काल आशिष नेहरा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना दिल्लीला खेळला. नेहराची कारकीर्द आठवताना एकदम धबधब्यासारखे प्रसंग आणि स्मृती आपल्या मेंदूवर आक्रमण करत नाहीत. नेहरा हा एखाद्या कुटुंबात मर्चंट नेव्हीत काम करणारी व्यक्ती असते तसा होता. मर्चंट नेव्हीतले लोक एकदा बोटीवर गेले की डायरेक्ट आठ महिने किंवा एक वर्षाने परत काही दिवसाकारता घरी येऊन जातात. ते परत येतात तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्व, गुणदोष घरच्यांच्या विस्मृतीत गेल्यासारखे असतात किंवा त्या व्यक्तीला रिडिस्कव्हर करायला घरच्यांना थोडा वेळ लागतो, संवाद सुरू व्हायला थोडा वेळ लागतो, काही दिवस तिऱ्हाईतासारखे जातात. नेहरा आपल्या सगळ्यांच्या क्रिकेट कुटुंबातला ‘तो’ मर्चंट नेव्हीतला सदस्य होता. आठ महिने बाहेर मग दोन महिने संघात मग परत सहा महिने बाहेर. त्यामुळे दोन महिने संघात असताना त्याने टाकलेले उत्तमोत्तम स्पेल त्याच्या दीर्घ रजेमुळे विस्मृतीत जात. तो पुन्हा संघात आला की त्याचा नव्याने शोध घ्यायचा.

हे आतबाहेर प्रकरण त्याच्या तंदुरुस्तीमुळे होत राहिलं. कधी गुडघा तर कधी घोटा कधी खांदा तर कधी इतर कुठलाही सांधा. सततच्या दुखापतीने त्याच्या करिअरबाबत सतत आव्हाने उभी राहिली. पण प्रत्येक आव्हानावर मात करत तो उभा राहिला. त्याच्या कृश शरीरयष्टीमुळे तो उभे रहण्याकरता सुद्धा खास त्याच्याकरता डिझाईन केलेले तंत्र वापरत असावा असे वाटायचे. नीट उभे राहणे सुद्धा त्याला आव्हानात्मक असावे. नेहराची गुणवत्ता ओळखून ‘दादा’ गांगुलीने त्याला संधी दिली. सतत संधी देत राहिला आणि नेहराला घडवले. सचिनने त्याच्या खेळातून मुलांना क्रिकेट ग्राउंडवर आणून मोठे क्रिकेट खेळण्याची स्फूर्ती दिली तर दादाने त्यातल्या गुणवानांना ग्राऊंडवरून भारताच्या स्कोअर बुकात आणले. (सर्व बंगाल्यांना उठसुट दादा म्हणण्याची पद्धत असली तरी आमच्या हिशेबी एकमेव दादा म्हणजे गांगुली. सेहवाग, हरभजन, युवराज, झहीर, नेहरा अशी वैभवशाली पिढी घडवणारा एकमेव दादा माणूस)त्यामुळे जेव्हा काल सामना संपल्यावर टीव्हीवर दादा नेहरावर बोलत होता ते प्राण कानात आणून ऐकण्यासारखे होते. दादा म्हणाला ‘डोक्यावरची टोपी कधीही सरळ नाही, उभे राहताना सरळ नाही,पळताना भिन्न दिशेत पडणारे पाय, शर्टाची एक बाजू पॅन्टमध्ये खोचलेली आणि दुसरी बाहेर अशी गबाळशास्त्री प्रतिमा असली तरी नेहराने भारतीय क्रिकेटची जी सेवा केली त्याला तोड नाही.’

साधारण २००२ नंतर तर त्याच्या कौशल्यामुळे आणि अनुभवातून आलेल्या धूर्तपणामुळे त्याला शेवटचे षटक दिले जाई. शेवटचे षटक टाकणे हा थँक् लेस जॉब आहे.तुम्ही धावा देऊन सामना घालवला तर उरलेले दहा खेळाडू तुमची जितकी धुलाई करत नाहीत तितकी १२५ कोटी भारतीय व्हॉट्स अँप वरून करतात हा अनुभव बिचाऱ्या नेहराला सोसावा लागला. पण त्याने क्रिकेट चाहत्यांना माफ केले. त्या बदल्यात काही अप्रतिम लास्ट ओव्हर्स टाकून त्याने भरपाई सुद्धा केली. त्याच्या कौशल्याची जाणीव धोनीला सुद्धा होती. त्यामुळे अचूक मनुष्यबळ हेरण्यात वाकबगार असलेल्या धोनीने त्याला नियमितपणे वनवासातून संघाच्या सहवासात आणले.

स्विंग नसलेल्या परिस्थितीत वेगातील बदल आणि बॉउन्सरचा धक्कातंत्र म्हणून केलेला चतुर वापर यात नेहराचा हात फक्त झहीरच धरू शकतो. (या तंत्राचा मंत्र सध्या भुवनेश्वर कुमार चांगला आत्मसात करू लागला आहे असे दिसते.) नेहराचा २००३ वर्ल्ड कप मधील इंग्लंड विरुद्ध टाकलेला स्पेल अजरामर झालेला असला तरी अनेक सामन्यात त्याने पहिल्या पाच षटकात घेतलेल्या विकेट्स आणि शेवटच्या षटकातील धूर्त गोलंदाजी त्याला भारतीय गोलंदाजीचा ‘नेहराजी’ बनवण्यास समर्थ ठरली. अशा खेळाडूला दिल्लीच्या मैदानावर मिळालेला सन्मान हा निस्पृह कष्टकरी माणसाचा सन्मान होता. मोठ्या मोठ्या ताऱ्यांच्या भाऊगर्दीत काही अवकाश कष्टाळू माणसासाठी सुद्धा अजूनही राखून ठेवले जाते हे पाहून समाधान वाटले.

कायम प्लास्टर मधला पाय, बँडेजमधला घोटा, मोडलेला खांदा अशा मोडलेल्या अवतारातला इंग्लंडचा ७० च्या दशकातला फास्ट बॉलर ख्रिस ओल्ड एकदा पूर्ण तंदुरुस्त अवस्थेत ग्राऊंडवर आला तेव्हा एका खेळाडूने ‘आज आख्खा ख्रिस ओल्ड ग्राऊंडवर आल्याचे बघून आनंद झाला’ अशी मजेदार कंमेंट केली होती. नेहराचे क्रिकेट संपले आहे. त्यामुळे आता आपल्याला तो जेव्हा दिसेल तेव्हा आख्खाच दिसेल.
वेल डन नेहरा. यू मेड अस प्राऊड!!!

– रवि पत्की