त्रिचूर (केरळ) येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत या स्पर्धेतील मुलींच्या गटात तामिळनाडूच्या आर. वैशाली हिने साडेनऊ गुणांसह अजिंक्यपद मिळविले. मुलांच्या गटामध्ये अरविंद चिदंबरमने ९.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या आकांक्षा हगवणेने उपविजेतेपद मिळविले. तिने साडेआठ गुणांची कमाई केली.
या स्पर्धेतील मुलींच्या गटात तामिळनाडूच्या आर. वैशाली हिने साडेनऊ गुणांसह अजिंक्यपद मिळविले. आकांक्षाने उपविजेतेपद मिळविताना आठ डाव जिंकले व एक डाव बरोबरीत ठेवला. दोन डावांमध्ये तिला पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत तिने ६७ मानांकन गुणांची कमाई केली. १५ वर्षांखालील आकांक्षाने दुसरा क्रमांक मिळवून भारतीय संघात स्थान मिळविले आहे. ती आता आशियाई युवा स्पर्धा, जागतिक युवा स्पर्धा, राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धा तसेच आशियाई सबज्युनिअर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती डीईएस (टिळक रोड) प्रशालेत नवव्या इयत्तेत शिकत असून तिला आंतरराष्ट्रीय मास्टर जयंत गोखले यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तिला ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनीही काही मौलिक मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्राच्या साक्षी चितलांगी (७.५ गुण), तेजस्विनी सागर (७ गुण) व सलोनी सपाळे (६.५ गुण) यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अनुक्रमे सातवे, बारावे व विसावे स्थान मिळविले.
मुलांमध्ये महाराष्ट्राच्या समीद शेटे व अभिमन्यू पुराणिक यांनी अनुक्रमे सातवे व नववे स्थान मिळविले. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी आठ गुण मिळविले, मात्र प्रगत गुणांच्या आधारे त्यांना हे क्रमांक देण्यात आले.