आईच्या आजारपणात शशी चोप्राच्या इच्छाशक्तीचा कस

यश हे संघर्षांतूनच मिळते आणि आव्हानांवर मात करून मिळवलेले यश बहुमोल असते. पण या वाटचालीत यशस्वी व्यक्तीमागे अनेकांचा हातभार असतो. खेळाडूंच्या बाबतीत हा हातभार कुटुंबातील व्यक्तीकडून मिळतो. अपयशाच्या काळातही तो व्यक्तीसोबत असल्याने खचून जाण्याची इच्छाही मनाला स्पर्श करत नाही. मात्र आधारवाट दाखवणाऱ्या त्या व्यक्तीलाच आपल्या आधाराची आवश्यकता भासते, त्या वेळी तारेवरची कसरत होते. अशा समयी खेळाडूच्या मानसिक शक्तीचा कस लागतो. त्यातून तरल्यावर यश हे निश्चित असते. अशाच मानसिक कस पाहणाऱ्या परिस्थितीतून हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील शशी चोप्रा उभी राहिली आहे. गुवाहाटी येथे सुरू असलेल्या जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेतील ५७ किलो वजनी गटात शशीने अंतिम फेरीत प्रवेश करून वर्षांतील दुसऱ्या सुवर्णपदकाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

‘‘आई-वडिलांचा संपूर्ण पाठिंबा आहेच. वडील सैन्यदलात असल्यामुळे ते अधिक वेळ देऊ शकत नाही. पण राष्ट्रीय कर्तव्यातून वेळात वेळ काढून ते मला मार्गदर्शन करत असतात. जेव्हा कधी घरी येतात, तेव्हा ते माझ्या सरावावर विशेष लक्ष ठेवतात. अन्य दिवशी आईच माझी सोबती असते,’’ असे सांगताना शशीचे डोळे पाणावले. तिच्यासमोर तो प्रसंग उभा राहिला, ज्या वेळी तिच्या आईला अर्धागवायूचा झटका आलेला. उजवा पाय पूर्णत: निकामी झाला होता आणि त्या वेळी बॉक्सिंगच्या सरावासह आई व आजीची जबाबदारी शशीने चोख पार पाडली होती. याबाबत शशी सांगते, ‘‘माझ्या यशात आईचा सिंहाचा वाटा आहे. पण जानेवारी महिन्यात ती आजारी पडली. त्या वेळी बॉक्सिंगचा सराव, आईला रुग्णालयात नेणे-आणणे, घरचे काम, आजीची काळजी या सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या होत्या. हा काळ आव्हानात्मक होता. कुटुंबात आईच मला सर्वात जवळची आहे आणि त्या वेळी तिला असे पाहून मलाच हतबल झाल्यासारखे वाटत होते. सुरुवातीला हे आव्हानात्मक होते, परंतु मी या परिस्थितीवर मात करायला शिकले.’’

आईच्या आजारपणाच्या त्या काळाने शशीमधील बॉक्सिंगपटूला अधिक जिद्दी बनवले. बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पध्र्यावर जलद ठोशांचा भडिमार करायचा, परंतु त्याच वेळेला समोरून आलेले ठोसे चुकवायचे, तशीच रिंगबाहेरही आव्हानांच्या ठोशांवर भडिमार करत परिस्थितीचे ठोसे चुकवून शशीची वाटचाल सुरू होती. त्यामुळेच उत्तम बॉक्सिंगपटू बनण्याची आणि भारताला पदक मिळवून देण्याची इच्छाशक्ती अधिक प्रबळ झाल्याचे शशीने सांगितले. आई आजारपणातून बरी झाल्यानंतर शशीला राष्ट्रीय शिबिरासाठी बोलवणे आले आणि त्यानंतर तिचे आयुष्य पूर्णत: पालटले. तो काळ कधीच विसरणार नसल्याचे तिने सांगितले.

सायना, मेरीमुळे प्रेरणा

‘‘२०१०मध्ये सायना नेहवालने राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक पटकावले. मुलीही खेळात कारकीर्द घडवू शकतात, याची तेव्हा कल्पना आली. तेव्हा केवळ तंदुरुस्तीसाठी मी कुस्ती खेळायला सुरुवात केली. मात्र २०१२च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील मेरी कोमच्या कांस्यपदकाने मी प्रेरित झाले. बॉक्सिंगसारख्या आव्हानात्मक खेळात मेरी कोम यांनी केलेली कामगिरी माझ्यासारख्या असंख्य मुलींसाठी प्रेरणादायी ठरली. तेव्हा खऱ्या अर्थाने माझाही बॉक्सिंगपटू म्हणून प्रवास सुरू झाला,’’ असे शशीने सांगितले.

ऑलिम्पिकचे लक्ष्य

जागतिक युवा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेतीला २०१८मध्ये होणाऱ्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित करता येणार आहे. मात्र ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी भारताची शशी त्याला अपवाद ठरेल. वयाच्या मर्यादेमुळे तिला या स्पर्धेसाठी पात्र ठरता येणार नाही. याची खंत न बाळगता पुढील प्रवासात अजून ताकदीने सातत्यपूर्ण खेळ करण्याचा निर्धार तिने बोलून दाखवला. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळता आले नाही, तरी आगामी काळात ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पदकाची कमाई करण्याचा निर्धार तिने व्यक्त केला.

चालू वर्ष प्रेरणादायी

‘‘चालू वर्षांत राष्ट्रीय शिबिरामध्ये संधी मिळाली. बल्गेरिया आणि इस्तंबूल येथे झालेल्या स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळाली, त्या संधीचे सोने करताना सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. हे सर्व अविश्वसनीय आहे. बल्गेरिया येथील बाल्कन युवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण आणि आंतरराष्ट्रीय अहमत कामेर्ट स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केल्याचा आनंद आहे. हे आयुष्याला कलाटणी देणारे क्षण ठरले,’’ असे शशीने सांगितले.