क्ला इव्ह लॉइड यांच्या नेतृत्वाखाली १९७५ आणि १९७९ साली विश्वचषकाचे जेतेपद पटकावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने क्रिकेटमधील सुवर्णकाळ अनुभवला. क्रिकेटमध्ये महासत्ता होऊ पाहणाऱ्या कॅरेबियन क्रिकेटला मात्र त्यानंतर उतरती कळा लागली. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळातील वाद, प्रशासकीय यंत्रणेतील घोळ, आर्थिक चणचण, खेळाडूंना मिळणारे तुटपुंजे मानधन यामुळे कॅरेबियन क्रिकेट पुरते पोखरले गेले. त्यातच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूलाच राष्ट्रीय संघात निवडीसाठी प्राधान्य दिले जाईल, या मंडळाच्या धोरणामुळे किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो यांच्यासारखे अनेक खेळाडू राष्ट्रीय संघापासून कायमचेच दुरावले गेले. पण काही आठवडय़ांपूर्वीच वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळामध्ये उलथापालथ झाली असून नवे अध्यक्ष रिकी स्केरिट आणि निवड समितीचे नवनियुक्त अध्यक्ष रॉबर्ट हायनेस यांनी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम गुणवत्तेला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघ ख्रिस गेल, आंद्रे रसेल, कालरेस ब्रेथवेट या एकहाती सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंच्या बळावर तब्बल ४० वर्षांनंतर वेस्ट इंडिजला विश्वचषक विजयाची हॅट्ट्रिक साजरी करून देण्यासाठी सज्ज झाला आहे.

अपेक्षित कामगिरी

ख्रिस गेल, आंद्रे रसेलसारखे तुफानी फलंदाजी करणारे खेळाडू वेस्ट इंडिज संघात परतल्याने विश्वचषकाच्या सध्याच्या स्वरूपानुसार उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याची ताकद नक्कीच या संघात आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या बलाढय़ संघांचे आव्हान परतवून लावण्याची क्षमता या संघात असली तरी विंडीजला मात्र अव्वल खेळाडूंवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

बलस्थाने आणि कच्चे दुवे

नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’मध्ये भारतानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनीच चमक दाखवली आहे. आंद्रे रसेल, ख्रिल गेल यांनी यंदाची ‘आयपीएल’ स्पर्धा आपल्या ताकदवान फटक्यांच्या जोरावर गाजवली. गेल, रसेल यांसारखे खेळाडू विंडीजला एकहाती सामना जिंकून देऊ शकतात. इविन लुइस, शाय होप, डॅरेन ब्राव्हो, निकोलस पूरन आणि शिम्रॉन हेटमायर यांचा संघात समावेश असून, जेसन होल्डर, अ‍ॅश्ले नर्स आणि कालरेस ब्रेथवेट हे फलंदाजीसोबत गोलंदाजीतही योगदान देऊ शकतात. अगदी नवव्या क्रमांकापर्यंत वेस्ट इंडिजची फलंदाजी असली तरी ती प्रत्येक सामन्यात चमकण्याची गरज आहे. शॅनन गॅब्रियल, केमार रोच, ब्रेथवेट आणि शेल्डन कॉटरेल हे इंग्लिश वातावरणात धोकादायक गोलंदाज ठरू शकतात. मात्र वेस्ट इंडिजचा संघ हा ट्वेन्टी-२० विशेषज्ञ म्हणून ओळखला जातो. ५० षटकांपर्यंत खेळपट्टीवर उभे राहून संघाला सामना जिंकून देण्याची मानसिकता त्यांच्या खेळाडूंमध्ये नाही. प्रत्येक सामन्यात एखाद-दुसऱ्या खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावरच या संघाचे भवितव्य अवलंबून आहे.

इ ति हा स

१९७५ : विश्वचषकाचा जन्म झाल्यानंतर एकदिवीसय क्रिकेटचा नवा अवतार पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. या स्पर्धेत साखळीत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना धूळ चारल्यानंतर विंडीजने दिमाखात उपांत्य फेरी गाठली. न्यूझीलंडने विजयासाठी १५९ धावांचे उद्दिष्ट ठेवले. अल्विन कालीचरणच्या ७२ धावांच्या खेळीमुळे विंडीजने हे लक्ष्य सहज पार केले. मग अंतिम फेरीत पुन्हा विंडीज आणि ऑस्ट्रेलिया भिडले. कर्णधार क्लाइव्ह लॉइडचे शतक आणि रोहन कन्हायच्या अर्धशतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजने ६० षटकांत ८ बाद २९१ धावा उभारल्या. मात्र इयान चॅपेल, अ‍ॅलन टर्नर यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७ धावा कमी पडल्या आणि वेस्ट इंडिजचा संघ पहिलावहिला जगज्जेता ठरला.

१९७९ :  क्लाइव्ह लॉइडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्याची करामत केली. साखळीत वेस्ट इंडिजने भारत, न्यूझीलंडला पराभूत केले. मात्र श्रीलंकेविरुद्धचा सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाला तरी वेस्ट इंडिजने गटात अव्वल स्थान पटकावले. उपांत्य फेरीत अव्वल पाच फलंदाजांनी उपयुक्त योगदान देत वेस्ट इंडिजला ६ बाद २९३ धावसंख्या उभारून दिली. हे आव्हान गाठताना पाकिस्तानचा डाव २५० धावांवर संपुष्टात आला. अंतिम फेरीत यजमान इंग्लंडचे आव्हान असताना व्हिव्हियन रिचर्ड्सच्या १३८ धावांच्या धुवाधार खेळीमुळे विंडीजने ९ बाद २८६ धावा केल्या. विंडीजच्या वेगवान तोफखान्यासमोर इंग्लंडचा डाव १९४ धावांवर संपुष्टात आणत दुसरा विश्वचषक आपल्या नावावर केला.

१९८३ : लॉइडचा संघ विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करणार, असेच सर्वाना वाटत होते. पण साखळीतील पहिल्याच सामन्यात भारताने विंडीजला ३४ धावांनी हरवत त्यांचे मनसुबे उधळून लावले. प्रत्येक संघाशी दोन वेळा भिडताना वेस्ट इंडिजने साखळीतील अन्य पाचही सामने जिंकत गटात वर्चस्व गाजवले. उपांत्य फेरीत पाकिस्तानला ८ बाद १८४ धावांवर रोखल्यानंतर रिचर्ड्स आणि लॅरी गोम्स यांच्या नाबाद खेळीने हे आव्हान सहज पार केले. अंतिम फेरीतही भारताला १८३ धावांवर गारद करण्यात विंडीजच्या गोलंदाजांनी यश मिळवले. पण मोहिंदर अमरनाथ, मदन लाल आणि बलविंदरसिंग संधू यांच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा संघ १४० धावांवर गारद झाला आणि भारताने अनपेक्षितपणे विश्वचषकावर आपले नाव कोरले.

१९८७ : दोन वेळा विश्वविजेतेपद आणि हुकलेली विश्वचषकाची हॅट्ट्रिक या धक्क्यातून वेस्ट इंडिजचा संघ सावरलाच नाही. साखळीत सहापैकी फक्त तीन सामने जिंकता आल्यामुळे वेस्ट इंडिजची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आणि त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

१९९२ : साखळीत वेस्ट इंडिजला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आठ सामन्यांत फक्त चार विजय मिळवता आल्यामुळे वेस्ट इंडिजला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले.

१९९६ : १२ संघांचा समावेश असलेल्या विश्वचषकात वेस्ट इंडिजने पाचपैकी फक्त दोन सामने जिंकून अ-गटात चौथे स्थान पटकावले आणि जेमतेम उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. उपांत्यपूर्व फेरीत ब्रायन लाराच्या शतकामुळे वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा झंझावात १९ धावांनी रोखत उपांत्य फेरी गाठली. मात्र ऑस्ट्रेलियाला २०७ धावांवर रोखल्यानंतर विंडीजच्या आघाडीच्या फलंदाजांनी अप्रतिम सुरुवात केली. पण तळाच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यामुळे वेस्ट इंडिजला विजयासाठी अवघ्या पाच धावा कमी पडल्या.

