इंग्लंडविरुद्धची दुसरी अ‍ॅशेस कसोटी ऑस्ट्रेलियाने वाचवली. स्टीव्ह स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या मार्नस लाबुशेनने केलेल्या झुंजार अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाला सामना अनिर्णित राखण्यात यश आले. बेन स्टोक्सने साकारलेल्या शतकामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २६८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी ढेपाळली. परंतु लाबुशेन (५९) आणि ट्रेव्हिस हेड यांच्या (४२*) कामगिराच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना संपेपर्यंत ६ बाद १५४ धावा करत सामना वाचवला.

दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर पुन्हा तो जिद्दीने मैदानात उतरला खरा.. पण तो लगेचच बाद झाला. त्याने ९२ धावांची खेळी केली. मात्र त्याला उर्वरित सामन्यातून माघार घ्यावी लागली. पहिल्या डावात बाद झाल्यानंतर तो तंबूत परतत असताना एमसीसी क्लबचा सदस्य असलेल्या एका चाहत्याने स्मिथला डिवचण्यासाठी चीटर आणि बदनाम (Cheat and Disgrace) असे शब्द वापरून डिवचले. स्मिथ काहीही न बोलता तंबूच्या आत निघून गेला. पण स्मिथला डिवचणे आणि चिडवणे त्या सदस्याला मात्र महागात पडले. एमसीसी क्लब या सदस्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवला.

दरम्यान, या मालिकेतील २ सामन्यांनंतर ICC ने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने दुसरे स्थान परत मिळवले. आता तो क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या अगदी नजीक पोहोचला आहे. अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मिथने दोनही डावात शतके ठोकली होती. तसेच दुसऱ्या सामन्यात त्याने ९२ धावांची खेळी केली. त्याच्या या दमदार खेळीच्या बळावर स्टीव्ह स्मिथने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. चेंडू कुरतडण्याप्रकरणी स्मिथला निलंबित करण्यात आले होते. ही शिक्षा संपल्यानंतर त्याने ‘अ‍ॅशेस’मधून पुनरागमन केले आणि आपले दुसरे स्थान परत मिळवले.