News Flash

प्रा. देवधर ते तेंडुलकर.. क्रिकेटचा पल्ला!

नोव्हेंबर १९५२ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध आपटे यांनी कसोटी पदार्पण केले.

विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

जन्म : ५ ऑक्टोबर, १९३२

मृत्यू : २३ सप्टेंबर, २०१९

‘खडूस’पणा नसानसांत भिनलेल्या मुंबईच्या क्रिकेटमधील बुजूर्ग क्रिकेटपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

भारताचे आणि मुंबईचे माजी सलामीवीर आपटे यांना ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथेच सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांचा मुलगा वामन आपटे यांनी दिली. दुपारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत आपटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, मिलिंद रेगे, वासू परांजपे, जतीन परांजपे, क्रिकेट समालोचक हर्षां भोगले, आदी मान्यवर उपस्थित होते.

कापड आणि साखर निर्मिती उद्योगांमध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या आपटे ग्रुपचे ते अध्यक्ष होते. याचप्रमाणे त्यांनी मुंबई चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपदही सांभाळले होते. डिसेंबर १९८३मध्ये आपटे यांची मुंबईच्या नगरपालपदावर निवड झाली होती.

आपटे यांनी सात कसोटी सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व करताना एकूण ५४२ धावा केल्या. यात एकमेव शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १६३ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपटे यांनी ६७ सामन्यांत ३३३६ धावा केल्या असून, यात सहा शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १६५ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

नोव्हेंबर १९५२ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध आपटे यांनी कसोटी पदार्पण केले. या सामन्यात त्यांनी अनुक्रमे ३० आणि नाबाद १० धावा केल्या. मग एप्रिल १९५३ मध्ये  किंग्स्टन येथे ते वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळले. कसोटी मालिकेत एकूण ४००हून अधिक धावा करणारे आपटे हे पहिले भारतीय फलंदाज ठरले. १९५३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्यांनी ४६० धावा केल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी मुंबईचे नेतृत्वही केले होते.

आपटे यांनी १९४८ मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमघ्ये शिकत असताना विनू मंकड यांच्या मार्गदर्शनाखाली लेग-स्पिनर गोलंदाजीचे धडे घेतले. १९५१ मध्ये वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी भारतीय विद्यापीठ संघाच्या मेरिलीबोन क्रिकेट क्लबच्या दौऱ्यावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मग १९५२ मध्ये (२०व्या वर्षी) विजय र्मचट यांनी दुखापतीमुळे माघार घेतल्याने सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी कसोटी पदार्पण केले. पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांतील तीन डावांत त्यांनी एकूण ९२ धावा केल्या. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर १९५४ मध्ये ते एकमेव प्रथम श्रेणी सामना खेळले. मग १९६७-६८ मध्ये बॉम्बे विरुद्ध मद्रास हा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना त्यांच्या कारकीर्दीतील अखेरचा प्रथम श्रेणी सामना ठरला. मग आपटे यांनी कौटुंबिक व्यवसाय सांभाळत वयाच्या ३४व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली.

१९८९मध्ये आपटे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे (सीसीआय) अध्यक्ष झाले आणि त्यांनी सचिन तेंडुलकरला सदस्यत्व बहाल केले. ते ‘सीसीआय’च्या ‘लेजंड्स क्लब’चेही अध्यक्ष होते. नामांकित क्रीडापटूंचे वाढदिवस आणि महत्त्वाचे योगदान यांची या उपक्रमात चर्चा व्हायची. २०१४ मध्ये ‘सीसीआय’मधील आनंदजी डोसा संदर्भ ग्रंथालय जनतेसाठी खुला करण्यासाठी आपटे यांनीच प्रयत्न केले. क्रिकेटप्रमाणेच स्क्वॉश आणि बॅडमिंटन हे दोन खेळसुद्धा ते आवडीने खेळायचे. माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती.

फक्त सात कसोटी सामन्यांची कारकीर्द!

१९५३ मध्ये आपटे यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. या दौऱ्यात त्यांच्या खात्यावर पॉली उम्रीगर यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक ४६० धावा जमा होत्या. यात तीन अर्धशतके आणि नाबाद १६३ धावांच्या खेळीचाही समावेश होता. मात्र तरीही त्यांची कसोटी कारकीर्द सात सामन्यांपर्यंतच मर्यादित राहिली.

वेस्ट इंडिजसारख्या आग ओकणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या ताफ्याविरुद्ध दिमाखदार कामगिरी करूनही भारतीय संघातून का डावलण्यात आले, हे आपटे यांच्यासाठीसुद्धा ‘एक न सुटलेले कोडे..’ होते. नंतर त्यांच्या ‘अ‍ॅज लक वुड हॅव्ह इट-अनप्लग्ड अनकट’ या आत्मचरित्रात यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला आहे. चार वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर सुनील गावस्कर यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले होते.

‘‘उत्तम कामगिरीनंतरही कसोटी क्रिकेटमधील माझ्या कारकीर्दीचा अचानक अस्त मला कधीच स्पष्ट होऊ शकला नाही. दुसरी कसोटी चालू असताना राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख लाला अमरनाथ यांनी माझ्याशी संपर्क साधत वडिलांशी भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. माझ्या घरी झालेल्या या भेटीत अमरनाथ यांनी कोहिनूर मिलसंदर्भातील व्यावसायिक अपेक्षा प्रकट केल्या. माझ्या वडिलांनी तो प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर अमरनाथ आपल्या पदावर बराच काळ असल्यामुळे माझी भारतीय संघात पुन्हा कधीच निवड झाली नाही,’’ असे आपटे यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

मान्यवरांची प्रतिक्रिया

आपटे ५० वर्षे कांगा क्रिकेट सामने खेळले. वयाच्या ७१व्या वर्षी ते अखेरचा सामना खेळले. पांढरे कपडे, क्रिकेट साहित्याची बॅग आणि छत्री यासह ते सर्वसामान्य क्रिकेटपटूप्रमाणेच सामन्यांना यायचे. वयाच्या साठाव्या वर्षी ते तिशीतल्या अ‍ॅबी कुरुविल्लाचा हिमतीने सामना करायचे. प्रा. दिनकर बळवंत देवधर यांच्यापासून ते सचिन तेंडुलकरसोबत ते खेळले आहेत.

– मकरंद वायंगणकर, ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक

माधवने मला काही सांगितले आणि मी ते ऐकले नाही, असे क्वचितच घडले असेल. वेस्ट इंडिजच्या एकापेक्षा एक मातब्बर गोलंदाजांसमोर त्यांच्याच देशात शतक झळकावण्याची किमया आजपर्यंत ठरावीक खेळाडूंनाच साधता आली आहे. माधवने एकदाही सराव सत्राला दांडी मारलेली किंवा आळस केल्याचे मला आठवत नाही. दुर्दैवाने त्याला दीर्घकाळ भारताचे प्रतिनिधित्व करता आले नाही.

– चंद्रकांत पाटणकर, भारताचे माजी क्रिकेटपटू

माधव सरांशी निगडित माझ्या अनेक आठवणी आहेत. वयाच्या १४ व्या वर्षी मला शिवाजी पार्क येथे त्यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी लाभली होती. त्यांच्या आणि राजसिंग डुंगरपूर सरांच्या पाठिंब्यामुळेच मी ‘सीसीआय’साठी १५व्या वर्षी खेळू शकलो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वराकडे प्रार्थना.

