भारतीय संघाचा मुख्य फिरकीपटू आर. अश्विन कसोटी गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. याशिवाय आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत देखील अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर कसोटी पूर्वी अश्विन गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱया स्थानावर होता. पण इंदूर कसोटीत अश्विनने आपली फिरकी जादूवर किवींना नामोहरम केले. अश्विनने इंदूर कसोटीत दोन डावात मिळून १३ विकेट्स घेतल्या. तर संपूर्ण मालिकेत अश्विनच्या खात्यात एकूण २७ विकेट्स जमा झाल्या. अश्विन इंदूर कसोटीचा सामनावीर ठरला, तर मालिकावीराचा किताब देखील अश्विनलाच देण्यात आला. इंदूर कसोटीतील अफलातून कामगिरीमुळे अश्विनने जागतिक क्रमवारीत डेल स्टेन आणि जेम्स अँडरसन यांना मागे टाकून अव्वल स्थान प्राप्त केले.
दुसरीकडे, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या जागतिक क्रमवारीत सुधारणा झाली आहे. इंदूर कसोटीत दीडशतकी खेळीमुळे अजिंक्य रहाणे जागतिक फलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर दाखल झाला आहे. अजिंक्य रहाणेचे हे आतापर्यंतचे सर्वोत्तम स्थान आहे. द्विशतकी कामगिरी करणारा विराट कोहलीच्या क्रमवारीत देखील चार स्थानांची सुधारणा झाली आहे. कोहली क्रमवारीत १६ व्या स्थानी आहे. चेतेश्वर पुजारा १४ व्या स्थानावर आहे.