News Flash

क्रीडा शिबिरे मुलांची, जबाबदारी पालकांची

उन्हाळी क्रीडा शिबीर

उन्हाळी क्रीडा शिबीर

ऋषिकेश बामणे, मुंबई

कोणत्याही शालेय मुलासाठी उन्हाळ्याची सुट्टी ही मनोरंजनाची मेजवानी असते. यापैकी बहुतांश मुले या सुट्टीत विविध ठिकाणच्या भटकंतींना पसंती देतात, तर काही मात्र स्वत:च्या आवडीच्या खेळात अधिक परिपूर्ण होण्यासाठी उन्हाळी क्रीडा शिबिरांमध्ये दाखल होतात. उन्हाळ्याची सुट्टी नुकतीच सुरू झाली असल्याने यंदादेखील अनेक संस्था मुलांना विविध खेळांवर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मुलांव्यतिरिक्त पालकांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांतदेखील आता बऱ्यापैकी वाढ झाली आहे. मात्र या शिबिरांचा मुलांना विशेषत: नेमका कितपत फायदा होतो व यामधून कारकीर्द घडवण्यासाठी त्यांना कशा प्रकारे वाट काढता येईल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एकंदर संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्याच्या वेगाने पसरलेल्या या उन्हाळी शिबिरांचे फायदे व ते निवडताना घ्यावयाची काळजी याचा घेतलेला हा आढावा.

नावनोंदणी करताना घ्यावयाची काळजी

* मुलांचा विशिष्ट खेळातील कल लक्षात घेऊन त्याच्या आवडीप्रमाणे शिबिराची निवड करावी.

* शिबीर घेणाऱ्या संस्थेच्या कार्याची व प्रशिक्षकांविषयी चौकशी करावी.

* शिबिराचे स्थळ, मुलांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा याबाबत माहिती घ्यावी.

* जाहिराती व भूलथापांना बळी न पडता प्रत्यक्षात जाऊन पडताळणी करावी.

* आहारविषयक तसेच मुलींच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेशी निगडित बाबींकडे लक्ष द्यावे.

* शिबिराला वारंवार भेट देऊन पाल्याच्या प्रगतीचा आढावा घेणे.

शिबिरांची उद्दिष्टे व फायदे

* आवडत्या खेळातील रूची ओळखून त्यामध्ये कारकीर्द घडवण्यासाठी मार्गदर्शन.

* शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आणि लहान वयातच हाडांना बळकटी देण्यासाठी गुणकारक.

* मुलांच्या अंगी खिलाडूवृत्तीची भावना निर्माण करणे.

* मनसोक्त खेळामुळे अभ्यासावरदेखील लक्ष केंद्रित करण्यास मदत.

* फावल्या वेळेचा सदुपयोग करण्याची व वेळेचे पालन करण्याची सवय.

* मुलाचा सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी लाभदायक.

उन्हाळी शिबीर हे खेळाडूंना एखाद्या खेळाची तोंडओळख करून देण्यासाठी फायदेशीर आहे. त्याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत विशेषत: शालेय मुलांकडे भरपूर रिकामा वेळ असतो. त्यामुळे आपल्या मुलाची तंदुरुस्ती वाढावी व त्याला खेळात रूची निर्माण व्हावी, या हेतूने पालक त्यांना शिबिरात दाखल करतात. लयबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे फार क्वचितच आयोजित केली जातात. कारण काही आठवडय़ांच्या शिबिरात खेळाडूला या प्रकाराचे बारकावे शिकणे फारच आव्हानात्मक आहे. मात्र लयबद्ध जिम्नॅस्टिक्सविषयी पुरेशी माहिती असलेल्यांना वरच्या पातळीवरील प्रशिक्षण आम्ही नक्कीच देऊ शकतो.

– वर्षां उपाध्ये, लयबद्ध जिम्नॅस्टिक्सच्या आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक

समर्थ व्यायाम मंदिरातर्फे दरवर्षी आयोजित केले जाणारे वासंतिक क्रीडा शिबीर हे प्रामुख्याने सर्व खेळांच्या भक्कम पायाभरणीसाठी लाभदायक आहे. बहुतांश खेळाडूंना खेळामध्ये कारकीर्द घडवण्याची इच्छा असते, परंतु आपण नेमके कोणत्या खेळात उजवे आहोत, हे त्यांना उमगत नाही. त्यामुळे अशा प्रकारची शिबिरे खेळाडूंना दिशा दाखवणारी ठरतात. या शिबिरांमध्ये पाचव्या वर्षांपासून ते सत्तरी ओलांडलेली हौशी माणसेदेखील सहभागी होतात. किशोर वयातच शारीरिक क्षमता कशी वाढवावी तसेच अ‍ॅथलेटिक्स, मल्लखांब यांसारख्या खेळांसाठी आवश्यक असणारी शरीरयष्टी मिळवण्यावर या शिबिरात अधिक भर दिला जातो.

– डॉ. नीता ताटके, समर्थ व्यायाम मंदिराचे व्यवस्थापन कार्यवाह

बहुतांश खेळाडू हे प्रथमच क्रीडा प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत असतात तर काहींना अशा प्रकारच्या शिबिरांची सवय असते. त्यामुळे प्रशिक्षकाने यांमध्ये योग्य समन्वय साधणे आवश्यक असते. काही शिबिरांत बाराखडीपासून शिकवले जाते, तर काही व्यावसायिक पातळीवरील असतात. योगासने, जिम्नॅस्टिक्स यांसारख्या खेळांचे उन्हाळ्यात शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्रशिक्षण दिले जाते. मात्र त्यापूर्वी खेळाडूची शारीरिक चाचणी करून त्याच्या क्षमतेनुसार त्याला कोणत्या पातळीवरील प्रशिक्षण द्यायचे, हे ठरवले जाते.

– डॉ. गो. वि. पारगांवकर,

मुंबई शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य

शिबिरात दाखल होण्यापूर्वी मुलांनी त्यांच्या मनावर समाजमाध्यमे व जाहिरातींनी घातलेली भुरळ दूर करणे आवश्यक असते. मुख्य म्हणजे क्रिकेट हा खेळ साधारणपणे प्रत्येक लहान मुलाला खेळण्यास आवडतो. मात्र प्रत्येक जण गंभीरपणे कारकीर्द घडवण्याच्या हेतूनेच शिबिरात दाखल झालेला असतो, असे नाही. काहींना एक आठवडा किंवा किमान महिन्याभरानंतर आपल्याला नेमका कोणत्या खेळात रस आहे, हे माहीत पडते. शिबिरात मुलाला दाखल केल्यानंतर पालकांनी फक्त त्याच्या निकालांवर लक्ष न देता तो काय शिकतो आहे, याकडे नजर वळवल्यास येणाऱ्या काळात महाराष्ट्राला किंबहुना भारताला अधिक गुणी खेळाडू लाभतील.

– संगम लाड, एसपी ग्रुप क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 2:26 am

Web Title: article on summer sports camp
Next Stories
1 प्रो कबड्डी लीग : अंधाऱ्या चाळीतून प्रो कबड्डीत चमकणार ‘अजिंक्य’तारा!
2 पॅरालिम्पिकपटू दीपा मलिकला हिलरी शिष्यवृत्ती
3 ‘विराट’ नेतृत्वाची कसोटी!
Just Now!
X