अ‍ॅशेस २०१९ मधील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर चित्तथरारक विजय मिळवला. इंग्लंडचा उपकर्णधार बेन स्टोक्स याने एकतर्फी झुंज देत संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत बेन स्टोक्सने नाबाद १३५ धावांची खेळी केली. त्यामुळे सगळीकडे त्याच्याच नावाची चर्चा होती. केवळ क्रिकेटविश्वातच नव्हे सगळीकडे त्याच्या खेळीची चर्चा रंगली होती. स्टोक्सच्या या खेळीमुळे अमेरिकेची गायिका टेलर स्विफ्ट हिच्या लोकप्रियतेला काही काळासाठी धक्का बसला.

टेलर स्विफ्ट या अमेरिकन गायिकेचा ‘लव्हर’ अल्बम २३ ऑगस्टला रीलीज झाला. या अल्बममध्ये १८ ट्रॅक आहेत. या अल्बमची रीलीजच्या आधी प्रचंड चर्चा होती. पण मूळ अल्बम ज्या दिवशी दिला, त्या दिवशी मात्र स्टोक्सच्या धमाकेदार खेळीचा टेलर स्विफ्टच्या लोकप्रियतेला चांगलाच फटका बसला. ऑगस्ट २४ ते ऑगस्ट २५ २०१९ या कालावधीत टेलर स्विफ्टपेक्षाही जास्त सर्च आणि पेज व्ह्यूज बेन स्टोक्सच्या विकिपीडीया पेजला मिळाले. ICC ने देखील या संबंधीचा एक आलेख इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दरम्यान, २८ वर्षीय स्टोक्सने २१९ चेंडूंत ११ चौकार आणि आठ षटकार लगावून नाबाद १३५ धावा फटकावल्या. त्यामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर एक गडी राखून मात केली आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विशेषत: ११व्या क्रमांकावरील फलंदाज जॅक लीचच्या साथीने त्याने हा पराक्रम केला.

या खेळीविषयी स्टोक्स म्हणाला, ‘‘माझ्या कारकीर्दीतील अविस्मरणीय अशी ही खेळी होती. अखेरच्या क्षणापर्यंत लढायचे या हेतूनेच मी खेळत राहिलो. कारकीर्दीत पुन्हा कधीही मी अशी खेळी साकारेन की नाही, हे सांगू शकत नाही. परंतु आयुष्यातील दोन सर्वाधिक अभिमानास्पद क्षणांपैकी एक असा तो क्षण आणि ती खेळी होती.’’