सध्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे बिगुल वाजले आहेत. एकीकडे भारत-विंडिज कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. न्यूझीलंड विरूद्ध श्रीलंका यांच्यातही कसोटी मालिका सुरू असून त्यातील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला आहे. तर तिसरीकडे अ‍ॅशेस मालिका सुरू असून त्यातील २ सामने झाले आहेत आणि ऑस्ट्रेलिया १-० ने आघाडीवर आहे. अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात स्मिथला दुखापत झाल्यामुळे तो तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. जोफ्रा आर्चरने टाकलेला चेंडू त्याला लागल्याने आर्चर चांगलाच चर्चेत होता, पण तिसरा सामना सुरू होण्याआधी तो फलंदाजीच्या मुद्द्यावरून चर्चेत आला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये जोफ्रा आर्चर फलंदाजी करताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे या व्हिडीओत आर्चर स्मिथच्या फलंदाजीची नक्कल करताना दिसतो आहे. पहिल्या चेंडूवर आर्चर ‘स्मिथ स्टाईल’ स्ट्रेट ड्राईव्ह मारताना दिसत आहे, तर त्या पुढच्या चेंडूंवर तो चेंडू सोडून देण्याचा सराव करताना दिसतो आहे.

अ‍ॅशेस २०१९ मधील दुसऱ्या सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर पुन्हा तो जिद्दीने मैदानात उतरला खरा.. पण तो लगेचच बाद झाला. त्याने ९२ धावांची खेळी केली. त्याला उर्वरित सामन्यातून माघार घ्यावी लागली. तसेच, तिसऱ्या कसोटीआधीही तो पूर्णपणे तंदुरूस्त होऊ शकला नसल्याने त्याच्यावर तिसऱ्या सामन्यातून माघार घ्यायची वेळ ओढवली.