अ‍ॅशेस २०१९ मध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनाही शरणागती पत्करावी लागली. त्यामुळे पाचव्या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशीच इंग्लंडने सामना खिशात घातला. इंग्लंडने दिलेल्या ३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ २६३ धावांत संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाला सामना आणि मालिका जिंकणे शक्य झाले नाही. पण त्यांनी अ‍ॅशेस करंडक आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. त्याचसोबत स्टीव्ह स्मिथच्या फलंदाजीने चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. स्मिथने अ‍ॅशेस मालिकेतील ४ सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले. एका सामन्यात त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. पण त्याने केलेल्या ४ सामन्यात त्याने तब्बल ७७४ धावा केल्या. महत्वाचे म्हणजे त्याने सलग ६ डावात ८० पेक्षा अधिक धावा केल्या. स्मिथने अ‍ॅशेस मालिकेतील सहा डावात १४४, १४२, ९२, २११, ८२ आणि ८० अशा धावा केल्या. असे ८०+ धावांचा ‘षटकार’ लगावणारा स्मिथ हा कसोटी क्रिकेटमधील केवळ दुसराच फलंदाज ठरला. स्मिथच्या आधी फक्त विंडिजचे माजी खेळाडू सर एव्हर्टन वीक्स यांनीच अशी कामगिरी केली होती. तसेच सलग जास्तीत जास्त अर्धशतकी खेळी करण्याचाही त्याने विक्रम केला.

धमाकेदार स्मिथ! २१ व्या शतकात केला कोणालाही न जमलेला पराक्रम

दरम्यान, चहापानाला ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ५ बाद १६७ धावा अशी अवस्था झाली होती. ब्रॉड आणि जॅक लिच यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजून योग्य साथ न मिळाल्यामुळे ऑस्ट्रलियाचा चौथ्या दिवशीच पराभव झाला. त्याआधी शनिवारच्या ८ बाद ३१३ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडचा दुसरा डाव ३२९ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान होते. पण ब्रॉडच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली. संपूर्ण मालिकेत स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक बळी टिपले.