मुंबईकर शायना ‘रेड दी हिमालया’च्या आव्हानासाठी सज्ज
स्पध्रेतील युवा खेळाडू असल्याने सर्वाचे लक्ष
गोठवणारी थंडी.. खडतर आव्हानांनी सज्ज असलेला मार्ग.. क्षणाक्षणाला शारीरिक आणि मानसिक कसोटीचा लागणारा कस.. अशा ‘रेड दी हिमालया’ शर्यतीत सहभाग घेऊन हिमालयाला आव्हान देण्यासाठी मुंबईची कन्या शायना कौर विर्दी सज्ज झाली आहे. उंच शिखरावर घेण्यात येणारी भारतातील ही एकमेव मोटर शर्यत आहे.
रेड दी हिमालया ही मुख्य मोटर शर्यत असली, तरी यामध्ये ८७ दुचाकीस्वारांनी सहभाग घेतला आहे आणि त्यापकी एक शायना आहे. यंदाच्या स्पध्रेतील ती सर्वात युवा स्पर्धक असल्यामुळे तिच्याकडे सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. आतापर्यंत मोटर क्रॉस आणि डर्ट शर्यत गाजवणारी १७ वर्षीय शायना पहिल्यांदा अशा प्रकारच्या रॅली रेसमध्ये सहभागी झाली आहे. या थरारक अनुभवासाठी सज्ज असलेली शायना म्हणाली की, ‘आतापर्यंत मोटर क्रॉस आणि डर्ट शर्यतींमध्ये सहभाग घेतल्यानंतर अशा रॅली शर्यतीत सहभाग घेण्याची इच्छा होती. त्यामुळे येथे आले. स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर नाही. बस सहा दिवस समोर येणाऱ्या आव्हानातून मार्ग काढून पुढे जायचे आहे. यात यश मिळाले तर खूप समाधान मिळेल. हिमालयाशी स्पर्धा केल्याचा आनंद गाठीशी राहील.’
गाडी परवान्यासाठीचे वय पूर्ण न झाल्यामुळे यंदा ती येथे स्कुटरवरून (गिअर नसलेली दुचाकी) जवळपास दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. याबाबत ती म्हणाली की, ‘१८ वर्षे पूर्ण न झाल्यामुळे मला वाहन परवाना मिळालेला नाही. मात्र गिअर नसलेले वाहन चालवण्याचा परवाना घेऊन या शर्यतीत सहभाग घेतला. यापूर्वीच्या स्पर्धामधे गिअर असलेली दुचाकी चालवण्याचा अनुभव असल्यामुळे थोडी भीती आहे. पण मी त्यासाठी तयार आहे.’
वडिलांच्या डर्ट रेसमधील असलेल्या आवडीमुळे मुंबईतील मुलुंड येथे राहणाऱ्या शायनाला या खेळाप्रति ओढ निर्माण झाली. गेली तीन वष्रे ती विविध स्पर्धामधून ही ओढ जपत आहे.
स्पध्रेला आजपासून सुरुवात
दोन दिवस स्पध्रेतील विविध चाचण्यांत यशस्वी झालेल्या एकूण १६७ स्पर्धकांच्या मुख्य स्पध्रेला रविवारपासून सुरुवात होत आहे. सहा दिवस सहा टप्प्यात ही शर्यत होणार आहे. पहिल्या टप्प्यात शिमला, कुलू, थेओग ते डलहौसी असे अंतर पार करणार आहेत, त्यानंतर आव्हान अधिक वढणार आहे. श्रीनगर येथे स्पध्रेची सांगता होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 11, 2015 2:13 am