स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले पाकिस्तानचे पंच असद रौफ आणि आपले गमतीशीर हावभाव आणि हातवारे यासाठी प्रसिद्ध न्यूझीलंडचे पंच बिली बोवडेन यांना आयसीसी एलिट पंचांच्या पॅनेलमधून डच्चू देण्यात आला आहे. सट्टेबाजांकडून महागडय़ा चीजवस्तू स्वीकारल्याच्या आरोपांवरून रौफ यांची चौकशी होत आहे. या प्रकरणात अडकल्याचा फटका रौफ यांना बसला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कथित सहभागामुळे रौफ यांची नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी नियुक्ती करण्यात आली नव्हती. दरम्यान या दोघांच्या जागी इंग्लंडचे रिचर्ड एलिंगवर्थ आणि ऑस्ट्रेलियाचे पॉल रायफेल यांना एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरातील पंचांच्या कामगिरीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आयसीसीच्या पंच निवड समितीचे प्रमुख जॉफ आलारडिस यांनी सांगितले.