आशिया चषकामध्ये बांगलादेश संघाबरोबर पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पाक संघाच्या कर्णधाराने स्वत: आणि संघाची कामगिरी निराशजनक झाल्याची कबुली दिली. सर्फराजने संघाच्या निराशजनक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले शिवाय स्वताच्या कामगिरीवर टीकाही केली. सर्फराज म्हणाला की, ‘ आशिया चषकातील कामगिरी पाहून दुख: होत आहे. आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. एक खेळाडू म्हणूनही मी अपयशी ठरलो. मी यापेक्षा चांगला खेळ करू शकलो असते.’ भारताविरोधातील ४४ धावांची खेळी सोडता पाकिस्तान संघाची या स्पर्धेतील कामगिरी खराब राहिली आहे. या स्पर्धेत सर्फराजने ६,८,४४ आणि १० धावा काढल्या आहेत.

आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर सर्फराज म्हणाला की, ‘फखर आमचा प्रमुख फलंदाज आहे. फखर सध्या आपल्या फॉर्मशी झगडत आहे. आशिया चषकात त्याला फॉर्म मिळाला नाही. तर शादाब जखमी झाला. या स्पर्धेत आमच्या फलंदाजांनी अपेक्षेनुसार कामगिरी न केल्यामुळे आमचा पराभव झाला.’

भारतीय संघाबरोबर मिळालेल्या लागोपाठच्या दोन पराभवामुळे पाकिस्तान संघाला सध्या टीकाचा सामना करावा लागत आहे. या पराभवाचे एक कारण सर्फराजचे नेतृत्व असल्याची टीकाही केली जात आहे. दिग्गज खेळाडू शोएब मलिकनेही संघावर टीका करत भारताकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्याने निवड समितीला खोचक सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, ‘भारत सध्या जगातील अव्वल संघ आहे. त्याचे कारण त्यांच्याकडे येणारे नवे दर्जेदार खेळाडू आहेत. भारतामध्ये नवे खेळाडू कशे घडवले जातात याकडे पाकिस्तानने पहायला हवे. ‘

सुपर फोरमधील अखेरच्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या निर्णायक सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला ३७ धावांनी पराभूत केले आणि इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मुशफिकूरची तडाखेबाज फलंदाजी आणि गोलंदाजांचा भेदक मारा याच्या बळावर बांगलादेशने पाकिस्तानला धूळ चारली. ९९ धावांची दमदार खेळी करणाऱ्या मुशफिकूर रहीम याला सामनावीर घोषित करण्यात आले. आता २८ सप्टेंबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात स्पर्धेच्या विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.