विश्वातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला तिसऱ्या शतकाने शनिवारी हुलकावणी दिली. परंतु अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि पीटर सिडल या दोघांनी दडपणाच्या परिस्थितीत केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली.

८० धावांवर असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू मानेवर आदळल्यामुळे स्मिथला जायबंदी होऊन माघारी परतावे लागले होते. मात्र सिडल (९) बाद झाल्यावर स्मिथ जिद्दीने पुन्हा मैदानात उतरला. लागोपाठ दोन चौकार लगावत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. पण वोक्सच्या आत घुसणाऱ्या चेंडूवर स्मिथने खेळण्याचा प्रयत्नच केला नाही व तो पायचीत झाला. १६१ चेंडूंत १४ चौकारांनिशी ९२ धावा करून स्मिथ माघारी परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २५० धावांवर संपुष्टात आला.

पहिल्या डावात अवघ्या ८ धावांची आघाडी घेणाऱ्या इंग्लंडला कमिन्सने सुरुवातीलाच जबर धक्के दिले. त्याने सलामीवीर जेसन रॉय (२) आणि कर्णधार जो रूटला शून्यावर बाद केले. रॉरी बर्न्‍स (२९) व जो डेन्ली (२६) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ५५ धावांची भागीदारी रचून इंग्लंडला सावरले. परंतु सिडलने दोन षटकांच्या अंतरात या दोघांना बाद करून सामन्यात चुरस निर्माण केली. दिवसअखेर इंग्लंडने ४ बाद ९६ धावा केल्या असून बेन स्टोक्स १६, तर जोस बटलर १० धावांवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक

  • इंग्लंड (पहिला डाव) : २५८
  • ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : २५०
  • इंग्लंड (दुसरा डाव) : ३२.२ षटकांत ४ बाद ९६ (रॉरी बर्न्‍स २९, जो डेन्ली २६; पॅट कमिन्स २/१६ , पीटर सिडल २/१९).