संतोष सावंत

‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे रममाण झालेला. असा हा तेजात रममाण झालेला ‘भारत’ देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांपैकी एक. आपली वैशिष्टय़पूर्ण प्राचीन संस्कृती जपत भारताने संशोधन आणि विकासकार्यासाठी महत्त्वाची पावले उचलली. याच देशाने भूगर्भात २०० फूट खाली बांधलेल्या अद्ययावत वातानुकूलित संशोधन केंद्रात गेले काही महिने खूपच लगबग जाणवत होती. तसे पाहायला गेले तर २०१५ सालापासून म्हणजेच गेली चार वर्षे येथे महायुद्धाची तयारी सुरू होती. पण ३० मे २०१९ पासून तर प्रत्येक क्षणाकडे खास लक्ष पुरवण्यात येत होते. या युद्धतळाचे कमांडिंग ऑफिसर होते एस. रवी आणि त्यांच्या सोबत बी. संजय, ए. अरुण आणि एस. श्रीधर हे तज्ज्ञ अधिकारी या तळाची जबाबदारी सांभाळत होते.

मानव आणि यंत्र यांची सांगड घालून सुपरह्य़ूमनच्या निर्मितीसाठी हे केंद्र कार्यरत होते. या केंद्रात सामर्थ्य आणि सुसज्जता लाभलेले माही, विराट, हिटमॅन, गब्बर, बूम बूम, हार्दिक यांच्यासारखे अनेक सुपरह्य़ूमन आपली कामगिरी चोख बजावत होते. आक्रमण, बचाव आणि तंदुरुस्ती या तीन गोष्टींकडे येथील तज्ज्ञ विशेष लक्ष पुरवत होते. शारीरिक तसेच मानसिक सामर्थ्यांच्या विकासालाही येथे प्राधान्य दिले जात होते आणि म्हणूनच वैयक्तिक सामर्थ्यांसोबतच उत्कृष्ट सांघिक कामगिरीसाठीही येथील सुपरह्य़ूमन जगभरात ओळखले जात होते.

१६ जून २०१९ रोजी सकाळीच कमांडिंग ऑफिसर एस. रवी यांनी तळावरील लहानमोठय़ा सर्वच अधिकाऱ्यांना खास बैठकीसाठी बोलावले. बोर्ड रुम सोडून आपल्याला येथे प्रयोगशाळेत का बोलावले असावे, याची उत्सुकता जमलेल्या प्रत्येकाच्याच मनात होती. सर्व जण आल्याची खात्री होताच रवी यांनी बोलायला सुरुवात केली, ‘‘आपल्या चमूमधील प्रत्येक सुपरह्य़ूमन आगळावेगळा आणि बलवान आहे. आपल्या सैन्याच्या आक्रमणाची धुरा आपण गब्बर आणि हिट मॅन यांच्याकडे सोपवली होती. ते ती खूप उत्तमरीत्या पारही पाडत होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युद्धात हिट मॅनने निर्विवाद वर्चस्व गाजवत एकटय़ाने विजयश्री खेचून आणली तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध गब्बरने आपला करिश्मा दाखवला अर्थातच हिट मॅनने शत्रूचे आक्रमण थोपवण्यासाठी त्याला मोलाची साथ दिली. दुर्दैवाने या युद्धात गब्बर जबर जखमी झाला आहे. आणखी काही दिवस तो युद्धभूमीवर उतरू शकणार नाही.’’

त्यांच्या माहितीत भर घालत कमांडर बी. संजय यांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली, ‘‘न्यूझीलंडसोबत आपले जे युद्ध होणार होते. या युद्धात त्यांचे पारडे जड होते. आपण त्यांना निकराची झुंज दिली असती, हे निश्चित पण अस्मानी संकटामुळे हे युद्ध टळले. परंतु आज आपण आपला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करणार आहोत. या युद्धात आपल्याला गब्बरची उणीव निश्चितच भासणार आहे.’’ त्यांचे बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त झाली आणि आता पुढे काय, असा प्रश्न सर्वाच्याच मनात उमटला.

सर्वाच्या मनातील अनिश्चिततेचे उत्तर देण्यासाठी एस. रवी यांनी एका काचेच्या पेटीकडे निर्देश केला. त्यात नव्या रूपातील सुसज्ज हिट मॅन दिसत होता. ‘‘चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपण हिट मॅनला नवीन आयुधे दिलेली आहेत. हूक, पूल, ड्राइव्हज सोबतच त्याच्या भात्यात अनेक क्षेपणास्त्रे टाकलेली आहेत. त्याचे प्रोग्रॅमिंग अधिक आक्रमक करण्यात आलेले आहे. नव्या जोडीदारासोबत युद्धाची सुरुवात करताना त्याच्या आक्रमणाची धार सातत्याने वाढती राहील, याची काळजी घेण्यात आलेली आहे. परकीय आक्रमणाची धार बोथट करण्यासाठी अमर्याद शक्तीचा स्रोत त्याला देऊ  करण्यात आलेला आहे. तो आपली जबाबदारी पार पाडेल अशी आशा नव्हे तर खात्रीच आम्हाला आहे.’’

एस. रवी यांचे शब्द सत्यात उतरले. त्या दिवशी हिट मॅनने पाकिस्तानी आक्रमणाची धार केवळ थोपवलीच नाही तर त्वेषाने प्रत्युत्तरही दिले. जमिनीवरून आणि हवाईमार्गे जोरदार हल्ले करून शत्रूसैन्याला पळता भुई थोडी केली. आपल्या नेत्रदीपक अजोड कामगिरीने भारताच्या विजयाची भक्कम पायाभरणी केली. आता सर्व जण भविष्यातही अशाच दमदार कामगिरीची रास्त अपेक्षा या सुपरह्य़ूमनकडून करत होते.