News Flash

भारताचे तिहेरी फिरकी गोलंदाजीचे सूत्र!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अश्विन, कुलदीप निश्चित; वॉशिंग्टन, अक्षरपैकी एकाला संधी

(संग्रहित छायाचित्र)

इंग्लंडचा भारत दौरा

चेपॉक म्हणजेच एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने तिहेरी फिरकी गोलंदाजीच्या माऱ्याचे सूत्र निश्चित केले आहे. अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि ‘चायनामन’ कुलदीप यादव हे दोघे पहिल्या पसंतीचे फिरकी गोलंदाज असतील, तर तिसऱ्या स्थानासाठी ऑफ-स्पिनर वॉशिंग्टन सुंदर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळेल.

वेगवान गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियात संस्मरणीय यश मिळाल्यानंतरही आता मायदेशातील कसोटी मालिकेच्या आव्हानाकडे पाहताना भारताने पुन्हा फिरकी गोलंदाजीचा पारंपरिक मार्ग पक्का केला आहे.

भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीसाठी चेपॉकची खेळपट्टी ही परंपरेप्रमाणेच असेल. पहिले तीन दिवस फलंदाजांना पोषक असेल, तसेच चेंडू उसळू शकेल. परंतु उर्वरित शेवटच्या दोन दिवसांत ती फिरकीला साथ देईल. या पार्श्वभूमीवर अश्विन आणि कुलदीपचे स्थान निश्चित मानले जात आहे.

तिसऱ्या स्थानासाठीही ऑस्ट्रेलियातील अखेरच्या कसोटी सामन्यात अष्टपैलू चमक दाखवणाऱ्या वॉशिंग्टनचा अक्षरपेक्षा प्राधान्यानाने विचार केला जाऊ शकतो. ‘‘वॉशिंग्टनमुळे भारताची फलंदाजी उत्तरार्धातसुद्धा बळकट होईल,’’ असे संघ व्यवस्थापनाच्या सूत्रांनी सांगितले. श्रीलंका दौऱ्यावर इंग्लंडच्या फलंदाजांवर डावखुरा फिरकी गोलंदाज लसिथ ईम्ब्युलडेनियाने अंकुश ठेवला होता. त्यामुळे डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचा मुद्दा अक्षरसाठी अनुकूल ठरू शकतो.

भारताच्या कामगिरीचे विल्यम्सनकडून कौतुक

नवी दिल्ली : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत मिळवलेल्या यशाचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने कौतुक केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील स्थान न्यूझीलंडने पक्के केले असून त्या पार्श्वभूमीवर अंतिम फेरीत कोणत्या संघाविरुद्ध खेळायला आवडेल, असे विचारले असता विल्यम्सन म्हणाला, ‘‘भारत, इंग्लंड हे दोघेही एकमेकांच्या तोडीस तोड असून ऑस्ट्रेलियाचा संघही अद्याप पूर्णपणे अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. त्यामुळे मी आताच एखाद्या संघाची निवड करू इच्छित नाही. मात्र भारताने जवळपास दुसऱ्या फळीच्या खेळाडूंसह ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशाने त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असेल. त्यामुळे इंग्लंडला या मालिकेत कठोर परिश्रम घ्यावे लागतील,’’ असे विल्यम्सन म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 12:14 am

Web Title: ashwin kuldeep for the first test abn 97
टॅग : India Vs England
Next Stories
1 आशीष शेलार यांना धक्का !
2 रोनाल्डोमुळे युव्हेंटस विजयी
3 क्रीडा क्षेत्राला अधिक निधी -रिजिजू
Just Now!
X