– सचिन तेंडुलकर,भारताचा माजी क्रिकेटपटू

पन्नास वर्षांहून अधिक काळ आम्ही सोबत होतो. त्यामुळे उद्योगांमध्ये असणाऱ्या औपचारिक संबंधापलीकडे जाऊन आमचा कौटुंबिक स्वरूपाचा सलोखा होता. ते क्रिके टर म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी कोणत्याही वयाच्या आणि कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला त्यांच्याविषयी आकर्षण वाटेल असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. प्रवाहासोबत येणारी नवता त्यांनी कायम आत्मसात केली आणि नवनवीन उद्योगांमध्ये आपले वर्चस्व निर्माण के ले. वडिलोपार्जित असलेल्या साखर उद्योगातही त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणून साखर कारखान्याला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. उद्योग आणि व्यवसायातल्या त्यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे ते तरुण वयातच अनेक उद्योग समूहाचे प्रमुख बनले. वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी मैत्री करून विचारांचे आदानप्रदान करण्यात त्यांना विशेष गोडी होती. वैयक्तिक मैत्रीसोबतच अनेक संचालक मंडळांवर आम्ही एकत्र काम के ले होते. त्यामुळे आठवणी सांगाव्या तितक्या कमी आहेत. येत्या ५ ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस असल्याने त्या दिवशी मात्र त्यांची कमतरता मनोमन जाणवेल.

– सुभाष दांडेकर, उद्योजक

प्रयोगशीलतेचे दुसरे नाव म्हणजे माधव आपटे. कारण उद्योग आणि व्यवसायात सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याकडे त्यांचा कल असे. ‘लक्ष्मी विष्णू’ कापड उद्योगाच्या माध्यमातून अंगठीतून आरपार निघणाऱ्या साडीचे उत्पादन त्यांनी घेतले. त्या वेळी प्रत्येक दुकानात ही साडी अंगठीतून आरपार काढून दाखवली जात असे. ‘टू बाय टू’चे वजनाला हलके, रंग न जाणारे आणि उत्तम दर्जाचे कापड असणारे ब्लाऊजपीस बाजारात आणण्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे. फक्त कापड उद्योगच नव्हे तर आयस्क्रीम, रबर, चॉकलेट अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी यशस्वी कामगिरी के ली. या प्रवासामध्ये काळाची दिशा ओळखून ते तत्पर निर्णय घेत गेले. त्यांची ही निर्णयक्षमता शिकण्याजोगी होती. खेळाडूच्या अंगी असणारी जिद्ध आणि चिकाटी त्यांनी दैनंदिन जीवनातही जपली. म्हणूनच कठीण प्रसंगातही त्यांचा चेहरा आनंदी असे.

वयाच्या ८५व्या वर्षीही ते इमारतीचे २५ मजले पायी चढून जात. आमच्या प्रत्येक भेटीत त्यांच्याकडून विविध किस्से ऐकायला मिळायचे.

– जयराज साळगावकर, उद्योजक

माधव सरांनी मला नेहमीच चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्यासह क्रिकेट खेळण्यास मिळाले, हे मी माझे भाग्य मानतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

– विनोद कांबळी, भारताचा माजी क्रिकेटपटू

माधव सरांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख झाले. मुंबई क्रिकेटच्या सुवर्णपिढीतील आणखी एक तारा हरपला. त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.

– अमोल मुझुमदार, मुंबईचा माजी क्रिकेटपटू

मुंबई क्रिकेटचे आणखी एक संस्थान खालसा झाले. माधव आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्यासोबत क्रिकेटविषयी केलेल्या गप्पा मला कायमस्वरूपी स्मरणात राहतील.

– शिशिर हट्टंगडी, मुंबईचे माजी क्रिकेटपटू

गुरुवारी शोकसभा

माधव आपटे यांची शोकसभा येत्या गुरुवारी नेहरू सेंटर येथील हार्मनी सभागृहात सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत होणार आहे, अशी माहिती त्यांचे पुत्र वामन आपटे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 3:10 am

Web Title: article pay tribute to former cricketer and entrepreneur madhav apte zws 70
Next Stories
1 विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ दमदार सलामीसाठी सज्ज
2 भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिका : भारतीय महिला संघाची युवा खेळाडूंवर भिस्त!
3 कोरिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : प्रतिष्ठेला साजेसे खेळण्याचे सिंधूपुढे आव्हान
Just Now!
X