रूट-डेन्ली यांच्या अर्धशतकांमुळे विजयाच्या दिशेने वाटचाल

कर्णधार जो रूट आणि जो डेन्ली यांनी झुंजार अर्धशतके झळकावत शतकी भागीदारीचे योगदान दिल्यामुळे इंग्लंडने तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला जशास तसे प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ७० षटकांत ३ बाद १५४ धावा करत विजयाच्या दिशेने कूच केली आहे.

आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडने दुसऱ्या डावात सलामीवीर रॉरी बर्न्‍स (७) आणि जेसन रॉय (८) यांना स्वस्तात गमावले. जोश हॅझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी अनुक्रमे बर्न्‍स व रॉयला बाद केल्यामुळे इंग्लंडची अवस्था २ बाद १५ धावा अशी झाली होती.

मात्र आतापर्यंत मालिकेत छाप पाडण्यात अपयशी ठरलेला कर्णधार रूट व डेन्ली यांनी आणखी पडझड होऊ न देता एकेरी-दुहेरी धावांवर भर देत इंग्लंडचा डाव सावरला. चहापानापर्यंत दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी ७५ धावा जोडल्यामुळे इंग्लंडने २ बाद ९० धावांपर्यंत मजल मारली.

दिवसाच्या अखेरच्या सत्रातही रूट व डेन्ली यांनी धोका न पत्करता धावफलक हलता ठेवला. रूटने सात डावांनंतर अर्धशतक साकारले. तर डेन्लीने कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक साकारतानाच रूटसह तिसऱ्या गडय़ासाठी १२६ धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियावर दडपण आणले. ही जोडी उर्वरित षटके खेळून काढणार, असे वाटत असतानाच हॅझलवूडने डेन्लीला (५०) बाद करून इंग्लंडला तिसरा धक्का दिला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा रूट ७४, तर बेन स्टोक्स २ धावसंख्येवर खेळत होता.

तत्पूर्वी, शुक्रवारच्या ६ बाद १७१ धावांवरून पुढे खेळताना मार्नस लॅबूशेन आणि जेम्स पॅटिन्सन यांनी ऑस्ट्रेलियाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. लॅबूशेनने सलग तिसरे अर्धशतक साकारताना पॅटिन्सनसह सातव्या गडय़ासाठी महत्त्वपूर्ण ५१ धावा जोडल्या.

जोफ्रा आर्चरने पॅटिन्सनला (२०) बाद करून ही जोडी फोडली, परंतु लॅबूशेन शतक साकारणार असे वाटत असतानाच दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात जो डेन्लीने त्याला ८० धावांवर धावचीत केले. लॅबूशेन माघारी परतल्यावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला झटपट गुंडाळले. आर्चरने सामन्यातील आठवा बळी मिळवताना नॅथन लायनचा (९) त्रिफळा उडवला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव २४६ धावांवर संपुष्टात आणला.

संक्षिप्त धावफलक

  • ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १७९
  • इंग्लंड (पहिला डाव) : ६७
  • ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ७५.२ षटकांत सर्वबाद २४६ (मार्नस लॅबूशेन ८०, मॅथ्यू वेड ३३; बेन स्टोक्स ३/५६)
  • इंग्लंड (दुसरा डाव) : ७० षटकांत ३ बाद १५४ (जो रूट खेळत आहे ७४, जो डेन्ली ५०; जोश हॅझलवूड १/३५) (धावफलक अपूर्ण)