अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने अ‍ॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनाही शरणागती पत्करावी लागली. त्यामुळे पाचव्या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशीच इंग्लंडने सामना खिशात घातला. इंग्लंडने दिलेल्या ३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ २६३ धावांत संपुष्टात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाला सामना गमवावा लागला असला तरी फलंदाज स्टीव्ह स्मिथने मात्र २१ व्या शतकात कोणालाही न जमलेला विक्रम रचला. स्मिथने अ‍ॅशेस मालिकेतील ४ सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले. एका सामन्यात त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. पण त्याने केलेल्या ४ सामन्यात त्याने तब्बल ७७४ धावा केल्या. २१ व्या शतकात एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्मिथने केला. त्याने या खेळीसह भारताचा लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. विंडिजविरूद्ध १९७१ साली एकाच कसोटी मालिकेत  ४ सामन्यांत ८ डावात गावसकर यांनी ७७४ धावा केल्या होत्या. पण २१ व्या शतकात मात्र असा पराक्रम करणारा स्मिथ पहिलाच फलंदाज ठरला.

दरम्यान, चहापानाला ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ५ बाद १६७ धावा अशी अवस्था झाली होती. ब्रॉड आणि जॅक लिच यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजून योग्य साथ न मिळाल्यामुळे ऑस्ट्रलियाचा चौथ्या दिवशीच पराभव झाला. त्याआधी शनिवारच्या ८ बाद ३१३ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडचा दुसरा डाव ३२९ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान होते. पण ब्रॉडच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली. संपूर्ण मालिकेत स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक बळी टिपले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashes 2019 steve smith most runs in single test series in 21st century equal sunil gavaskar record vjb
First published on: 16-09-2019 at 10:24 IST