अ‍ॅशेस 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर मालिकेतील बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडला २५१ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने २५१ धावांनी विजय मिळवत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. स्टीव्ह स्मिथचे दोनही डावात शतक आणि फिरकी गोलंदाज नॅथन लायन याने दुसऱ्या डावात घेतलेल्या ६ गड्यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने हा विजय साकारला. तरीदेखील ऑस्ट्रेलियाच्या संघातून दुसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाजाला वगळण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी १२ खेळाडूंचा संघ जाहीर केला. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्यामुळे लॉर्ड्स कसोटीतून मालिका बरोबरीत सोडवण्याचा निर्धार यजमान इंग्लंडने केला आहे. असे असताना दुसऱ्या कसोटीसाठी संघात प्रमुख गोलंदाजाला पाचारण केले आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या संघातून जेम्स पॅटिन्सन याला डच्चू देण्यात आला आहे. तर मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडला यांना संघात संधी देण्यात आली आहे.

दुसरा सामना १४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंड संघानेही १२ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यात फिरकीपटू मोईन अलीला वगळून डावखुरा फिरकीपटू जॅक लीच याला संघात समाविष्ट केले आहे. पहिल्या कसोटीत मोईन अली पूर्णपणे अपयशी ठरला असल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आले आहे. तसेच जोफ्रा आर्चरलाही संघात संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ – टीम पेन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हीस हेड, कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, पीटर सिडल, नॅथन लायन, जोश हेझलवूड

इंग्लंडचा संघ – जो रूट (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, रॉरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, जो डेन्टली, जॅक लीच, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड