काम चोख करू शकणाऱ्या एका व्यावसायिक क्रीडा कंपनीला दिल्यास हे वाद टळू शकतील. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा अंकुश असणारे संघनिवडीचे सध्याचे रचनात्मक सूत्र संपुष्टात येईल.

देखणे नियोजन, पण..

भारतीय हौशी कबड्डी महासंघावर प्रशासक कार्यरत असल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद रोह्याला मिळाले. अन्यथा मुख्य शहरात विमानतळापासून जवळ ठिकाण असावे, असे नियम त्याकरिता आहेत. परंतु स्पर्धेचे देखणे नियोजन रोह्यात करण्यात आले. मैदान, मॅटची रचना, प्रेक्षागृह ही सारी व्यवस्था अप्रतिम होती. मात्र अनेक संघांची निवासव्यवस्था मैदानापासून बऱ्याच अंतरावर होती. त्यामुळे खेळाडूंची दमछाक झाली. आधीच दमलेल्या खेळाडूंवर हा अधिक ताण पडल्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर याचे परिणाम दिसून आले. मात्र कबड्डीवर मनापासून प्रेम करणारे चाहते या तारांकित खेळाडूंचे सामने पाहण्यासाठी तीन-चार तास अगोदरच मैदान गाठायचे. अखेरच्या दोन दिवशी तर विक्रमी गर्दी झाली.

रेल्वेचे निर्विवाद वर्चस्व

मुंबईत १९५९मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय रेल्वेने प्रथमच राष्ट्रीय विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर या संघाने राष्ट्रीय आणि व्यावसायिक कबड्डी स्पर्धामध्ये सातत्याने आपली छाप पाडली आहे. २०११नंतर सात वर्षांनी यंदा रेल्वेला पुन्हा जेतेपद प्राप्त करता आले. उत्तम सांघिक समन्वय हे त्यांच्या यशाचे प्रमुख सूत्र होते. गटसाखळीत हिमाचल प्रदेश, गोवा, ओरिसा यांना हरवणाऱ्या रेल्वेने बाद फेरीत दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र आणि सेनादल यांना सहज नमवून जेतेपदावर नाव कोरले. प्रो कबड्डीमध्ये बेंगळूरु बुल्सकडून खेळणाऱ्या पवन कुमार शेरावतने पाटणा पायरेट्सचे सलग चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले होते. राम मेहेर सिंग हे उपविजेत्या पाटण्याचे प्रशिक्षक होते. राष्ट्रीय स्पर्धेत पवन हाच घटक राम मेहेर सिंग यांच्या सेनादलासाठी अडचणीचा ठरला. रेल्वेकडून अनुभवी धर्मराज चेरलाथन, रवींद्र पेहल, श्रीकांत जाधव, दीपक नरवाल यांनी आपली भूमिका चोख बजावली. रेल्वेचे प्रशिक्षक संजीव कुमार यांच्यासाठी रोहा पुन्हा एकदा सार्थ ठरले. १० वर्षांपूर्वी रोह्यात झालेल्या अश्विनकुमार भोईर सुवर्णचषक स्पर्धेत रेल्वेचा संघ अजिंक्य ठरला होता आणि संजीव सर्वोत्तम चढाईपटू ठरला होता.

महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जमिनीपासून वर पाया तयार करून त्यावर मॅट टाकणे आणि दव पडू नये यासाठी छत बसवण्यात आले. महाराष्ट्राशिवाय हे कुणीच करू शकणार नाही, असे सर्वानी गोडवे गायले. कबड्डीमधील सर्वच तारांकित खेळाडू स्पर्धेत खेळले. भारतीय हौशी कबड्डी महासंघात उलथापालथ सुरू असताना सर्व ३१ संघांनी स्पर्धेला हजेरी लावली. परंतु राष्ट्रीय स्पर्धेत स्पर्धात्मकतेचा अभाव जाणवला. रेल्वेच्या कामगिरीला तोडच नव्हती. साखळीपासून अंतिम फेरीपर्यंत प्रत्येक सामना ते विजेत्याप्रमाणेच खेळले. चिवट झुंज देणाऱ्या सेनादलानेही अंतिम फेरीत रेल्वेपुढे शरणागती पत्करली. प्रो कबड्डीच्या प्रदीर्घ कालावधीमुळे राष्ट्रीय स्पर्धेचे महत्त्व कमी झाले आहे का, असा प्रश्नसुद्धा काही जणांना पडला आहे. महाराष्ट्राच्या संघनिवडीबाबत चर्चेला वाव आहे. ऋतुराज कोरवीसारखा बचावपटू संघात हवा होता. अजिंक्य पवारवगळता महाराष्ट्राच्या आक्रमणात सामथ्र्य दिसले नाही. बचावाचीसुद्धा तीच स्थिती होती. आता किशोर-कुमार वयोगटाच्या खेळाडूंबाबत पद्धतशीर योजना आखण्याची आवश्यकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 1:02 am

Web Title: article on national kabbadi tournament
Next Stories
1 नागपूरच्या दिव्या देशमुखचा पराक्रम
2 डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : भारतावर पराभवाची नामुष्की
3 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : विदर्भ-सौराष्ट्र यांच्यात आजपासून विजेतेपदासाठी झुंज  
Just Now!
X