अश्विनी पोनप्पा आणि लक्ष्य सेन यांच्यासह भारताच्या एकूण २० बॅडमिंटनपटूंनी बेंगळूरुतील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत सरावाला सुरुवात केली आहे.  करोनामुळे या बॅडमिंटनपटूंनाही तीन महिने खेळापासून दूर राहावे लागले होते.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) सरावाला परवानगी दिल्यानंतर भारताच्या खेळाडूंनी विविध ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळत सराव सुरू केला आहे. ‘‘भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू गेल्या दोन आठवडय़ांपासून येथे सराव करीत आहेत. एकूण १६ कोर्ट आम्ही सरावासाठी सज्ज केले असून त्यावर २० खेळाडू सराव करीत आहेत. प्रत्येक खेळाडूसाठी सरावाची वेळ स्वतंत्र देण्यात आली आहे. आमच्याकडे एकूण ६५ खेळाडू बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहेत. मात्र सध्या करोनामुळे त्यातील अनेक जण बेंगळूरु शहरात नाहीत. मात्र ते सरावासाठी लवकरच येण्याकरता उत्सुक आहेत,’’ असे प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीतील मुख्य प्रशिक्षक आणि संचालक विमल कुमार यांनी सांगितले.

‘‘महाराष्ट्रामधून येणाऱ्या व्यक्तींना आमच्याकडे संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक आहे. त्यामुळे तेथून आमच्या अकादमीत येणाऱ्यांना आम्ही शक्यतो नका येऊ असे सांगत आहोत,’’ अशी माहितीही विमल कुमार यांनी दिली. बेंगळूरू येथे सध्या अश्विनी, लक्ष्य यांच्यासह अजय जयराम, मिथुन मंजूनाथ, बी. एम. राहुल भारद्वाज यासारखे भारताकडून खेळणारे खेळाडू सराव करत आहेत. ‘‘आघाडीच्या खेळाडूंना दोन ते तीन महिने सराव करता आलेला नाही. किमान दीड महिने या खेळाडूंना पुन्हा त्यांचा नियमित खेळ होण्यासाठी लागेल,’’ असेही विमल कुमार यांनी सांगितले.