News Flash

आयएसएलच्या नव्या स्वरूपामुळे आव्हाने वाढणार

प्रदीर्घ मोसमासाठी क्लब प्रशिक्षक सज्ज

आयएसएलच्या नव्या स्वरूपामुळे आव्हाने वाढणार
जॉन जॉन्सन (बेंगळूरु एफसी), ब्रुनो पिनहीरो (एफसी गोवा), ल्युसियन गोइयान (मुंबई सिटी एफसी), सेरेनो हेन्रिक (चेन्नईयन एफसी), मार्सेलो परेरा (एफसी पुणे सिटी) आणि इयन हय़ुम (केरळ ब्लास्टर्स एफसी) यांनी आयएसएलच्या चर्चेत भाग घेतला.  

प्रदीर्घ मोसमासाठी क्लब प्रशिक्षक सज्ज

इंडियन सुपर लीग (आयएसएल) चौथ्या हंगामात नव्या स्वरूपात भारतीय फुटबॉलप्रेमींच्या भेटीला येत आहे. पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या कालावधीत खेळवण्यात येणाऱ्या या लीगमध्ये ९५ सामने खेळवण्यात येणार आहेत. १७ नाव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या हंगामाचे पडघम वाजू लागले आहेत. या नव्या स्वरूपाबरोबर प्रत्येक क्लबसमोरील आव्हाने वाढणार असून, त्याला क्लबच्या प्रशिक्षकांनीही दुजोरा दिला आहे.

बेंगळूरु एफसी आणि जमशेदपूर एफसी या पदार्पणवीर क्लब्सनी जेतेपदासाठीची सर्व समीकरणे जुळवत संघबांधणी केली आहे. त्यामुळे अन्य आठ क्लबची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात एफसी गोवा, एफसी पुणे सिटी, बेंगळूरु एफसी, केरला ब्लास्टर्स, चेन्नईयन एफसी आणि मुंबई सिटी एफसी संघाचे प्रशिक्षक व मुख्य खेळाडू उपस्थित होते. यावेळी प्रेत्येकाने पाच महिने चालणाऱ्या या लीगचे स्वागत केले.

एफसी गोवा क्लबमध्ये स्पेनच्या खेळाडूंचा भरणा आहे आणि त्यांना भारतातील वातावरणाशी जुळवून घेणे आव्हानात्मक जाणार आहे. गोव्याचे प्रशिक्षक सेर्जिओ लोबेरा म्हणाले की, ‘‘यशाकरिता कोणताही जवळचा मार्ग (शॉर्टकट) नसतो. स्पध्रेचा कालावधी वाढल्याने खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. मात्र त्याचवेळी बदलणाऱ्या वातावरणाचा त्यांना सामना करावा लागणार आहे. पहिले तीन महिने वातावरणात गारवा जाणवेल, परंतु लीगच्या अंतिम टप्प्यात खेळाडूंना उष्म्याचा सामना करावा लागेल. परंतु या बदलत्या वातावरणाशी खेळाडूंना जुळवून घ्यावेच लागेल.’’

आयसीएलचे पूर्वीचे तीन हंगाम दोन-अडीच महिने खेळवण्यात आले होते आणि पहिल्यांदाच या लीगचा कालावधी पाच महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे प्रदीर्घ लीग खेळण्याचा अनुभव खेळाडूंना नसल्याचा फटका क्लब्सना बसू शकतो. मात्र बेंगळूरु एफसीकडे प्रदीर्घ लीग खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळेच आयएसएल पदार्पणात त्यांना जेतेपदाच्या दावेदारांमध्ये स्थान मिळाले आहे. बेंगळूरुचे प्रशिक्षक अल्बर्ट रोका म्हणाले, ‘‘आयएसएलमध्ये खेळण्यास  उत्सुक आहोत. हा आमच्यासाठी नवा प्रवास असेल. पण त्याला दडपण न मानता त्याकडे आव्हान म्हणून पाहतो. प्रदीर्घ लीग खेळण्याचा अनुभव ही आमच्यासाठी जमेची बाब आहे.’’

पुणे सिटी एफसीचे प्रशिक्षक रँको पोपोव्हीक यांनीही ही लीग अधिक आव्हानात्मक असेल, असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘लीगचा कालावधी वाढल्याने आव्हाने नक्की वाढली आहेत, परंतु खेळाडूंना विश्रांतीसाठी, दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ मिळणार आहे. मात्र ही मांडणी कायम राखणे आवश्यक आहे. प्रत्येक हंगामात संघ बदलतो, प्रशिक्षक बदलतो आणि त्यामुळे भारतीय फुटबॉल पुन्हा दोन-तीन वर्षांनी मागे जातो. हे थांबायला हवे.’’ केरळाचे साहाय्यक प्रशिक्षक थोईंगबॉय सेंथी व चेन्नईयनचे प्रशिक्षक जॉन ग्रेगोरी यांनीही या स्पध्रेच्या जेतेपदाची शर्यत अधिक रंगतदार होणार असल्याच्या मतावर सहमती दर्शवली.

एकटय़ा सुनीलशी नव्हे, तर बेंगळूरु क्लबशी सामना

मुंबई सिटी एफसी क्लबकडून खेळणारा सुनील छेत्री यंदा आयएसएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या बेंगळूरु एफसीकडून खेळणार आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार छेत्रीची उणीव मुंबई क्लबला जाणवत असली तरी त्याच्याशिवाय खेळण्याची तयारी त्यांनी केली आहे. सुनीलव्यतिरिक्त मुंबईला सोनी नॉर्डे व डिएगो फोर्लान या अव्वल खेळाडूंना मुकावे लागणार आहे. त्याबाबत क्लबचे प्रशिक्षक अ‍ॅलेक्झांडर गुइमारीस म्हणाले, ‘‘छेत्रीची उणीव नक्की जाणवेल. त्याने बेंगळूरुकडून खेळण्याचा निर्णय घेतला त्याच क्षणी आम्ही पुढचा विचार करायला सुरुवात केली. अखेरीस येथे व्यावसायिक दृष्टिकोन येतो. मात्र क्लबमध्ये उपस्थित असलेल्या खेळाडूंवर मी समाधानी आहे. १९ नोव्हेंबरला आमचा पहिला सामना बेंगळूरुविरुद्ध आहे. त्यावेळी ती लढत सुनील विरुद्ध मुंबई नसेल, तर मुंबई विरुद्ध बेंगळूरु अशी असेल.’’

आयएसएलपुढील आव्हाने

  • वातावरणाशी जुळवून घेणे
  • भारतीय खेळाडूंची तंदुरुस्ती
  • परदेशी खेळाडूंची दीर्घ काळाची उपलब्धता
  • पाच महिने प्रेक्षकांना खिळवून ठेवणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2017 2:12 am

Web Title: articles in marathi on indian super league 2017
Next Stories
1 आदित्यचे ‘खडूस’ शतक
2 मुंबईत लवकरच सुसज्ज टेनिस स्टेडियम
3 विदर्भातून अनेक ‘उमेश’ भारतीय संघाला मिळतील!
Just Now!
X