भारतीय संघाचा मुख्य फिरकीपटू रविचंद्रन अश्विन २०१६ मधील उल्लेखनीय कामगिरीनंतर यंदाच्या वर्षात देखील दमदार कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. यादरम्यान अश्विन जाहिरात विश्वात देखील धोनी आणि विराटलाही यंदा मागे टाकण्याची शक्यता आहे. अश्विन लवकरच एका कंपनीसोबत करार करणार असून या करारानंतर तो सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त करेल. अश्विन यंदाच्या वर्षाच्या अखेरीस देशातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर असेल, असा दावा ‘आयटीडब्ल्यू ब्लिट्ज’चे सह-संस्थापक भैरव सनत यांनी केला आहे. ‘आयटीडब्ल्यू ब्लिट्ज’ कंपनी अश्विनकडून यंदाच्या वर्षात १५ ब्रॅण्ड्सची जाहिरात करणार आहे. चेन्नईमध्ये पत्रकार परिषद घेऊन ‘आयटीडब्ल्यू ब्लिट्ज’ कंपनीने अश्विनसोबत झालेल्या कराराबद्दलची माहिती दिली. अश्विनला यंदा आयसीसीने सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या पुरस्काराने गौरविले. अश्विनने १२ कसोटी सामन्यांत २३.९० च्या सरासरीने ७२ विकेट्स घेतल्या होत्या, तर १४ कसोटी इनिंग्समध्ये ४३ च्या सरासरीने ६१२ धावा ठोकल्या. यात एका शतकाचा तर चार अर्धशतकांचा समावेश आहे. सध्या जाहिरात विश्वात महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली सर्वात महागडे खेळाडू आहेत.

वाचा: आर.अश्विनचा नेत्रदान करण्याचा कौतुकास्पद निर्णय

 

भैरव सनत म्हणाले की, आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाल्याने अश्विनची ब्रॅण्ड व्हॅल्यू वधारली आहे. अश्विन एक शांत, मेहनती आणि अष्टपैलू खेळाडू आहे. अश्विनच्या कामगिरीत सातत्य देखील आहे. त्यामुळे आम्ही कंपनीच्या जाहिरातीसाठी अश्विनची निवड केली. अश्विन यंदाच्या वर्षात जाहिरातीतून २०० कोटींहून अधिक कमाई करण्याची शक्यता आहे. २०१६ सालची आकडेवारी पाहता धोनीने १५० तर कोहलीने १३० कोटी जाहिरातीतून कमावले होते.

वाचा: कसोटीमध्ये अश्विन, जडेजा गोलंदाजांमध्ये अव्वल; फलंदाजांमध्ये कोहली द्वितीय

नुकतेच अश्विनने सामाजिक बांधिलकी जपत नेत्रदानाचा निर्णय घेऊन नेत्रदानाच्या जनजागृतीला हातभार लावला. चेन्नईतील एका रुग्णालयाच्या नेत्रदान मोहिमेत हातभार लावत कसोटी क्रमवारीतील या अव्वल मानांकित गोलंदाजाने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत असे अश्विनच्या पत्नीचे स्वप्न होते. आपल्या पत्नीचे स्वप्न सत्यात उतरल्याचे अश्विनने म्हटले असून नेत्रदानाची जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रीत करणे हे त्याच्या फाऊंडेशनचे मुख्य उद्दीष्ट असल्याचे त्याने म्हटले. अश्विनच्या फाऊंडेशनची सुरूवात ७ जानेवारी रोजी झाली. क्रिकेटचे मैदान गाजवणारा अश्विन सामाजिक क्षेत्रात देखील तितकाच सक्रिय आहे. अश्विन फाऊंडेशन सोबतच अश्विनची स्वत:ची ‘जेन-नेक्स्ट’ नावाची क्रिकेट अकादमी देखील आहे. २०१० साली अश्विनने चेन्नईत या अकादमीची स्थापना केली.