इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅशेस २०१९ मालिकेत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. तिसऱ्या कसोटीतून ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ बाहेर झाला आहे. दुसऱ्या कसोटीत जोफ्रा आर्चर याच्या गोलंदाजीवर खेळताना त्याच्या मानेवर चेंडू आदळला होता. त्या दुखापतीतून न सावरल्यामुळे त्याला हेडिंग्ले कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे.

दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर पुन्हा तो जिद्दीने मैदानात उतरला खरा.. पण तो लगेचच बाद झाला. त्याने ९२ धावांची खेळी केली. मात्र त्याला उर्वरित सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर त्याच्या प्रकृतीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची वैद्यकीय समिती लक्ष ठेवून होती. स्मिथने तिसऱ्या सामन्यात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे त्याच्या प्रकृतीची विशेष काळजी घेतली जात होती. पण तो सामन्याच्या दिवसांपर्यंत पूर्णपणे बरा होणार नाही, याचा अंदाज आल्याने त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यात न खेळवण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरूवारी घेतला.

चेंडू कुरतडण्याप्रकरणी स्मिथला निलंबित करण्यात आले होते. ही शिक्षा संपल्यानंतर त्याने ‘अ‍ॅशेस’मधून पुनरागमन केले. अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मिथने दोनही डावात शतके ठोकली होती. तसेच दुसऱ्या सामन्यात त्याने ९२ धावांची खेळी केली. त्याच्या या दमदार खेळीच्या बळावर स्टीव्ह स्मिथने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मानेच्या सुरक्षेसाठी स्टेम गार्ड वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र त्याची सक्ती करण्यात न आल्यामुळे अ‍ॅशेस मालिकेत स्टीव्ह स्मिथ स्टेम गार्ड न वापरता मैदानात उतरला आणि तो अपघात घडला. त्यामुळे आता स्टेम गार्डचा वापर करणे अनिवार्य करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे विज्ञान खेळ आणि चिकित्सा प्रमुख अलेक्स कोंटोरिस एक वर्ष याचा वापर करून पाहणार आहे. त्यानंतर या हेल्मेटची सक्ती करण्यात येईल. ICC ही याचा वापर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करू शकते.