प्रतिष्ठेची अ‍ॅशेस मालिका गुरुवारपासून सुरु झाली. या मालिकेच्या माध्यमातून जवळपास दीड वर्षांनंतर स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले, पण स्टीव्ह स्मिथने मात्र लढाऊवृत्ती दाखवत अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात झुंजार शतक झळकावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला.

स्टीव्ह स्मिथने अत्यंत संयमी खेळी केली आणि यंदाच्या मालिकेतील आपले पहिले शतक झळकावले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील २४ वे शतक ठरले. हा टप्पा गाठण्यासाठी स्टीव्ह स्मिथचे एकूण ११८ डाव खेळले आणि कर्णधार विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला. विराटने १२३ डावांमध्ये २४ कसोटी शतके झळकावली होती. या यादीत ऑस्ट्रेलियाचे सर दोन ब्रॅडमन हे ६६ डावात २४ शतके झळकावत अव्वल आहेत.

दरम्यान, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु ब्रॉडने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (२) आणि कॅमेरून बँक्राफ्ट (८) यांना माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय चुकीचा ठरवला. तिसऱ्या क्रमांकावरील उस्मान ख्वाजाही (१३) फार काळ टिकू शकला नाही. एकापाठोपाठ फलंदाज बाद होत असताना स्मिथने एकाकी खिंड लढवली.

ऑस्ट्रेलियाची ८ बाद १२२ धावा अशी अवस्था असताना स्मिथने लक्ष विचलित होऊ न देता पीटर सिडलच्या (४४) साथीने नवव्या गडय़ासाठी ८८ धावांची भागीदारी रचली. सिडल बाद झाल्यानंतर स्मिथने आक्रमक पवित्रा अवलंबला. ११व्या क्रमांकावरील नॅथन लिऑनसह त्याने १०व्या गडय़ासाठी ७४ धावांची भागीदारी रचली. बेन स्टोक्सला कव्हरच्या दिशेने चौकार लगावून स्मिथने कारकीर्दीतील २४वे आणि इंग्लंडविरुद्धचे नववे कसोटी शतक साकारले. ब्रॉडने स्मिथला १४४ धावांवर बाद करून पाच बळी मिळवले आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २८४ धावांत गुंडाळला. वोक्सने तीन तर स्टोक्स व मोईन अलीने प्रत्येकी एक बळी मिळवला.