दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जायबंदी झालेला भारताचा फिरकीपटू आर. अश्विन तंदुरुस्त झाल्याचे सूत्रांनी सांगतिले आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात अश्विन खेळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘‘ मी दुखापतीतून सावरलो आहे. आताच्या घडीला मी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करण्यासाठी मी सज्ज आहे,’’ असे अश्विन म्हणाला.
पहिल्या एकदिवसीय सामन्याचे क्षेत्ररक्षण करताना अश्विनला शरीराच्या एका बाजूला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मालिकेतील अन्य सामन्यांना मुकावे लागले होते. पण आता तो तंदुरुस्त असल्याचे सांगत असून पहिल्या कसोटीत तो खेळण्याची शक्यता आहे. पहिला कसोटी सामना ५ नोव्हेंबरपासून मोहालीमध्ये सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पराभवाबद्दल अश्विन म्हणाला की, ‘‘आम्ही या मालिकेत वाईट खेळलो असे मला वाटत नाही. माझ्या मते आम्ही चांगली लढत दिली. मालिकेत १-२ अशा पिछाडीवर असताना मालिकेत आम्ही चांगले पुनरागमन केले होते. मुंबईतील सामन्यात काही गोष्टी आमच्याविरुद्ध गेल्या आणि आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला.’’
कसोटी मालिकेबद्दल अश्विन म्हणाला की, ‘‘ माझ्या मते कसोटी मालिकेमध्ये कडवी झुंज पाहायला मिळेल. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत भारतीय दौऱ्यात चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धावांपासून रोखण्याचा आम्ही कसोटी मालिकेत प्रयत्न करू.’’

आव्हाने स्वीकारायला आवडतात – हरभजन
नवी दिल्ली : एबी डी’व्हिलियर्सच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ट्वेन्टी-२०पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकली आहे. त्यामुळे आता त्यांचे कसोटी मालिका विजयाचे लक्ष्य असेल, पण आव्हाने स्वीकारायला मला नेहमीच आवडतात, असे भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने म्हटले आहे.‘‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मी खेळाचा आनंद लुटला. त्यांनी चांगला खेळ केला असून यापुढेही त्यांचे आव्हान स्वीकारायला मी सज्ज आहे. जेव्हा एखादे आव्हान तुमच्यापुढे असते, तेव्हा तुम्हाला पूर्णपणे समर्पण करत कामगिरी करावी लागते. आतापर्यंतच्या गोलंदाजीने मी समाधानी असून यापुढेही दमदार कामगिरी करण्याचा निर्धार आहे,’’ असे हरभजन म्हणाला.