06 March 2021

News Flash

ड्रोनच्या नजरेतून : वेगाला मर्यादा!

वेगवान खेळपट्टय़ांवर वर्चस्व गाजवणारे गोलंदाज पाकिस्तानमध्ये गेली अनेक वर्षे अविरत घडत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत केणी

आशियाई खंडातील राष्ट्रांनी क्रिकेटमधील यश हे प्रामुख्याने फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजांच्या बळावर मिळवले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतु पाकिस्तानचा संघ याला अपवाद आहे. त्यांच्या यशात वेगवान गोलंदाजांचाही सिंहाचा वाटा आहे. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेप्रमाणे त्यांची वेगवान गोलंदाजीची परंपरा मोठी आहे. वेगवान खेळपट्टय़ांवर वर्चस्व गाजवणारे गोलंदाज पाकिस्तानमध्ये गेली अनेक वर्षे अविरत घडत आहेत.

पाकिस्तानमधील देशांतर्गत क्रिकेटचा ढाचा मजबूत नसल्यामुळे वेगवान गोलंदाज घडण्याचे आणि गुणवत्ता शोधाची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू आहे. सध्या इंग्लंडमध्ये चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्यांचा अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरच्या खात्यावर १५ बळी जमा आहेत. दुखापती आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची पाच वर्षांची बंदी यामुळे आमिरची कारकीर्द डागाळली आहे. ३३ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज वहाब रियाझ त्याला तोलामोलाची साथ देत मोक्याच्या क्षणी बळी मिळवत आहे. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा २४ वर्षीय मध्यमगती गोलंदाज हसन अलीला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. हाच अली दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या चॅम्पियन्स करंडक विजेतेपदाचा शिल्पकार ठरला होता. पाकिस्तानचे अन्य दोन वेगवान गोलंदाज हे १९ वर्षीय आहेत. यापैकी सहा फूट सहा इंच अशी उंची लाभलेला डावखुरा मध्यमगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी उसळणारे चेंडू आणि यॉर्कर टाकण्यात पटाईत आहे. तसेच विश्वचषकाच्या एकाही सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेल्या मोहम्मद हसनैनकडे ताशी १५० किमी वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता आहे. पाकिस्तान सुपर लीग गाजवणाऱ्या हसनैनकडे पाकिस्तानचे भवितव्य म्हणून पाहिले जात आहे.

पाकिस्तानमधील वेगवान माऱ्याच्या क्रांतीचा जनक म्हणजे फझल मेहमूद. १९५०च्या दशकात फझलने खान मोहम्मदच्या साथीने पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याची धुरा वाहिली. बळींचे शतक नोंदवणारा पहिला पाकिस्तानी गोलंदाजसुद्धा तोच ठरला होता. १९७०च्या दशकात सहा फूट, सहा इंचाच्या सर्फराज नवाझने रीव्हर्स स्विंगचे अस्त्र यशस्वीपणे वापरले. मग १९९०च्या दशकात महान अष्टपैलू खेळाडू इम्रान खानने नवाझसोबत पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याची जगाला दखल घ्यावी लागली. स्विंग गोलंदाजी आणि धारदार नजर ही इम्रानची वैशिष्टय़े होती. याच इम्रानने देशाला १९९२ मध्ये पाकिस्तानला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून दिला. १९८०च्या दशकातील उत्तरार्धात डावखुरा वेगवान गोलंदाज वसिम अक्रम हा नवा वेगवान तारा उदयास आला. परिपूर्ण स्विंग गोलंदाज वसिमला ‘स्विंगचा सुलतान’ असे म्हटले जायचे. रीव्हर्स स्विंग ही त्याची खासियत होती. नवाझच्या निवृत्तीनंतर इम्रानने वसिमसोबत यशस्वीपणे वेगवान माऱ्याची धुरा सांभाळली. याच कालखंडात वकास युनूस हा आणखी वेगवान गोलंदाज पाकिस्तानला गवसला. आत वळणारे स्विंग चेंडू आणि यॉर्कर ही त्याच्या भात्यामधील महत्त्वाचे तीर होते. त्यामुळेच नव्वदीच्या दशकात पाकिस्तानला सुगीचे दिवस आले. कालांतराने आकिब जावेद, अता उर रेहमान, मोहम्मद अक्रम, मोहम्मद झाहीद आणि शाहिद नाझिर असे आणखी काही वेगवान गोलंदाज माऱ्यात सामील झाले.

मागील सहस्रकाच्या उत्तरार्धात ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ असे बिरुद मिरवणारा जगातील सर्वात वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आंतरराष्ट्रीय क्षितिजावर तेजाने तळपू लागला. त्याने १४ वर्षे पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळली. परंतु शिस्तभंग आणि दुखापतीमुळे त्याच्या कारकीर्दीचे मोठे नुकसान झाले.

नवा चेंडू हाताळण्यात वाकबदार असलेला मोहम्मद सामी त्याला छान साथ द्यायचा. अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या उमर गुलने ट्वेन्टी-२० प्रकार गाजवला. याशिवाय शब्बीर अहमद, अब्दुर रझाक आणि अझर मेहमूद अशा आणखी काही गुणी वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानच्या माऱ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मागील दशकात मोहम्मद आसिफ हा इम्रान-वसिमचा वारसा चालवू शकणारा वेगवान गोलंदाज पाकिस्तानला गवसला. परंतु सामनानिश्चिती, उत्तेजकांचे सेवन आणि पत्नी वीणा मलिकसोबतचे मतभेद यामुळे त्याने आपली सोनेरी कारकीर्द वाया घालवली.

सध्या कसोटी क्रिकेटमध्ये जुनैद खान हा पाकिस्तानचा सर्वोत्तम वेगवान गेालंदाज आहे. सात फूट एक इंचाचा मोहम्मद इरफान उसळणाऱ्या खेळपट्टय़ांवर यशस्वी ठरतो. याशिवाय आमिर, वहाब, शाहीन, हसन, राहत अली, सोहेल खान, मोहम्मद तलहा हे वेगवान गोलंदाज पाकिस्तानचा वेगवान माऱ्यात सामील आहेत. देशातील स्थानिक क्रिकेटमध्ये सुधारणा झाल्यास आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतल्यास पाकिस्तानचा वेगवान मारा संघाला पुन्हा चांगले दिवस दाखवू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 1:00 am

Web Title: article on pak fast bowlers abn 97
Next Stories
1 सीमारेषेबाहेर : डा वी  आ घा डी !
2 चर्चा तर होणारच.. : #एक दिवस मुलांसाठी
3 46 आकडेपट : गप्टिल, विल्यम्सनला विक्रमाची साद
Just Now!
X