संयुक्त अरब अमिरातीबरोबर आज अखेरचा साखळी सामना

आशियाच चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेतील सलग तीन सामने जिंकत भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. संयुक्त अरब अमिरातीबरोबर गुरुवारी भारताचा अखेरचा सामना होणार असून त्यांच्यासाठी ही प्रयोग करण्याबरोबर युवा खेळाडूंना संधी देण्याची संधी असेल. पण क्रिकेट हा अनिश्तितेचा खेळ म्हटला जातो, त्यामुळे हे प्रयोग करताना भारताला गाफील राहून मात्र नक्कीच चालणार नाही.

आतापर्यंत भारताने आशिया चषकात तीन विजय मिळवल्याने कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाचे समीकरण बदलू शकतो. अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, पवन नेगी आणि भुवनेश्वर कुमार या खेळाडूंपैकी काही जणांना या सामन्यात संधी देऊन त्यांना विश्वचषकापूर्वी सामन्याचा सराव देता येऊ शकतो. अजिंक्यला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली होती, पण त्याला मोठी खेळी साकारण्यात यश आले नाही. सलामीवीर शिखर धवन सातत्याने अपयशी ठरत असताना अजिंक्यला या सामन्यात संधी मिळू शकेल. मध्यमगती गोलंदाजी आशीष नेहरा चांगल्या फॉर्मात असला तरी त्याला या सामन्यात विश्रांती देऊन भुवनेश्वर कुमारला खेळवता येऊ शकते. त्याचबरोबर आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाला विश्रांती देऊन हरभजन आणि आयपीएलमध्ये दमदार बोली लागलेल्या नेगी यांना संधी देता येऊ शकते. विराट कोहली हा सध्या भन्नाट फॉर्मात आहे. प्रत्येक सामन्यात सातत्यपूर्ण खेळ करीत त्याने विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात युवराज सिंगने आपण लयीत आल्याचे दाखवून दिले आहे. धोनीला मात्र अजूनही जास्त फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही. युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भेदक मारा करत प्रतिस्पध्र्याना चकित करत आहे. संयुक्त अरब अमिरातीची गोलंदाजी चांगली होत असली तरी त्यामध्ये चांगला समन्वय दिसत नाही. त्याचबरोबर फलंदाजीमध्ये त्यांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. त्यामुळे हा सामना जिंकणे भारतासाठी फार अवघड दिसत नसले तरी त्यांनी अमिरातीविरुद्ध गाफिल राहता कामा नये.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/ यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंडय़ा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह, पवन नेगी, हरभजन सिंग, अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार आणि पार्थिव पटेल (यष्टीरक्षक).

संयुक्त अरब अमिराती : अमजद जावेद (कर्णधार), अहमद रझा, मोहम्मद नावेद, मोहम्मद शहझाद, मोहम्मद कलीम, मोहम्मद उस्मान, स्वप्निल पाटील (यष्टीरक्षक), कादीर अहमद, रोहन मुस्तफा, साकलेन हैदर, शैमन अन्वर, उस्मान मुश्ताक आणि झहीर मकसूद.

वेळ : रात्री ७.३० वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १,३ वाहिन्यांवर.