१९९९ : इंग्लंडमध्ये रंगलेल्या या विश्वचषकात वेस्ट इंडिजचे आव्हान पुन्हा एकदा साखळीतच संपुष्टात आले. ब-गटात समावेश असलेल्या वेस्ट इंडिजला पाचपैकी तीनच सामने जिंकता आले. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पराभव त्यांच्या जिव्हारी लागले.

२००३ : १४ संघांचा समावेश असलेल्या या विश्वचषकात वेस्ट इंडिजची नाव ‘सुपर-सिक्स’ फेरीचा किनारा गाठण्यात अपयशी ठरली. ब-गटात श्रीलंका, केनिया आणि न्यूझीलंडने बाद फेरीत आगेकूच केली. खुद्द यजमान दक्षिण आफ्रिकेलाही विंडीजप्रमाणे साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.

२००७ : कॅरेबियन बेटांवर झालेल्या या विश्वचषकात १६ संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली होती. ड-गटात विंडीजने अपेक्षेप्रमाणे तिन्ही सामने जिंकत अग्रस्थान काबीज केले. त्यानंतर ‘सुपर-८’ गटात वेस्ट इंडिजची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आणि यजमानांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले.

२०११ : भारतात रंगलेल्या या विश्वचषकात वेस्ट इंडिजने ब-गटात चौथे स्थान प्राप्त करत बाद फेरीत आगेकूच केली. मात्र उपांत्यपूर्व फेरीत शाहीद आफ्रिदी आणि सईद अजमल या फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. शिवनारायण चंदरपॉलने केलेल्या नाबाद ४४ धावांच्या चिवट खेळीमुळे वेस्ट इंडिजचा डाव ११२ धावांवर संपुष्टात आला. कामरान अकमल आणि मोहम्मद हाफीझ यांनी कोणतीही पडझड होऊ न देता पाकिस्तानला १० गडी राखून विजय मिळवून दिला.

२०१५ : ब-गटात समावेश असलेल्या वेस्ट इंडिजला सलामीच्या सामन्यातच दुबळ्या आर्यलडने पराभवाचा धक्का दिला. लेंडल सिमन्सच्या शतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजने ७ बाद ३०४ धावांचा डोंगर उभारला. पण पॉल स्टर्लिग आणि नील ओब्रायन यांनी अप्रतिम खेळी करत वेस्ट इंडिजच्या घशातून विजयाचा घास हिरावून घेतला. त्यानंतर पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला हरवत विंडीजने विजयाची गाडी रुळावर आणली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि भारताकडून पराभव पत्करल्यानंतर अखेरच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला हरवत वेस्ट इंडिजने बाद फेरीत प्रवेश केला. पण उपांत्यपूर्व फेरीत मार्टिन गप्तीलने २३७ धावांची आक्रमक खेळी साकारत विंडीजच्या गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडवल्या. वेस्ट इंडिजचा संघ मात्र २५० धावा करून माघारी परतला.

वेस्ट इंडिज

क्रमवारीतील स्थान : ८

सहभाग : १९७५ ते २०१९ (सर्व)

कामगिरी :  सामने ७४, विजय ४२, पराभव ३०, टाय २, यशाची टक्केवारी ५८.५७ %

विजेतेपद : २ (१९७५, १९७९)

उपविजेतेपद : १९८३

संघ : जेसन होल्डर (कर्णधार), इविन लुइस, डॅरेन ब्राव्हो, ख्रिस गेल, आंद्रे रसेल, कालरेस ब्रेथवेट, निकोलस पूरन, ओशाने थॉमस, शाय होप (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमेयर, फॅबियन अ‍ॅलेन, शेल्डन कॉटरेल, श्ॉनन गॅब्रियल, केमार रोच, अ‍ॅशले नर्स.

प्रशिक्षक : फ्लॉइड रीफर

साखळीतील सामने

* ३१ मे – वि. पाकिस्तान

* ६ जून – वि. ऑस्ट्रेलिया

* १० जून – वि. द. आफ्रिका

* १४ जून – वि. इंग्लंड

* १७ जून – वि. बांगलादेश

* २२ जून – वि. न्यूझीलंड

* २७ जून – वि. भारत

* १ जुलै – वि. श्रीलंका

* ४ जुलै – वि. अफगाणिस्तान

संकलन : तुषार वैती