प्रशांत केणी

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात क्रीडा विषयाला अभ्यासक्रमात गुणांच्या विषयाचा दर्जा द्यावा, असे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच क्रीडा हा विषय आता श्रेणीनिहाय विषय नसेल, तर मुख्य शिक्षणाचा तो एक भाग असेल. क्रीडाक्षेत्रासाठी ही तशी सुखद घोषणा. पण त्याआधी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी काही दिवसांपूर्वी मांडलेल्या व्यथेकडे पाहणे महत्त्वाचे आहे. खेळाविषयी भारतीय लोकांमध्ये उदासीनता आहे. संसदेतील माझ्या सहकाऱ्यांनादेखील खेळाविषयी फार ज्ञान नाही, हे मला दुर्दैवाने म्हणावे लागत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. ब्रिटिशांकडून भारतात आलेल्या क्रिकेटविषयी सर्वाना माहिती आहे. पण अन्य खेळांबाबत फक्त ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकायचे असते, इतकेच या खासदारांना माहिती आहे, हे वास्तव रिजिजू यांनी मांडले होते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत क्रीडा विषयाला खरेच योग्य स्थान मिळेल का, याबाबत मात्र साशंका आहे.

What Sanjay Raut Said?
“देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी, त्यामुळेच..”; संजय राऊत संतापले
eknath shinde
आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!
mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
imd predicted hailstorm in north central Maharashtra
उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट… जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

देशाच्या निर्मितीसाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी खेळाचे किती महत्त्व आहे, हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना ज्ञात होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर क्रीडाक्षेत्राकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात झाली. देशात हॉकीची संस्कृती अस्तित्वात होती. पण १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर त्याला अवकळा लागली आहे. १९८३च्या अनपेक्षित विश्वविजेतेपदानंतर क्रिकेटची संस्कृती निर्माण झाली आणि ती टिकलीही. फुटबॉलचे मात्र तसे झाले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने फुटबॉलमध्ये उत्तम प्रगती केली होती. पण तीसुद्धा काही दशकांनंतर ओसरली. आता विश्वचषक फुटबॉल स्पर्धा किंवा परदेशातील चर्चेतल्या लीग सुरू असल्या की टीव्हीवर त्या उत्साहाने पाहिल्या जातात. पण देशातील फुटबॉलच्या नायकांविषयी तेवढी आपुलकी मात्र कधीच बाळगली जात नाही. देशातल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा कोणत्याही लीगच्या फुटबॉल सामन्यांना तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे खचलेला भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने काही वर्षांपूर्वी देशातील चाहत्यांना भावनिक आव्हान केले होते की, ‘‘आमच्यावर रागवा, टीका करा; पण फुटबॉल सामने पाहायला मैदानावर या!’’ ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी, नेयमार यांना डोक्यावर घेणाऱ्या युवा पिढीकडून देशातील फुटबॉलचा विकास का साधता आला नाही?

भारतात काही खेळाडूंमुळे खेळ नावारूपास आले. विश्वनाथन आनंदमुळे बुद्धिबळ, लिएण्डर पेस आणि महेश भूपतीमुळे टेनिस, सायना नेहवालमुळे बॅडमिंटन, मेरी कोममुळे बॉक्सिंग, पी. टी. उषामुळे अ‍ॅथलेटिक्स हे आधीपासूनच खेळले जाणारे क्रीडा प्रकार देशात रुजवले गेले. नेमबाजी, कबड्डी यांच्यासारखे खेळ अनेक खेळाडूंच्या यशामुळे देशासाठी पदकप्राप्तीचे ठरले. पण तरीही क्रीडा संस्कृती मात्र उपेक्षितच राहिली आहे.

करोनाच्या टाळेबंदीत १५ वर्षीय ज्योती कुमारीने स्वत: सायकल चालवत तिच्या आजारी वडिलांना गुरग्राम येथून बिहार येथे १२०० किलोमीटरचे अंतर पार करून आणले. त्यावेळी ज्योती सायकलिंगमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देईल, असे तारे तोडत तिचा उदोउदो करण्यात आला. तसेच म्हशींच्या जोडीसह चिखलात धावायची शर्यत जिंकणाऱ्या कर्नाटकच्या बांधकाम कामगार श्रीनिवास गौडाची तुलना जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टशी केली गेली होती. समाजमाध्यमांवर जशी या पराक्रमांची चर्चा झाली, तशीच राजकीय नेत्यांनीही ऑलिम्पिक पदके जिंकून देण्याची क्षमता असलेले हे युवक आहेत, असे प्रशस्तिपत्रक त्यांना दिले होते. ओडीशाच्या बुधिया सिंगने बालपणी ६५ किलोमीटरचे अंतर धावून सर्वाचे लक्ष वेधले. पण तो ऑलिम्पिक पदक जिंकेल, हा विश्वास सार्थ ठरवू शकला नाही. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वीपर्यंत विशिष्ट अंतर खाडी पोहणाऱ्या आणि कराटेत ‘बेल्ट’ मिळवणाऱ्या शाळकरी मुलांचे पीक मोठय़ा प्रमाणात आले होते. परंतु ‘सागरकन्ये’सह यापैकी कुणालाही किमान ऑलिम्पिक पात्रतादेखील साधता आली नाही.

महाराष्ट्रातील शैक्षणिक धोरणात शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव आहे. पण आठवडय़ाला दोन ते चार तासिकांपुरता मर्यादित राहिलेला हा विषय गुणपत्रिकेत फक्त हमखास उत्तीर्ण होणाऱ्या श्रेणीचे कार्य करतो. शारीरिक शिक्षणाच्या तासिका बऱ्याचदा अन्य विषयांसाठी वर्गीकृत केल्या जातात, तर काही शाळांना मैदानेच नसल्यामुळे मर्यादा येतात. शारीरिक शिक्षणासाठी विशेष शिक्षक ठेवतानाही हीच उदासीनता बाळगली जाते. त्यामुळे विषय शिक्षकावर हा अधिकचा भार लादला जातो. शारीरिक शिक्षणाची श्रेणी विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी तसेच क्रीडा प्रकार, कात्रणे, आदींचा समावेश असलेल्या वहीआधारे दिले जातात. मैदानावर पदकनैपुण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांला दहावी-बारावीत २५ गुण दिले जातात. पण त्याला अन्य विषयांप्रमाणेच गुणांचा दर्जा मिळाल्यास क्रीडा संस्कृती घडवण्याच्या दृष्टीने ते योग्य पाऊल ठरेल, परंतु हे शिवधनुष्य पेलणे सोपे नाही. अन्यथा राज्यात क्रीडा विद्यापीठ स्थापण्याच्या घोषणेप्रमाणेच ते दिवास्वप्न ठरेल. ‘‘जेव्हा देशातील बहुसंख्य नागरिकांना खेळ ही मूलभूत गरज असल्याची जाणीव होईल, तेव्हाच त्या देशाला क्रीडाराष्ट्र म्हणून संबोधता येईल,’’ असे आधुनिक ऑलिम्पिकचे जनक पिएर डी कुबर्टिन म्हणायचे. तूर्तास, तरी क्रीडा संस्कृतीची आणि क्रीडाराष्ट्राची स्वप्ने बाळगणाऱ्या आपल्या देशात क्रीडा विषयाला प्रत्यक्षात मुख्य विषयाचा दर्जा मिळण्याची आशा धरू या!

prashant.keni@expressindia.com