चौथ्या अॅशेस कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाजांच्या वर्चस्वामुळे रंगत अधिकच वाढली आहे. सकाळच्या सत्रात इंग्लिश गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ३२ धावांची माफक आघाडी घेऊन दिली. त्यानंतर इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात चहापानापर्यंत ३ बाद १२३ अशी मजल मारली होती.
शनिवारी ५ बाद २२२ अशा सुस्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव रविवारी सकाळच्या पहिल्या सत्रातच गडगडला. त्यांचा उर्वरित निम्मा संघ फक्त ४८ धावांमध्येच आटोपला. शनिवारी आपल्या कारकीर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावणारा ३५ वर्षीय डावखुरा सलामीवीर ख्रिस रॉजर्स आणखी ९ धावांची भर घालून माघारी परतला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड सर्वात यशस्वी ठरला. त्याने २४.३ षटकांत ७१ धावांत ५ बळी घेतले.
त्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. जो रूट (२), अॅलिस्टर कुक (२२), जोनाथन ट्रॉट (२३) या तिघांनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रयान हॅरिसने तंबूची वाट दाखवली. त्यामुळे इंग्लंडची ३ बाद ४९ अशी अवस्था झाली. परंतु केव्हिन पीटरसन (नाबाद ३७) आणि इयान बेल (नाबाद ३६) यांनी इंग्लंडचा डाव सावरून संघाला सुस्थितीत राखले.