इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने दुखापतीतून सावरत दमदार पुनरागमन केले. त्याने कारकीर्दीतील तिसरे द्विशतक झळकावत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ८ बाद ४९७ धावांपर्यंत मजल मारून दिली. सामन्यात एका वेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती ५ बाद २२४ अशी होती. स्मिथने टिम पेनच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या गडय़ासाठी १४५ धावांची शतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत आणले.

टीम पेनने ८ चौकारांसह ५८ धावा केल्या. पेनने या अर्धशतकी खेळीबरोबरच एक खास पराक्रम केला. अ‍ॅशेस मालिकेत अर्धशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा तो दुसराच यष्टीरक्षक-कर्णधार ठरला. तब्बल १२५ वर्षांनी त्याने या विक्रमाची बरोबरी केली. या आधी जॅक ब्लॅकहॅम यांनी डिसेंबर १८९४ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षण करताना कर्णधारपद सांभाळताना हा पराक्रम केला होता. त्यांनी त्यावेळी सिडनी येथे ७४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तब्बल १२५ वर्षांनी पेनने ऑस्ट्रेलियाकडून असा पराक्रम केला आहे.

त्याचबरोबर पेन हा अ‍ॅशेस मालिकेत अर्धशतक करणारा एकूण तिसराच यष्टीरक्षक-कर्णधार आहे. अ‍ॅशेसमध्ये ब्लॅकहॅम यांच्यानंतर १९९८ मध्ये इंग्लंडचे नेतृत्व करताना यष्टीरक्षक अ‍ॅलेक स्टु्अर्टने अ‍ॅडलेड येथे नाबाद ६३ धावांची खेळी केली होती.

दरम्यान, स्मिथने या सामन्यात ३१९ चेंडूत २११ धावा केल्या. या खेळीत त्याने २४ चौकार आणि २ षटकार लगावले. स्मिथचे हे कसोटी कारकिर्दीतील तसेच अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरे द्विशतक ठरले. त्यामुळे तो मालिकेमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला. स्मिथने २०१५, २०१७ आणि २०१९ अशा सलग तीन अ‍ॅशेस मालिकेत प्रत्येकी एक द्विशतक केले. सलग तीन अ‍ॅशेस मालिकेत द्विशतक करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला.