दुखापतग्रस्त जेम्स पॅटिन्सन पुढील तीन कसोटी सामन्यांना मुकणार
ऑस्ट्रेलियाचा गतीमान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनच्या पाठीला झालेल्या दुखापतीमुळे पुढील उर्वरीत तीन कसोटी सामन्यांना पॅटिन्सनला मुकावे लागणार आहे. ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात झालेल्या पराभवाच्या धक्क्यापासून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच आता पॅटिन्सनच्या अनुपस्थितीमुळे संघाला आणखी एक धक्का सहन करावा लागत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी जेम्स पॅटिन्सनच्या पाठीला दुखापत झाली. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्याला आता विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे पुढील तीन कसोटी सामने पॅटिन्सनला खेळता येणार नाही. असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने सांगितले आहे.
दुसऱया कसोटी सामन्यात इंग्लंडने ५८३ धावांचे आव्हान विजयासाठी समोर ठेवले असताना ऑस्ट्रेलियापुढे विजय हा पर्यायच उपलब्ध नव्हता. सामना अनिर्णित राहण्याचीच शक्यता होती. पण त्यांची सुरुवातच निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाच्या प्रारंभीच ३ बाद ३६ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर उस्मान ख्वाजा (५४) आणि कर्णधार मायकेल क्लार्क (५१) यांनी चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचत पडझड थांबवण्याचा प्रयत्न केलेला. पण त्यांना सामना अनिर्णित राखण्याच्या दिशेने पावले टाकता आली नाहीत. या दोघांनाही रूटने तंबूची वाट दाखवत इंग्लंडला विजयासमीप नेऊन पोहोचवले होते. ९ बाद १९२ अशी अवस्था असताना इंग्लंडचा संघ चौथ्याच दिवशी विजय साकारेल, असे वाटत होते. पण  जेम्स पॅटिन्सन (३५) आणि रयान हॅरिस (नाबाद १६) यांनी कडवी झुंज देत इंग्लंडच्या गोलंदाजांना झगडायला लावले होते. निर्धारित षटके आणि वेळ संपल्यावर अर्धा तास वाढीव देण्यात आला होता. अखेर स्वानने हॅरिसला बाद करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला होता.