ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्वत:ला सिद्ध केल्यामुळे आपण समाधानी असून इंग्लंडविरुद्धच्या आगामी चारही कसोटीत खेळण्यासाठी आपण सज्ज असल्याचे मत भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत मिळवलेल्या यशात ३४ वर्षीय अश्विनचा मोलाचा वाटा होता. विशेषत: विदेशी खेळपट्टय़ांवर अपयशी ठरणारा गोलंदाज, असा शिक्का अश्विनवर बसला होता. परंतु अश्विनने तीन सामन्यांत १२ बळी मिळवतानाच स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबूशेन या ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांना जखडून ठेवले. त्याशिवाय सिडनी येथील तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यासाठी त्याने फलंदाजीद्वारेही योगदान दिले. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पूर्णपणे तंदुरुस्ती राखल्यास चारही कसोटीत खेळण्यासाठी अश्विन उत्सुक आहे.

‘‘यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा माझ्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला. कारण पहिल्या कसोटीसाठी मला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच होती. परंतु रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्याने मला संधी लाभली. त्यानंतर मी फक्त मूलभूत गोष्टींवर भर दिला. यापूर्वी २०१८-१९च्या दौऱ्यातसुद्धा माझी कामगिरी समाधानकारक होती. परंतु आताच्या मालिकेतील कामगिरीद्वारे एकप्रकारे टीकाकारांची तोंडे बंद करून स्वत:ला सिद्ध केल्याचे मला समाधान लाभले,’’ असे अश्विन म्हणाला.

आता ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चारही कसोटीत आपल्याला संधी मिळेल, अशी आशा अश्विनने बाळगली आहे. ‘‘इंग्लंडचा संघ श्रीलंकेतील दमदार कामगिरीनंतर भारतात येत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्धची मालिका आव्हानात्मक ठरेल. २०१६-१७च्या दौऱ्यात आम्ही इंग्लंडला ४-० असे नमवले होते. परंतु यंदा त्यांच्याकडून अधिक कडव्या प्रतिकाराची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्वत:ला सिद्ध केल्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील एखाद-दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरल्यास मला थेट संघातून वगळण्यात येणार नाही, अशी अपेक्षा आहे,’’ असेही अश्विनने सांगितले. अश्विनचे ३७७ कसोटी बळी झाले असून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ४०० कसोटी बळींचा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे आहे.

सिडनीत भारतीय खेळाडूंचा अपमान!

सिडनीतील तिसऱ्या कसोटीदरम्यान विलगीकरणाच्या नियमांचे पालन करताना माझ्यासह सर्वच भारतीय खेळाडूंचा अपमान होत असल्याचे जाणवले, असा खुलासा अश्विनने केला. ‘‘तिसऱ्या कसोटीसाठी सिडनी येथे आगमन झाल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंना एकाच हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवून त्यांच्यासाठी समान विलगीकरणाचे नियम आखण्यात आले. परंतु तरीही एखाद्या वेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू उद्वाहकातून ये-जा करत असल्यास आम्हाला त्यांच्यासह प्रवास नाकारला जायचा. तसेच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू उद्वाहकातून बाहेर पडल्याशिवाय आम्हाला आतमध्ये प्रवेश मिळायचा नाही. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला ही गोष्ट पचवणे खूप कठीण गेले. आमचा अपमान होत असल्याची भावना त्यावेळी निर्माण झाली,’’ असे अश्विनने सांगितले.

इंग्लंडला सरावासाठी तीन दिवसांचा अवधी

लंडन : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरण्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूंना तीन दिवसांचा अवधी सरावासाठी मिळणार आहे. उभय संघांतील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे प्रारंभ होणार असून बुधवार, २७ जानेवारी रोजी इंग्लंडच्या खेळाडूंचे श्रीलंकेहून भारतात आगमन होणार आहे. परंतु जैव-सुरक्षेच्या नियमानुसार त्यांना पुढील सहा दिवस विलगीकरण करणे अनिवार्य असल्याने २ फेब्रुवारीपासून त्यांना सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूंची तीन वेळा करोना चाचणी करण्यात येणार आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सचे मात्र सोमवारीच भारतात आगमन झाले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी स्टोक्सला विश्रांती देण्यात आली होती.

जागतिक कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी लांबणीवर

नवी दिल्ली : ‘आयसीसी’च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी काही दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार १० ते १४ जूनदरम्यान होणारा अंतिम सामना आता १८ ते २२ जूनदरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४वा हंगाम मे महिन्याच्या अखेरीस संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर खेळाडूंना विलगीकरणासाठी तसेच सरावासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी ही अंतिम फेरी पुढे ढकलण्यात आली असल्याचे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. तूर्तास, भारताव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांत अंतिम फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे.