नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी आता बरोबर दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. मात्र एकीकडे करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जपानमधील नागरिकांचा या स्पर्धेसाठी विरोध कायम असताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी ऑलिम्पिक नियोजनानुसारच होईल, असे स्पष्ट मत शनिवारी पुन्हा एकदा व्यक्त केले.

नियोजित वेळापत्रकाप्रमाणे गतवर्षी ऑलिम्पिक होणे अपेक्षित होते. मात्र करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर ऑलिम्पिक वर्षभराने लांबणीवर ढकलण्यात आले. जपानमध्ये सध्या करोनाची चौथी लाट भरात असून तेथील ८० टक्के नागरिकांचा स्पर्धेच्या आयोजनाला विरोध आहे. परंतु २३ जुलैपासून रंगणाऱ्या ऑलिम्पिकमुळे संपूर्ण विश्वाला सकारात्मकतेचा संदेश मिळेल, असे विचार बाख यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान मांडले.

‘‘टोक्यो ऑलिम्पिकसाठी आता अवघे ६० ते ६५ दिवस शिल्लक आहेत. सध्याच्या आव्हानात्मक काळातही ऑलिम्पिक आयोजनाची तयारी योग्य रीतीने सुरू आहे. क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने ही स्पर्धा होणे फार महत्त्वाचे असून ऑलिम्पिकच्या आयोजनाद्वारे जगभरातील जनतेला सकारात्मकता आणि एकतेचा संदेश मिळेल,’’ असे बाख म्हणाले.