अ‍ॅशेस २०१९ मध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनाही शरणागती पत्करावी लागली. त्यामुळे पाचव्या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशीच इंग्लंडने सामना खिशात घातला. इंग्लंडने दिलेल्या ३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ २६३ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे तब्बल ४७ वर्षानंतर अ‍ॅशेस कसोटी मालिका अनिर्णित राहिली.

ऑस्ट्रेलियाला सामना आणि मालिका जिंकणे शक्य झाले नाही. पण त्यांनी अ‍ॅशेस करंडक आपल्याकडे राखण्यात यश मिळवला. त्याचसोबत स्टीव्ह स्मिथच्या फलंदाजीने चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. मालिकेच्या सुरूवातीला ‘चीटर’ म्हणून डिवचणाऱ्या चाहत्यांनी मालिकेच्या शेवटी स्मिथसाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही मैदानात एकमेकांविरोधात भरपूर स्लेजिंग केलं, पण मालिका संपल्यानंतर मात्र दोन संघांच्या खेळाडूंनी मैदानावरील शत्रूत्व विसरून खरी खिलाडूवृत्ती दाखवली. या दोनही संघांनी एकत्रितपणे सेलिब्रेशन केलं. इंग्लंड क्रिकेट मंडळाने या संदर्भातील फोटो आणि व्हिडीओ ट्विट केला आहे.

दरम्यान, ४ सामन्यांनंतर मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ २-१ ने आघाडीवर होता, पण शेवटच्या सामन्यात इंग्लंडने जोर लावला. चौथ्या दिवशीच त्यांनी सामना जिंकला. चौथ्या दिवशी चहापानाला ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ५ बाद १६७ धावा अशी अवस्था झाली होती. ब्रॉड आणि जॅक लिच यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजून योग्य साथ न मिळाल्यामुळे ऑस्ट्रलियाचा चौथ्या दिवशीच पराभव झाला. त्याआधी शनिवारच्या ८ बाद ३१३ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडचा दुसरा डाव ३२९ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान होते. पण ब्रॉडच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली. संपूर्ण मालिकेत स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक बळी टिपले.