आयर्लंड संघाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात सुमार दर्जाची कामगिरी केल्यानंतर इंग्लंडच्या संघात अॅशेस मालिकेसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. एकदिवसीय विश्वचषक मिळवून देणाऱ्या जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स या दोघांनाही संघात पहिल्या कसोटीसाठी स्थान देण्यात आले आहे. जोफ्रा आर्चरसाठी ही पदार्पणाची कसोटी असणार आहे, तर आयर्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात विश्रांती दिलेल्या बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांचे संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय बेन स्टोक्स याला संघाच्या उपकर्णधारपदी बढती देण्यात आली आहे.

उपांत्य फेरीत प्रथमच एखाद्या संघाकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. योगायोगाने इंग्लंडनेच त्यांना पराभवाची चव चाखायला लावली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका फारच चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने शनिवारी १४ सदस्यीय संघ जाहीर केला. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरुवारी सुरु होणार आहे.

२४ वर्षीय आर्चरने विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत २० गडी माघारी धाडले. अतिशय दडपणाचा स्थितीमध्ये त्याने सुपर ओव्हरदेखील टाकली आणि सामना बरोबरीत रोखत इंग्लंडला विजय प्राप्त करून दिला. याशिवाय त्याने २०१६ पासून २८ प्रथम श्रेणी सामन्यांत १३१ गडी बाद केले. त्याच्या या धमाकेदार कामगिरीची दखल घेत त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे.

पहिल्या कसोटीसाठी संघ – जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, जो डेन्टली, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स